Home / महाराष्ट्र / Mahesh Tutorials Bankrupt: नामांकित महेश ट्युटोरियल्स दिवाळखोरीत; राज्यातील सर्व शाखा अचानक बंद, पालकांचे लाखो रुपये अडकले

Mahesh Tutorials Bankrupt: नामांकित महेश ट्युटोरियल्स दिवाळखोरीत; राज्यातील सर्व शाखा अचानक बंद, पालकांचे लाखो रुपये अडकले

Mahesh Tutorials Bankrupt: खासगी कोचिंग क्षेत्रात गेल्या 38 वर्षांपासून एकहाती वर्चस्व राखणाऱ्या ‘एम.टी. एज्युकेअर लिमिटेड’ (महेश ट्युटोरियल्स) या नामवंत संस्थेचा...

By: Team Navakal
Mahesh Tutorials Bankrupt: नामांकित महेश ट्युटोरियल्स दिवाळखोरीत; राज्यातील सर्व शाखा अचानक बंद, पालकांचे लाखो रुपये अडकले
Social + WhatsApp CTA

Mahesh Tutorials Bankrupt: खासगी कोचिंग क्षेत्रात गेल्या 38 वर्षांपासून एकहाती वर्चस्व राखणाऱ्या ‘एम.टी. एज्युकेअर लिमिटेड’ (महेश ट्युटोरियल्स) या नामवंत संस्थेचा गाशा अचानक गुंडाळला गेला आहे. चांगल्या गुणांची खात्री देणारा क्लास म्हणून मुंबई, पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील पालकांचा या संस्थेवर मोठा विश्वास होता. मात्र, संस्थेने विद्यार्थी किंवा पालकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता राज्यातील आपल्या सर्व शाखा तडकाफडकी बंद करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे.

या अचानक झालेल्या पडझडीमुळे लाखो रुपयांची फी भरून आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करू पाहणाऱ्या पालकांना मोठा मानसिक आणि आर्थिक धक्का बसला आहे. ८ वी ते १० वी (सीबीएसई, आयसीएससी), १२ वी, जेईई आणि नीट यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य यामुळे टांगणीला लागले आहे.

कर्जाचा डोंगर अन् अंतर्गत अनियमितता; संस्था बंद होण्याचे मुख्य कारण

मुळची मुलुंड येथून सुरू झालेली ही संस्था अचानक बंद होण्यामागे मोठी आर्थिक दिवाळखोरी कारणीभूत असल्याचे समोर आले आहे:

  • ऑडिटमधील गंभीर त्रुटी: ३० सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या कंपनीच्या अधिकृत लेखापरीक्षणात (ऑडिट) आर्थिक व्यवहारांमधील गंभीर अनियमिततेचे मुद्दे समोर आले होते. गेल्या २ वर्षांपासून कंपनीची दिवाळखोरीकडे जाण्याची प्रक्रिया अंतर्गत पातळीवर सुरू होती.
  • कोटींचे थकीत कर्ज: कंपनीवर सध्या तब्बल ३२.३३ कोटी रुपयांचे थकीत कर्ज आहे. यासोबतच काही वादग्रस्त कॉर्पोरेट गॅरंटीचे आर्थिक दायित्व देखील कंपनीवर असल्याने संस्था पूर्णपणे आर्थिक अडचणीत सापडली आहे.

बैठकीनंतर तात्काळ अंमलबजावणी; संपर्काचे सर्व मार्ग खंडित

प्राथमिक अहवालानुसार, संस्थेने ७ जुलै रोजी सर्व शाखा चालकांची एक तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर, १० जुलैपासून राज्यातील सर्व शाखा तात्काळ प्रभावाने बंद करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला. महेश ट्युटोरियल्सच्या संपूर्ण महाराष्ट्रात एकूण ६० शाखा कार्यरत होत्या, ज्यापैकी ४० शाखा एकट्या मुंबई महानगर क्षेत्रात होत्या.

सध्या पालकांनी चौकशीसाठी फोन केले असता सर्व शाखांचे दूरध्वनी क्रमांक बंद पडले आहेत. काही ठिकाणी फोनची रिंग वाजत असली, तरी संस्था प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद दिला जात नसल्याने पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

अरिहंत अकॅडमीचा मुंबईतील विद्यार्थ्यांना आधार; फीच्या पैशांवर प्रश्नचिन्ह

या संपूर्ण गोंधळाच्या परिस्थितीत मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबई क्षेत्रातील बाधित विद्यार्थ्यांना आपल्या यंत्रणेत सामावून घेण्याची तयारी ‘अरिहंत अकॅडमी’ या दुसऱ्या कोचिंग संस्थेने दर्शवली आहे.

परंतु, ज्या पालकांनी चालू शैक्षणिक वर्षाची लाखो रुपयांची फी आधीच ॲडव्हान्स म्हणून महेश ट्युटोरियल्सकडे जमा केली आहे, त्या पैशांचे पुढे काय होणार आणि ते पैसे परत मिळणार का, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता समोर आलेली नाही.

Web Title:
For more updates: stay tuned with Navakal
संबंधित बातम्या