Ramesh Mhatre Case : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात एका नवजात बालकाला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा (रेफर करण्याचा) वैद्यकीय सल्ला दिल्यामुळे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना अमानुषपणे मारहाण झाल्याची संतापजनक घटना घडली होती. शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका महिला डॉक्टरसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर केलेल्या या भ्याड हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपींसह चौघांना गजाआड केले आहे. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली असली, तरी या घटनेने वैद्यकीय क्षेत्रासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. या पार्श्वभूमीवर, पीडित तरुण डॉक्टरच्या ‘एकल मातेने’ (सिंगल मदर) लिहिलेली एक अत्यंत भावुक आणि तितकीच कायदा व्यवस्थेचे वाभाडे काढणारी निनावी पोस्ट सध्या समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत असून, ती वाचून अनेकांचे डोळे पाणावले आहेत.
अडीच वर्षांचा असताना वडिलांचे छत्र हरवले; आयुष्यभराचा संघर्ष एका झटक्यात मातीत
पीडित डॉक्टरच्या आईने आपल्या पत्रात स्वतःच्या आयुष्यातील संघर्षाला वाट मोकळी करून दिली आहे. त्या लिहितात, “माझा मुलगा अवघा अडीच वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे छत्र हरवले. एक विधवा महिला म्हणून मी काळजावर दगड ठेवून, प्रचंड हालअपेष्टा सहन करत माझ्या या पोटच्या गोळ्याला लहानाचे मोठे केले. समाजात रुग्णांची सेवा करावी, या उदात्त हेतूने मी स्वतःच्या हिंमतीवर त्याला लाखो रुपये खर्च करून डॉक्टर बनवले. ज्या मुलाला मी उभ्या आयुष्यात कधी पाच बोटांनी स्पर्शही केला नाही, त्याला सत्तेचा माज असलेल्या ७३ वर्षांच्या म्हाताऱ्या नगरसेवकाने आपल्या गुंडांच्या टोळीसह येऊन प्राण्यासारखे मारहाण केली.”
चार गाड्या भरून आलेली गुंडांची टोळी; संभाजी महाराजांच्या बलिदानाचा दिला दाखला
या पत्रात आईने घटनेच्या पूर्वकल्पित नियोजनावर (प्री-प्लॅनिंग) बोट ठेवले आहे. “रुग्णाच्या आईने जरी चिथावणी दिली असली, तरी एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून परिस्थिती समजून घेणे गरजेचे होते. मात्र, म्हात्रे हा जाणीवपूर्वक ४ गाड्या भरून गुंडांची टोळी घेऊन आला. काही गुंड मुख्य प्रवेशद्वारावर, काही पोर्चमध्ये, तर काही प्रसूती कक्षाबाहेर तैनात होते,” असा आरोप त्यांनी केला.
मारहाणीच्या भीषणतेचे वर्णन करताना आईचे काळीज धाय मोकलून रडले. त्यांनी लिहिले, “माझ्या निष्पाप बाळावर एकूण ३१ वार करण्यात आले. म्हात्रेचे ७ वार, ३ किलोच्या जड रजिस्टरने डोक्यात मारल्यामुळे आलेली सूज, अंगरक्षकाने अवघड जागी मारलेली लात आणि इतर फुकटच्या तुकड्यांवर जगणाऱ्या गुंडांचे वार… हे सर्व पाहून मला औरंगजेबाच्या पाळलेल्या कुत्र्यांची आणि छत्रपती संभाजी महाराजांवर झालेल्या अत्याचाराची आठवण झाली.”
“महिला डॉक्टरवर हात उगारताना कसला पुरुषार्थ?”
तिथे कर्तव्य बजावत असलेल्या आणि म्हात्रेच्या नातीसारख्या वय असणाऱ्या डॉ. सृष्टी यांच्या कानफटात जेव्हा या मग्रूर नेत्याने लगावली, तेव्हा तिच्या रक्षणासाठी माझा मुलगा पुढे झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि स्त्री रक्षणाचे जे संस्कार मी त्याच्या नसात पेरले होते, त्याच संस्कारांची किंमत आज त्याला मोजावी लागली, असे आईने अत्यंत अभिमानाने आणि वेदनेने नमूद केले.
मानसिक धक्क्यात असलेला डॉक्टर मुलगा; ‘वरच्या न्यायालयाचा’ दिला इशारा
या भयंकर घटनेला आठवडा उलटून गेला तरी पीडित डॉक्टर या अत्यंत भीषण मानसिक धक्क्यातून (Mental Shock) बाहेर आलेला नाही. तो आठ दिवस झाले खाटेच्या खालीही उतरलेला नाही आणि झोपेतही स्वतःच्या बचावासाठी डोक्यावर हात घेतो, अशी विदारक स्थिती आईने मांडली आहे. तसेच या प्रकरणात नगरसेवकासोबत असलेल्या शासकीय पोलीस रक्षकानेही (पोलीस गार्ड) मारहाणीत भाग घेतल्यामुळे त्यांनी कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.











