Home / देश-विदेश / Rajnath Singh : राजनाथ सिंह यांची राजकारणातून निवृत्ती?केंद्रीय मंत्रिमंडळात आता आयारामांना संधी?

Rajnath Singh : राजनाथ सिंह यांची राजकारणातून निवृत्ती?केंद्रीय मंत्रिमंडळात आता आयारामांना संधी?

Rajnath Singh : नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात फेरबदलाची तयारी झाली आहे. या फेरबदलात देशाचे संरक्षण मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

Rajnath Singh : नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात फेरबदलाची तयारी झाली आहे. या फेरबदलात देशाचे संरक्षण मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांना वगळले जाण्याची चर्चा आहे. त्यांना पुढे राष्ट्रपती पद दिले जाईल असे सांगितले जात असले तरी त्याची शक्यता नाही. राजनाथ सिंह यांचे 10 जुलैला 75 वय पूर्ण होते हेही कारण सांगितले जाते. पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षा ज्येष्ठ असलेले नेते एकेक करून बाजूला जात आहेत. सुषमा स्वराज, अरूण जेटली व मनोहर पर्रिकर यांचे निधन झाले. लालकृष्ण अडवाणी यांना सल्लागार पदावर ठेवले. आता राजनाथ सिंह यांना मंत्रिपदावरून दूर करणे हे एक प्रकारे त्यांना सक्रिय राजकारणातून निवृत्त करण्यासारखेच असेल.
केंद्रीय मंत्रिमंडळात बदल होणार असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. या फेरबदलात उत्तर प्रदेश आणि पंजाबसारख्या महत्त्वाच्या राज्यांत 2027 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या राज्यातील नेत्यांना मंत्रिपद देतील अशी शक्यता आहे. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गटातील नेत्यांना अधिक प्रतिनिधित्व मिळू शकते, अशीही चर्चा आहे. केंद्रात तरुण मंत्री यावेत असे धोरण असल्याचे सांगितले जात आहे.
राजनाथ सिंह भाजपामधील सर्वाधिक अनुभवी आणि वरिष्ठ नेत्यांपैकी एक मानले जातात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री आणि सध्याचे संरक्षण मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. त्यांना निवृत्त केल्यावर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या पारंपरिक लखनौ लोकसभा मतदारसंघातून त्यांचे पुत्र नीरज सिंह यांना उमेदवारी दिली जाईल. राजनाथ सिंह यांचे दोन्ही पुत्र सक्रिय राजकारणात आहेत.
भाजपात वयाच्या 75 वर्षांनंतर नेत्याने निवृत्त व्हावे, असा अलिखित संकेत आहे. यानुसार वयाची पंचाहत्तरी पूर्ण करणारे लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन यांना सक्रिय राजकारणातून निवृत्त व्हावे लागले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गेल्या वर्षी वयाची 75 वर्षे पूर्ण केली. परंतु त्यांनी आपली निवृत्ती जाहीर केलेली नाही. मात्र, आता राजनाथ सिंह यांना तो नियम लागू करून त्यांना सक्रिय राजकारणापासून निवृत्त केले जात आहे, अशी चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी राजनाथ सिंह यांना याविषयी विचारले असता ते म्हणाले होते की, भाजपात असा कोणताही नियम नाही. यापूर्वी वयाची 75 वर्षे पूर्ण करणाऱ्या अनेक नेत्यांनी निवडणूक लढवली आहे.
या फेरबदलाच्या बाबतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, मंत्रिमंडळ आता अधिक तरुण असेल. सरासरी वय भाजपा अध्यक्षांच्या वयाच्या आसपास म्हणजे 46 वर्षे असेल. परंतु 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना बाहेर जावेच लागेल. काही जणांचा अपवादच केला जाईल. त्यामुळे हा नियम पंतप्रधान पदासाठी लागू होणार नाही. याशिवाय इतर पक्षांमधून फुटून एनडीत आलेल्या खासदारांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे. यात पंजाबमधून फुटून भाजपात आलेले आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार, उबाठामधून फुटून शिंदे गटात आलेले लोकसभेचे खासदार आणि पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदारांचा समावेश आहे.
पाच मंत्र्यांना फटका
संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलाचा अर्थमंत्री निर्मला सीतारामन, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, राज्यमंत्री पंकज चौधरी आणि हर्ष मल्होत्रा या पाच मंत्र्यांना फटका बसू शकतो. यातील धर्मेंद्र प्रधान तसेच हरदीप सिंग पुरी यांच्या खात्यांमध्ये बदल करून त्यांना नव्या जबाबदाऱ्या दिल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नीट पेपरफुटीनंतर धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून शिक्षण मंत्रालय काढून घेतले जाईल, अशी चर्चा आहे. मात्र, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता कमी आहे. हरदीप पुरी यांचे नाव एपस्टिन फाईलमध्ये आले होते. याशिवाय त्यांचे वय 74 आहे. वयाच्या मुद्यावर त्यांना मंत्रिपद सोडावेही लागू शकते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याबाबत कोणतीही नाराजी नसली तरी 2029 पूर्वी अर्थव्यवस्थेबाबत नवीन निर्णय घ्यायचे असल्याने नवीन चेहरा हवा आहे. सितारामन यां च्यावर दक्षिणेचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली जाईल. त्यांची जागा शक्तिकांत दास येऊ शकतात. सध्या ते पंतप्रधानांचे प्रधान सचिवआहेत. अर्थमंत्री म्हणून वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या नावाचीही चर्चा आहे. पंकज चौधरी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि उत्तर प्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. भाजपामध्ये दोन पदांचे धोरण नाही. तसेच नवीन लोकांना पद देण्यासाठी जागाही हवी असल्याने पंकज प्रदेशाध्यक्षपदी राहतील, पण त्यांना मंत्रीपद सोडावे लागेल. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय तसेच कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा दिल्ली भाजपाचे अध्यक्ष आहेत. त्यांना एक पद सोडावे लागेल.

Web Title:
For more updates: stay tuned with Navakal
संबंधित बातम्या