Warkari woman killed : आषाढी वारीदरम्यान जेजुरीजवळील भोंगळे मळा येथे आज सकाळी भीषण अपघात झाला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत पायी चालणार्या वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसल्याने 12 वारकर्यांना धडक बसली. यात तीन महिला वारकर्यांचा जागीच मृत्यू झाला. नऊ वारकरी जखमी झाले आहेत. यात दोघांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडचा मुक्काम आटोपून जेजुरीकडे निघाली असताना हा अपघात घडला. सकाळच्या वेळी वारकर्यांची दिंडी निघाल्याने सासवड-जेजुरी मार्गावर सुरक्षेच्या कारणास्तव एकाच बाजूने वाहतूक सुरू होती. याच दरम्यान वारकर्यांचे साहित्य वाहून नेणार्या ट्रकचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने पायी चालणार्या वारकर्यांना जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, अनेक वारकरी चिरडले गेले. ट्रक हा वारकर्यांचे सामानच घेऊन चालला होता. चालकही वारकरीच होता. या चालकाने तापाच्या गोळ्या घेतल्याने त्याला ग्लानी आली आणि त्याचे नियंत्रण सुटले असे सांगितले जात आहे. या दुर्घटनेत सांगली जिल्ह्यातील कासबे डिगराज येथील दिंडीतील राजश्री शंकर भोसले, माधवी राजाराम सरवडे आणि नंदा पवार या तीन महिला वारकर्यांचा मृत्यू झाला.
अपघातग्रस्त दिंडी नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ महाराज पोखरबिशीकर यांच्या नेतृत्वाखाली होती. अपघातानंतर स्थानिक नागरिक व इतर वारकर्यांनी तत्काळ मदतकार्य हाती घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयात जाऊन जखमी वारकर्यांची भेट घेतली व त्यांच्या उपचारांबाबत अधिकार्यांना आवश्यक सूचना दिल्या. वारकर्यांची सुरक्षितता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. आजच्या दुर्घटनेनंतर सांगली बंद करण्यात आले.
दरम्यान, वारीदरम्यान जेजुरी परिसरात आणखी एक अपघात घडला. दुचाकीच्या धडकेत एका दिंडीप्रमुखाला दुखापत झाली. या सलग घटनांमुळे वारी मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाढती वाहतूक, अपुरा बंदोबस्त आणि नियोजनातील त्रुटी यामुळे वारकर्यांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
सुनेत्रा पवार म्हणाल्या की, आत्ताच मी वारीदरम्यान झालेल्या अपघातातील महिलांना भेटून आले. ही अत्यंत वेदनादायक आणि दु:खद घटना आहे. एक ट्रक वारीमध्ये घुसल्याने जवळपास नऊ महिला जखमी झाल्या असून, त्यापैकी तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. जखमींनाही भेट दिली असून, काहींना फ्रॅक्चर झाले आहे, तर काहींना किरकोळ मार लागला आहे. सुदैवाने जखमी महिलांची प्रकृती स्थिर आहे. घटना कळताच मी तातडीने येथे दाखल झाले आणि प्रशासनाला त्यांच्या उपचारांसाठी सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सकाळची वेळ असल्याने चालकाने काही औषधे घेतली असावीत, असे सांगितले जात आहे. तपासानंतर याबाबत अधिक माहिती मिळेल.
पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले की, ट्रक चालकाचा कंट्रोल सुटल्यामुळे हा अपघात झाला. तो वेगात जात होता आणि त्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. पुढे अशा घटना टाळण्यासाठी अधिक काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, आषाढी वारीदरम्यान वारकर्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी शासन पार पाडण्यात अपयशी ठरले आहे. गेल्या काही वर्षांत वारीतील अपघातांचे प्रमाण वाढत आहे. भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार हे सरकारला घरचा आहेर देत म्हणाले की, वारकर्यांच्या जीवाची काळजी घेतली पाहिजे. अशा घटना दरवर्षी होणे योग्य नाही. केवळ आर्थिक मदत देऊन प्रश्न
सुटत नाही.
अपघातात मृत्यू झालेल्या वारकर्याच्या कुटुंबाला मदत केली तरी त्या व्यक्तीची भरपाई होऊ शकत नाही. त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, वारकरी बांधव-भगिनींनीही दिंडीमध्ये चालताना स्वतःची काळजी घ्यावी. लाखो वारकरी एकत्र असताना काही नियम पाळणे गरजेचे आहे. अपघात होऊ नयेत, ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र अशा घटना घडल्यास त्याचा दिंडीवर परिणाम होतो.
वारीत ट्रक नक्की
कोणी चालवला?
या भीषण अपघातावेळी ट्रक नेमका कोण चालवत होता, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ट्रक चालक हा नांदेडचा असून, सुमारे 70 वर्षीय ज्येष्ठ वारकरी असल्याचे सांगण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर नसल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, या घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या काही वारकर्यांनी वेगळाच दावा केला आहे. त्यांच्या मते, ट्रक चालक वयोवृद्ध व्यक्ती नव्हती तर एक तरुण ट्रक चालवत होता. अपघातानंतर जमावाच्या संतापापासून वाचवण्यासाठी पोलिसांनी त्या तरुण चालकाला बाजूला नेले, असे त्यांचे म्हणणे आहे. या परस्परविरोधी दाव्यांमुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.









