Hydrogen Train : भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेच्या प्रवासात आज एक अत्यंत सुवर्णक्षण नोंदवला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणातील ‘जींद-सोनीपत’ या ८९ किलोमीटरच्या रेल्वे मार्गावर देशातील पहिल्या ऐतिहासिक, पर्यावरणपूरक हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेला (Hydrogen Train) हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. या क्रांतीकारी पाऊलामुळे भारतीय रेल्वेमध्ये अत्याधुनिक आणि शून्य प्रदूषण करणाऱ्या हायड्रोजन तंत्रज्ञानाचा अधिकृत श्रीगणेशा झाला आहे. या ऐतिहासिक उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “सध्या संपूर्ण जगातील केवळ तीन ते चार देशांकडेच हायड्रोजनवर रेल्वे चालवण्याचे प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध आहे. अशा जागतिक पातळीवर भारताने स्वदेशी तंत्रज्ञानाच्या बळावर केलेली ही प्रगती प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.”
जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेची वैशिष्ट्ये-
पूर्णपणे भारतामध्ये डिझाइन आणि निर्मिती करण्यात आलेली ही स्वदेशी हायड्रोजन रेल्वे अनेक जागतिक विक्रम आपल्या नावावर करत आहे. या रेल्वेची तांत्रिक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
प्रचंड क्षमता आणि खर्च: सुमारे ८२ कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या अत्याधुनिक रेल्वेची क्षमता १,२०० किलोवॉट असून, ती एकाच वेळी सुमारे २,६०० प्रवाशांना घेऊन प्रवास करू शकते.
जगातील सर्वात शक्तिशाली इंजिन: ही रेल्वे तब्बल ३,२०० हॉर्सपॉवर (HP) क्षमतेची असून, ती सध्या जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन रेल्वे मानली जाते. तसेच, परिचालन अंतराच्या (Operational Distance) दृष्टीनेही ही जगातील सर्वात लांब हायड्रोजन रेल्वे सेवांपैकी एक ठरली आहे.
२१व्या शतकाची ओळख: आपल्या संबोधनात पंतप्रधानांनी रेल्वेच्या प्रवासाचा वेध घेतला. ते म्हणाले, “१९व्या शतकातील रेल्वेची ओळख ही वाफेच्या (Steam) इंजिनामुळे होती. २०व्या शतकात डिझेल आणि विजेवर चालणाऱ्या रेल्वेचे युग आले. आता हे २१वे शतक हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेचे युग म्हणून ओळखले जाईल.”
रेल्वे विद्युतीकरणाचा वेग-
भारतात रेल्वेच्या विद्युतीकरणाची (Railway Electrification) सुरुवात १९२५ मध्ये झाली होती. मात्र, स्वातंत्र्यानंतर २०१४ पर्यंत देशातील केवळ ३० टक्के रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण होऊ शकले होते. याउलट, गेल्या १२ वर्षांच्या कार्यकाळात अत्यंत वेगाने काम करत देशातील तब्बल ९९ टक्के रेल्वे नेटवर्कचे विद्युतीकरण पूर्ण करण्यात आले आहे, जो एक ऐतिहासिक विक्रम आहे. सध्या ही हायड्रोजन रेल्वे प्राथमिक टप्प्यात ८९ किलोमीटरच्या मार्गावर धावणार असून, आगामी काळात संशोधनाच्या माध्यमातून या तंत्रज्ञानाचा खर्च आणखी कमी करून देशभरात तिचा विस्तार केला जाईल, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
“जींदचे तूप अन् घेवर तेच, पण विकासाचा वेग बदलला!”-
जींदच्या स्थानिक संस्कृतीचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले, “जींदचे सुप्रसिद्ध तूप आणि घेवर यांची चव आज पूर्वीसारखीच उत्कृष्ट आहे, मात्र येथील विकासाचा वेग आता पूर्णपणे बदलला आहे.” आज जींद हे भाजप-एनडीएच्या सुशासनाचे (Good Governance) एक उत्तम उदाहरण बनत आहे. या हायड्रोजन रेल्वेच्या आगमनामुळे जींदमधील पायाभूत सुविधांचा विकास होईल आणि येथे मोठ्या प्रमाणावर नवीन उद्योग व व्यवसायांची भरभराट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हरियाणाला १४,००० कोटींची महाभेट; महामार्गांचे लोकार्पण
या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने पंतप्रधानांनी हरियाणा राज्याला १४,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या विविध महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांची मोठी भेट दिली. यामध्ये रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, वारसा संवर्धन प्रकल्प आणि दोन नवीन अत्याधुनिक वैद्यकीय महाविद्यालयांचा (Medical Colleges) समावेश आहे.
या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते खालील महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले:
१. दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेसवे: या महामार्गाच्या हरियाणातील विशेष भागाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
२. जींद-गोहाना राष्ट्रीय महामार्ग: हा राष्ट्रीय महामार्ग आज राष्ट्राला समर्पित करण्यात आला.
३. अंबाला-काला अंब चौपदरी महामार्ग: या नव्या चौपदरी मार्गाचेही उद्घाटन करण्यात आले.










