Metabolic Glow Tips: अनेक जण त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या महागड्या स्किन केअर प्रॉडक्ट्सवर हजारो रुपये खर्च करतात. परंतु, त्वचेची खरी चमक ही केवळ बाहेरून लावल्या जाणाऱ्या क्रीम्सवर अवलंबून नसते. आपला रोजचा आहार, पचनसंस्था, झोप आणि मानसिक आरोग्य याचा थेट संबंध त्वचेच्या आरोग्याशी असतो.
जेव्हा शरीराची पचनसंस्था आणि ऊर्जा निर्माण करण्याची प्रक्रिया उत्तम असते, तेव्हा चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसते. या अंतर्गत प्रक्रियेमुळे येणाऱ्या नैसर्गिक तजेल्याला ‘मेटाबॉलिक ग्लो’ म्हटले जाते.
शरीरातील पचनक्रिया आपण खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर आवश्यक पोषक तत्वांमध्ये करते. हे पोषक घटक आणि ऑक्सिजन रक्ताभिसरणाद्वारे त्वचेच्या पेशींपर्यंत पोहोचतात. जेव्हा ही प्रक्रिया मंदावते, तेव्हा शरीरात विषारी घटक जमा होऊ लागतात, ज्याचा थेट परिणाम चेहऱ्यावर पुरळ, डाग आणि निस्तेजपणाच्या स्वरूपात दिसून येतो.
त्वचेचे शत्रू ठरणारे ‘हे’ पदार्थ आजच आहारातून वगळा
जर तुम्ही चेहऱ्यावरील पिंपल्स आणि इतर समस्यांमुळे त्रस्त असाल, तर तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये खालील बदल करणे अत्यंत गरजेचे आहे:
- अति गोड पदार्थ: कोल्ड ड्रिंक्स, मिठाई, चॉकलेट, बिस्किटे आणि पांढरा ब्रेड यांसारखे पदार्थ रक्तातील साखरेचे प्रमाण वेगाने वाढवतात. यामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि पिंपल्स वाढतात.
- डेअरी प्रॉडक्ट्स: काही लोकांच्या शरीरात फुल-क्रीम दूध, चीज आणि लोणी यांसारख्या पदार्थांमुळे अंतर्गत सूज निर्माण होते आणि त्वचेची छिद्रे बंद होतात.
- जंक फूड आणि पेये: तळलेले पदार्थ, अति मसालेदार जेवण, चहा, कॉफी आणि अल्कोहोलचे अतिसेवन त्वचेतील विषारी घटक वाढवून पुरळ येण्याची समस्या अधिक गंभीर करतात.
मानसिक ताणतणाव आणि त्वचेचा थेट संबंध
अतिशय जास्त मानसिक ताण, चिंता आणि थकवा यामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. याचा थेट परिणाम त्वचेवर दिसून येतो, ज्यामुळे अकाली वृद्धत्व, कोरडेपणा आणि चेहरा निस्तेज दिसू लागतो. सततच्या तणावामुळे रात्रीची झोपही व्यवस्थित होत नाही, ज्यामुळे चेहऱ्याचा नैसर्गिक ग्लो कमी होतो. याउलट, सकारात्मक विचार, ध्यान आणि मानसिक शांततेमुळे पचनसंस्था व्यवस्थित कार्य करते आणि त्वचा निरोगी राहते.
निसर्गाच्या जवळ जा; जीवनशैलीत करा हे सोपे बदल
आहारतज्ज्ञांच्या मते, संतुलित दिनचर्या आणि योग्य आहाराच्या मदतीने त्वचेच्या अनेक समस्या मुळापासून संपवता येतात. त्यासाठी दैनंदिन जीवनात खालील गोष्टींचा अवलंब करा:
व्यायाम आणि झोप: रोज किमान 45 मिनिटे व्यायाम केल्याने शरीरातील रक्तभिसरण सुधारते, ज्यामुळे त्वचेला पुरेसा ऑक्सिजन मिळतो. यासोबतच दररोज 7 ते 8 तासांची शांत झोप घेणे अनिवार्य आहे.
फायबर आणि जीवनसत्त्वे: आहारात ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. यामुळे शरीरातील चांगले बॅक्टेरिया सक्रिय होतात, जे त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करतात.
कोलेजन वाढवणारे घटक: व्हिटॅमिन सी, ई, झिंक आणि अमिनो अॅसिडयुक्त पदार्थांचे सेवन वाढवा, ज्यामुळे त्वचेतील कोलेजनची निर्मिती वाढून सुरकुत्या कमी होतात.
भरपूर पाणी पिणे: दिवसातून योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक लघवीद्वारे बाहेर पडतात आणि त्वचेमध्ये नैसर्गिक ओलावा टिकून राहतो.









