I’ll Survive Till July 20, But Return as a Ghost If the March Fails”: Sonam Wangchuk – नीट पेपरफुटी आणि स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहाराला जबाबदार शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी जंतरमंतर येथे उपोषण करत असलेले लडाखचे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक आज विसाव्या दिवशीही उपोषणावर ठाम राहिले. मात्र त्यांची प्रकृती खालावत आहे. आता त्यांना बोलणे अशक्य झाले आहे. त्यांची प्रकृती कधीही ढासळू शकते अशी नाजूक बनली आहे. आज वांगचूक यांनी एक्स पोस्ट केली. त्यात त्यांनी म्हटले की 20 जुलैपर्यंत मी जगणार आहे. पण हा मोर्चा जर अपयशी ठरला तर मी भूत बनून परत येईन. या लढ्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावण्याचा निर्धार वांगचूक यांनी या पोस्टमधून पुन्हा एकदा व्यक्त केला. यामुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे.
दुसरीकडे वांगचूक यांची प्रकृती बिघडू लागल्यानंतर अनेक पक्षांनी त्यांची भेट घेऊन त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी रीघ लावली आहे. परंतु हे पक्ष 20 जुलैच्या मोर्चातही ताकद लावतील असे चित्र नाही . आज अनेक राजकीय पक्ष वांगचूक यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पुढे आले. वांगचूक यांच्या उपोषणापासून आतापर्यंत दूर राहिलेल्या काँग्रेसने आज वांगचूक यांना समर्थन दिले. काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेरा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसद अधिवेशनासाठी दिल्लीत पोहोचल्यावर आज उपोषणस्थळी हजेरी लावली. सुप्रिया सुळे यांनी उपोषणस्थळी जाऊन वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. आमच्या पक्षाच्या आठ खासदारांसह इंडिया आघाडीतील सर्व 50 खासदार तुमच्या पाठीशी उभे राहतील, अशी ग्वाही याप्रसंगी सुप्रिया सुळे यांनी दिली.
सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, या देशाला वांगचुक यांच्यासारख्या लोकांची खूप गरज आहे. इंडिया आघाडीसह या देशातील तमाम युवा वर्ग वांगचुक यांच्या पाठीशी आहे. मी जेव्हा सोशल मीडियावर वांगचुक यांच्या भेटीसाठी दिल्लीला जात असल्याचे सांगितले तेव्हा माझ्या मतदारसंघातील हजारो लोकांनी ताई तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे मेसेज मला पाठवले. यावरून वांगचुक यांच्या आंदोलनाची सच्चाई आणि आवश्यकता किती आहे हे दिसून येते. असे असताना केंद्र सरकारच्या वतीने एकाही मंत्र्याने वांगचुक यांची विचारपूस करू नये ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. हे सरकार अत्यंत असंवेदनशील आहे. वांगचुक आणि कॉकरोच जनता पार्टीने सुरू केलेली ही लढाई फार मोठी आहे. सध्या ठिणगी पडली आहे. त्याचा वणवा व्हायला वेळ लागणार नाही. काल आपचे अरविंद केजरीवाल आणि संजय सिंह यांनी आंदोलनस्थळी येऊन वांगचुकना पाठिंबा
जाहीर केला.
विरोधकांच्या इंडिया आघाडीतील काँग्रेस, उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, आम आदमी पार्टी (आप), समाजवादी पार्टी, पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) या घटक पक्षांसह तामिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचा तमिळ वेट्टरी कळघम (टीव्हीके) आणि राज ठाकरे यांच्या मनसेने आतापर्यंत वांगचुक यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रात वांगचुक यांच्या समर्थनार्थ रविवारी 19 जुलैला शिवतीर्थावर उबाठाचा दुपारी 4 वाजता मोर्चा आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल एक्स पोस्ट करून वांगचुक यांना जाहीर पाठिंबा दिल्यानंतर आज त्याचे पुत्र आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे वांगचुक यांना भेटण्यासाठी दिल्लीला रवाना झाले. उद्या सकाळी 11 वाजता ते जंतरमंतरवर जाऊन वांगचूक यांची भेट घेणार आहेत.
तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर
आमरण उपोषणाच्या आजच्या विसाव्या दिवशी सोनम वांगचूक यांच्याप्रमाणेच त्यांच्या समर्थनार्थ उपोषण करत असलेल्या तीन विद्यार्थ्यांचीही प्रकृती चिंताजनक बनली. ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा, मनिष व अमिन हे असोसिएशनचे सदस्य 28 जूनपासून वांगचूक यांच्यासोबत उपोषण करत आहेत. या तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचा इशारा दिला.
अमिनला डिहायड्रेशनमुळे हायपोव्होमिक शॉकचा धोका आहे. नेहाच्या रक्तामधील साखरेचे प्रमाण 49 मिलिग्रॅम या धोक्याच्या पातळीवर घसरले आहे. तर मनिषचे वजन दहा टक्क्यांनी घटले आहे. जीव गमावण्याचा धोका असतानाही हे विद्यार्थी उपोषणावर ठाम आहेत. या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करणार्या डॉ. तिलोपा यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून म्हटले की, या तिघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली आहे. विशेषतः नेहाची प्रकृती दिवसेंदिवस खूपच खालावत चालली आहे. तिघांच्याही शरीरातील स्नायू आक्रसत चालले आहेत. त्यांना कधीही मल्टिपल ऑर्गन फेल्युअर होण्याचा धोका आहे.

उद्धव-आदित्यचे पोस्टर
उबाठाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आमदार आदित्य ठाकरे यांनी सोनम वांगचूक यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे. मात्र या दोघांपैकी एकही प्रत्यक्ष वांगचूक यांची विचारपूस करण्यासाठी दिल्लीच्या जंतरमंतरवर गेले नाहीत. यावर तिरकस भाष्य करणारा एक फोटो आज सोशल मीडियावर झळकला. सोनम वांगचूक यांना माझा पाठिंबा… आमरण उपोषण… आझाद मैदान , मुंबई असा मजकूर आणि डाव्या बाजूला वांगचूक यांचे छायाचित्र असा बॅनर लावून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मांडीवर डोके ठेवून झोपलेले आदित्य ठाकरे या फोटोत दिसत आहेत.










