Sourav Ganguly ICC Hall of Fame: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘दादा’ या नावाने जगभरातील क्रिकेट रसिकांच्या मनावर राज्य करणारा सौरव गांगुली याला त्याच्या 54 व्या वाढदिवसाच्या दिवशी आयसीसीने (ICC) एक अनोखी आणि ऐतिहासिक भेट दिली आहे. एडिनबर्ग येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वार्षिक परिषदेत सौरव गांगुलीचा ‘आयसीसी हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
या सन्मानासह आयसीसीच्या या प्रतिष्ठित यादीत स्थान मिळवणारा सौरव गांगुली हा आता 12 वा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. या बहुमानाबद्दल गांगुलीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (X) पोस्ट शेअर करत आयसीसी आणि आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांचे मनापासून आभार मानले आहेत. हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान असून महान खेळाडूंच्या यादीत स्थान मिळणे अभिमानास्पद आहे, अशा भावना त्याने व्यक्त केल्या.
हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवणारे इतर भारतीय दिग्गज
सौरव गांगुलीच्या आधी भारताच्या एकूण 11 महान क्रिकेटपटूंना या यादीत स्थान मिळाले आहे. आता गांगुलीच्या समावेशानंतर ही संख्या 12 झाली आहे:
- पुरुष क्रिकेटपटू: बिशन सिंग बेदी, सुनील गावस्कर, कपिल देव, अनिल कुंबळे, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, विनू मंकड, वीरेंद्र सेहवाग आणि महेंद्रसिंग धोनी.
- महिला क्रिकेटपटू: डायना एडलजी आणि नितू डेव्हिड.
मॅच फिक्सिंगच्या संकटातून भारतीय क्रिकेटला बाहेर काढले
सौरव गांगुलीचे भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठे योगदान म्हणजे वर्ष 2000 ते 2005 या काळातील त्याचे कर्णधारपद मानले जाते. जेव्हा भारतीय क्रिकेट संघ मॅच फिक्सिंगच्या मोठ्या संकटाशी सामना करत होता, अशा कठीण प्रसंगी गांगुलीने संघाची धुरा सांभाळली.
त्याने संघात अनेक तरुण खेळाडूंना संधी दिली आणि टीम इंडियाला परदेशातही निर्भयपणे जिंकणारा संघ बनवले. लॉर्ड्सच्या बाल्कनीमध्ये 2002 च्या नॅटवेस्ट ट्रॉफीच्या फायनलमध्ये ऐतिहासिक विजयानंतर टी-शर्ट काढून हवेत फडकवलेले गांगुलीचे ते दृश्य आजही क्रिकेट इतिहासातील सर्वात आयकॉनिक क्षण मानले जाते.
गांगुलीची क्रिकेट कारकीर्द आणि प्रशासकीय वाटचाल
सौरव गांगुलीने नोव्हेंबर 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला शेवटचा कसोटी सामना खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याची एकूण आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
क्रिकेट प्रशासन: निवृत्तीनंतर गांगुलीने क्रिकेट प्रशासनात पाऊल ठेवले. तो 23 ऑक्टोबर 2019 ते 18 ऑक्टोबर 2022 या काळात बीसीसीआयचा (BCCI) अध्यक्ष होता. सध्या तो क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे (CAB) अध्यक्षपद सांभाळत आहे.
कसोटी क्रिकेट: गांगुलीने 113 कसोटी सामने खेळताना 7,212 धावा केल्या.
एकदिवसीय क्रिकेट (ODI): 311 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर तब्बल 11,363 धावांची नोंद आहे.










