Home / देश-विदेश / Sonam Wangchuk : २० जुलैचा संसदेवरील मोर्चा जर अपयशी ठरला, तर मी थेट भूत बनून परत येईन; सोनम वांगचूक यांचा निर्धार

Sonam Wangchuk : २० जुलैचा संसदेवरील मोर्चा जर अपयशी ठरला, तर मी थेट भूत बनून परत येईन; सोनम वांगचूक यांचा निर्धार

Sonam Wangchuk : देशातील ‘नीट’ (NEET) वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील पेपरफुटी आणि स्पर्धा परीक्षांमधील वाढत्या गैरव्यवहाराला जबाबदार धरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र...

By: Team Navakal
Sonam Wangchuk
Social + WhatsApp CTA

Sonam Wangchuk : देशातील ‘नीट’ (NEET) वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील पेपरफुटी आणि स्पर्धा परीक्षांमधील वाढत्या गैरव्यवहाराला जबाबदार धरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी लडाखचे ख्यातनाम पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांचे जंतरमंतर येथील अन्नत्याग उपोषण आज विसाव्या (२० व्या) दिवशीही अत्यंत तीव्रतेने सुरू आहे. वाढत्या उपवासामुळे प्रकृती खालावत असतानाही वांगचूक आपल्या भूमिकेवर पूर्णपणे ठाम आहेत. ‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी) या संघटनेच्या वतीने आगामी २० जुलै रोजी संसदेवर एका भव्य निषेध मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच आंदोलनाचा संदर्भ देत सोनम वांगचूक यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक अत्यंत खळबळजनक आणि भावनिक पोस्ट केली आहे. “२० जुलैपर्यंत मी कसातरी जगेल; परंतु हा न्याय हक्काचा मोर्चा जर अपयशी ठरला, तर मी थेट भूत बनून परत येईन,” अशा तीव्र शब्दांत त्यांनी या देशातील तरुण पिढीच्या भविष्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीची उपोषणस्थळी धाव; सुप्रिया सुळेंकडून पाठिंबा
सोनम वांगचूक यांच्या या आंदोलनापासून आतापर्यंत काहीसे अंतर राखून असलेल्या प्रमुख विरोधी पक्षांनी आता आंदोलनाची वाढती तीव्रता पाहून उघडपणे पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेरा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाच्या ज्येष्ठ खासदार सुप्रिया सुळे यांनी आज थेट दिल्लीतील जंतरमंतर उपोषणस्थळी जाऊन वांगचूक यांची भेट घेतली.

खासदार सुप्रिया सुळे यांनी वांगचूक यांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांना आपले उपोषण मागे घेण्याची नम्र विनंती केली. यावेळी ग्वाही देताना सुळे म्हणल्या, “आमच्या पक्षाच्या आठ खासदारांसह ‘इंडिया’ (INDIA) अधिकृत विरोधी आघाडीतील सर्व पन्नास खासदार संसद भवनात आणि संसदेबाहेर तुमच्या या न्याय्य लढ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील.”

“सध्या ही केवळ ठिणगी, वणवा व्हायला वेळ लागणार नाही”
प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर अत्यंत कठोर शब्दांत हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, “आजच्या घडीला या देशाला आणि युवा पिढीला सोनम वांगचूक यांच्यासारख्या प्रामाणिक व लढवय्या नेतृत्वाची नितांत गरज आहे. जेव्हा मी समाजमाध्यमांवर दिल्लीत वांगचूक यांच्या भेटीसाठी जात असल्याचे जाहीर केले, तेव्हा माझ्या बारामती मतदारसंघातील हजारो युवकांनी मला ‘ताई तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या सोबत आहोत’ असे संदेश पाठवले. यावरूनच वांगचूक यांच्या आंदोलनाची सत्यता आणि देशातील त्याची गरज अधोरेखित होते. असे असूनही केंद्र सरकारच्या वतीने एकाही मंत्र्याने साधी सौजन्य भेट घेऊन त्यांची विचारपूस करू नये, ही बाब अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी आहे. हे सरकार पूर्णपणे असंवेदनशील बनले आहे. वांगचूक आणि कॉकरोच जनता पार्टीने पुकारलेली ही लढाई केवळ एक सुरुवात आहे, सध्या ही एक छोटी ठिणगी असून, तिचे रूपांतर वणव्यात व्हायला आता अजिबात वेळ लागणार नाही.”

राजकीय पक्षांची मोठी फळी वांगचूक यांच्या पाठीशी; मनसेचे अमित ठाकरे दिल्लीला रवाना
सोनम वांगचूक यांच्या या आंदोलनाला आता राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरून व्यापक राजकीय समर्थन प्राप्त होताना दिसत आहे. ‘इंडिया’ आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेले काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), आम आदमी पार्टी (आप), समाजवादी पार्टी, पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस (TMC) आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा द्रमुक (DMK) या पक्षांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. याशिवाय, तामिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या ‘तमिळ वेट्टरी कळघम’ (TVK) या पक्षाने आणि महाराष्ट्रातून राज ठाकरे यांच्या ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने’ (मनसे) देखील या आंदोलनाला आपले अधिकृत समर्थन घोषित केले आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल सोशल मीडियावरून वांगचूक यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा दिल्यानंतर, आज त्याचे तात्काळ पडसाद उमटले. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे हे स्वतः सोनम वांगचूक यांची भेट घेण्यासाठी मुंबईहून दिल्लीला रवाना झाले आहेत.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या