Home / महाराष्ट्र / Kolhapur Asmita Katkar Death : तो महागडा पाळणा, मुलाच्या कपड्यांची खरेदी अन् अस्मिताचा संशयास्पद मृत्यू…हुंड्यापायी आणि वंशाच्या दिव्यासाठी आणखी एक बळी?

Kolhapur Asmita Katkar Death : तो महागडा पाळणा, मुलाच्या कपड्यांची खरेदी अन् अस्मिताचा संशयास्पद मृत्यू…हुंड्यापायी आणि वंशाच्या दिव्यासाठी आणखी एक बळी?

Kolhapur Asmita Katkar Death : कोल्हापूर शहरातील राजारामपुरी परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या एक...

By: Team Navakal
Kolhapur Asmita Katkar Death :
Social + WhatsApp CTA

Kolhapur Asmita Katkar Death : कोल्हापूर शहरातील राजारामपुरी परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या एक महिन्याच्या चिमुरडीचे बारसे (नामकरण सोहळा) संपन्न होण्यापूर्वीच, तिच्या २४ वर्षीय माऊलीने राहत्या घरी गळफास लावून आपला जीवनप्रवास संपवला. अस्मिता प्रतीकसिंह काटकर असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. रविवारी (१२ जुलै) दुपारी चार वाजेच्या सुमारास घरात मुलीच्या बारशाच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी आणि लगबग सुरू असतानाच अस्मिताने छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेतला. या घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्हा हादरला असून, मृत अस्मिताच्या पालकांनी सासरच्या मंडळींवर हुंडा आणि छळाचे अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

“मुलगी झाल्याने छळ वाढला; हुंड्यासाठी केली हत्या” – माहेरच्यांचा गंभीर आरोप
अस्मिताच्या मृत्यूनंतर तिच्या आई-वडिलांनी सासरच्या लोकांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे. “आमच्या मुलीने केवळ आत्महत्या केली नसून, तिची सासरच्यांनीच हत्या केली आहे,” असा खळबळजनक आरोप तिच्या पालकांनी केला. वर्षभरापूर्वीच अस्मिताचे लग्न झाले होते. सासरची आर्थिक स्थिती अत्यंत सधन असतानाही, लग्नानंतर काही दिवसांतच तिच्याकडे वारंवार पैशांची मागणी केली जात होती. पालकांनी यापूर्वी रोख रक्कम आणि ऑनलाइन पद्धतीने सासरच्यांना मोठी रक्कम पाठवली होती.

नुकतेच अस्मिताने एका सुंदर मुलीला जन्म दिला. मात्र, सासरच्या मंडळींना मुलगा हवा असल्याने त्यांनी आधीपासूनच मुलाचे कपडे खरेदी करून ठेवले होते. मुलगी झाल्याने त्यांचा रोष अधिकच वाढला आणि त्यांनी अस्मिताला मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर, आगामी बारशाच्या कार्यक्रमासाठी ५२ हजार रुपयांचा महागडा पाळणा ऑनलाइन ऑर्डर करून, त्या सोहळ्याचा सर्व खर्च अस्मिताच्या माहेरच्यांनीच करावा, यासाठी तिच्यावर प्रचंड तगादा लावला होता.

“सासू, सासरा, नवरा आणि नणंदनेच तिचा जीव घेतला”
अस्मिताच्या वडिलांनी आपल्या मुलीशी झालेल्या शेवटच्या संभाषणाची आठवण सांगताना सांगितले की, “शुक्रवारी माझे अस्मिताशी शेवटचे बोलणे झाले होते. सासरचे लोक बारशाचा कार्यक्रम अत्यंत भव्य प्रमाणावर करण्यासाठी दबाव टाकत असल्याचे तिने सांगितले. त्यावर मी तिला समजावले की आता लगेच एवढा मोठा खर्च करणे कठीण आहे.” या सततच्या आर्थिक दबावामुळे आणि मानसिक त्रासामुळेच सासू, सासरा, पती आणि नणंद या चौघांनी मिळून अस्मिताचा जीव घेतला, असा थेट आरोप तिच्या आईने केला आहे.

गळ्यावर जखमा; न्यायाधीशांच्या उपस्थितीत होणार शवविच्छेदन
घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत अस्मिताच्या गळ्यावर काही संशयास्पद जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी पोलिसांनी शरीराचे अंतर्गत अवयव (व्हिसेरा) पुढील रासायनिक विश्लेषणासाठी राखीव ठेवले आहेत.

कायद्यानुसार न्यायाधीशांच्या उपस्थितीत पंचनामा-
भारतीय कायद्यानुसार, जर एखाद्या विवाहितेचा लग्नानंतर सात वर्षांच्या आत संशयास्पद मृत्यू झाला, तर तिचा पंचनामा आणि शवविच्छेदन (Post-Mortem) हे दंडाधिकारी (न्यायाधीश) आणि विशेष पंचांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत करणे अनिवार्य असते. त्यानुसार आज, सोमवारी सकाळी न्यायाधीशांच्या उपस्थितीत हा पंचनामा पूर्ण केला जाणार आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या