Home / देश-विदेश / E20 Petrol Engine Damage: जुन्या गाड्यांच्या मालकांनो सावधान! इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे इंजिन खराब होण्याचा धोका; अहवालातून धक्कादायक माहिती समोर

E20 Petrol Engine Damage: जुन्या गाड्यांच्या मालकांनो सावधान! इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे इंजिन खराब होण्याचा धोका; अहवालातून धक्कादायक माहिती समोर

E20 Petrol Engine Damage: कच्च्या तेलाची आयात कमी करण्यासाठी आणि हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून देशभरात 20 टक्के इथेनॉल मिश्रित...

By: Team Navakal
E20 Petrol Engine Damage: जुन्या गाड्यांच्या मालकांनो सावधान! इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे इंजिन खराब होण्याचा धोका; अहवालातून धक्कादायक माहिती समोर
Social + WhatsApp CTA

E20 Petrol Engine Damage: कच्च्या तेलाची आयात कमी करण्यासाठी आणि हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून देशभरात 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल (E20 Fuel) वापरण्यावर मोठा भर दिला जात आहे. मात्र, हा निर्णय देशातील कोट्यवधी जुन्या गाड्यांच्या मालकांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) या सरकारी संस्थेने केलेल्या एका गुप्त अभ्यासातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या अहवालानुसार, केवळ 10 टक्के इथेनॉलसाठी (E10) सक्षम असलेल्या जुन्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरल्यास गाड्यांच्या इंजिनमधील रबरचे महत्त्वाचे भाग खराब होऊ शकतात. हा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही, मात्र त्याच्या सारांशातून अनेक गंभीर मुद्दे समोर आले आहेत, जे भारतीय रस्त्यांवरील जवळपास 80 टक्के वाहनांच्या सुरक्षेशी संबंधित आहेत.

इंजिनच्या भागांचे नुकसान; ऑटो कंपन्यांच्या चाचणीत त्रुटी आढळल्या

या अभ्यासाचा भाग म्हणून देशातील दोन मोठ्या कार उत्पादक कंपन्यांनी इंजिनच्या क्षमतेची तपासणी केली होती. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या चाचणीत खालील गोष्टी आढळल्या:

  • व्हॉल्व्ह खराब झाला: एका कंपनीच्या इंजिनची 400 तास चाचणी घेतली असता त्यात कोणतीही अडचण आली नाही. मात्र, दुसऱ्या बाजूला एका बीएस-VI (BS-6) टर्बोचार्ज्ड इंजिनची एकूण 809 तास चाचणी घेतली असता, त्याच्या एक्झॉस्ट व्हॉल्व्हचे गंभीर तांत्रिक नुकसान झाले.
  • धातू सुरक्षित, रबरला धोका: एआरएआयच्या अभ्यासानुसार, या पेट्रोलमुळे इंजिनमधील धातूच्या (मेटल) भागांवर कोणताही वाईट परिणाम होत नाही. परंतु, ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स’ (SIAM) च्या मते, इंधनाच्या पाईपलाईनमधील रबरचे होज, गॅस्केट, सील आणि ओ-रिंग्ज यांसारखे मऊ भाग वेगाने सडू लागतात. परिणामी, हे भाग बदलावे लागण्याची शक्यता वाढते.

मायलेजमध्ये घट; जंतरमंतरवर वाहनप्रेमींचे आंदोलन

देशातील बहुतांश वाहने, विशेषतः 2023 पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व गाड्या केवळ 10 टक्के इथेनॉल क्षमतेच्या डिझाईननुसार बनवल्या गेल्या आहेत. अनेक वाहनधारकांनी आधीच तक्रार केली आहे की, या नवीन पेट्रोलमुळे गाड्यांच्या मायलेजमध्ये थेट 2% ते 6% पर्यंत घट झाली आहे, तसेच इंजिनचे पार्ट्स लवकर खराब होत आहेत. सरकारने हे दावे फेटाळले असले तरी वाहनप्रेमींनी आता याविरोधात रस्त्यावर उतरण्यास सुरुवात केली आहे.

नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे या इथेनॉल सक्तीविरोधात ‘टीम भारत’ या संघटनेच्या बॅनरखाली पहिले प्रत्यक्ष आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध रॅली ड्रायव्हर रतन धिल्लन यांनी सांगितले की, “इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचे इंधन फिल्टर आणि संपूर्ण पाईपलाईन जाम होत आहे. याचे ठोस पुरावे आमच्याकडे असून आम्ही हा लढा न्यायालयात घेऊन जाणार आहोत.” सरकारने इथेनॉल संदर्भातील सर्व शोधनिबंध आणि अहवाल जनतेसाठी जाहीर करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

२०२५ पासून सर्व नवीन गाड्यांसाठी बंधनकारक; काय आहेत अहवालातील मुख्य मुद्दे?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या इथेनॉल प्रकल्पाचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत. केंद्र सरकारच्या नियमांनुसार, 2023 पासून सर्व कंपन्यांनी E20 पूरक गाड्यांचे उत्पादन सुरू केले आहे आणि एप्रिल 2025 पासून सर्व नवीन वाहने यासाठी पूर्णपणे सक्षम असणे बंधनकारक केले आहे. मात्र, 2010 पासून रस्त्यावर धावणाऱ्या जुन्या गाड्यांचे काय? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

एआरएआय (ARAI) अहवालातील प्रमुख निष्कर्ष:

  1. मायलेजवर परिणाम: जुन्या गाड्यांमध्ये E20 पेट्रोल वापरल्यास इंधनाचा वापर वाढतो आणि मायलेज 2 ते 6 टक्क्यांनी कमी होते.
  2. बीएस-४ दुचाकींना त्रास: बीएस-IV (BS-4) श्रेणीतील दुचाकी गाड्या सुरू करताना (स्टार्टेबिलिटी) आणि चालवताना समस्या येत असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे.
  3. पुढील अभ्यास सुरू: सरकारने आता सध्याच्या गाड्यांवर 25 टक्के इथेनॉल (E25) मिश्रणाचा काय परिणाम होतो, याच्या अभ्यासाची जबाबदारी देखील एआरएआय संस्थेकडे सोपवली आहे.

त्यामुळे जर तुमच्याकडे 2023 पूर्वीचे कार किंवा बाईकचे मॉडेल असेल, तर तुमच्या गाडीच्या इंधन पाईपलाईन आणि रबर पार्ट्सची नियमित तपासणी करणे आता आवश्यक झाले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या