FIFA World Cup 2026: रविवारचा दिवस फुटबॉल विश्वासाठी एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरणार आहे. अर्जेंटिना आणि स्पेन या दोन बलाढ्य संघांमध्ये होणारा हा अंतिम सामना केवळ विश्वचषक ट्रॉफीपुरता मर्यादित राहिलेला नाही. यावेळी फुटबॉलच्या इतिहासात पहिल्यांदाच जागतिक फुटबॉल नियामक संस्था म्हणजेच ‘फिफा’ विजेत्या संघाला खास चॅम्पियनशिप अंगठ्या देऊन गौरवणार आहे.
उत्तर अमेरिकेतील क्रीडा संस्कृतीमध्ये विजेत्या संघाला अशा अंगठ्या देण्याची परंपरा 19 व्या शतकापासून चालत आली आहे. यंदाचा विश्वचषक अमेरिकेत होत असल्याने, फिफाने तेथील परंपरेचा मान राखत हा मोठा निर्णय घेतला आहे. नेहमीप्रमाणे विजेत्या संघातील खेळाडूंना सोन्याची पदके तर मिळतीलच, पण अंतिम सामन्यानंतर लगेचच विजेत्या संघाचा कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक यांना तात्पुरत्या अंगठ्या दिल्या जातील.
केवळ 2,026 अंगठ्यांची निर्मिती; डिझाइनमध्ये असेल खास वैशिष्ट्य
फिफाने या ऐतिहासिक अंगठ्यांच्या वितरणाबाबत आणि डिझाइनबाबत खालीलप्रमाणे महत्त्वाची माहिती दिली आहे:
- एकूण अंगठ्या: विजेत्या संघाला नंतर 30 कस्टमाईज्ड अंगठ्या सुपूर्द केल्या जातील.
- डिझाइन: या अंगठीच्या एका बाजूला अधिकृत विश्वचषक ट्रॉफीची प्रतिकृती असेल, तर दुसरी बाजू विजेत्या देशाची ओळख आणि संस्कृती दर्शवणारी असेल.
- मर्यादित संख्या: या वर्षाचे स्मरण म्हणून जगभरात केवळ 2,026 अंगठ्याच तयार केल्या जाणार आहेत. प्रत्येक अंगठीवर एक स्वतंत्र क्रमांक असेल आणि ती एका अधिकृत प्रमाणपत्रासह दिली जाईल.
- सर्वसामान्यांना खरेदीची संधी: विजेत्या संघाला 30 अंगठ्या दिल्यानंतर उरलेल्या 1,996 अंगठ्या सर्वसामान्य क्रीडाप्रेमींसाठी विक्रीसाठी उपलब्ध केल्या जातील. मात्र, फिफाने अद्याप या अंगठ्यांची किंमत जाहीर केलेली नाही.
चॅम्पियनशिप रिंग्जचा 133 वर्षांचा रंजक इतिहास
क्रीडा विश्वात विजेत्यांना अशा प्रकारच्या अंगठ्या देण्याचा इतिहास खूप जुना आणि रंजक आहे:
- सुरुवात (1893): या परंपरेची सुरुवात 1893 मध्ये झाली असे मानले जाते, जेव्हा मॉन्ट्रियल हॉकी क्लबला स्टेनली कपच्या सुरुवातीच्या आवृत्तीदरम्यान साध्या रचनेच्या आणि छोट्या हॉकी स्टिकचे डिझाइन असलेल्या अंगठ्या देण्यात आल्या होत्या.
- बेसबॉल आणि बास्केटबॉल (1920-1940): अमेरिकेतील मेजर लीग बेसबॉल संघानी 1920 च्या दशकात अशा अंगठ्या देणे सुरू केले. तर 1940 च्या दशकाच्या उत्तरार्धात एनबीए (NBA) बास्केटबॉल लीगच्या स्थापनेपासूनच ही परंपरा पाळली जात आहे.
- सुपर बॉल आणि ऑलिम्पिक (1960 पासून): अमेरिकेतील प्रसिद्ध एनएफएल (NFL) च्या सुपर बॉल युगात 1960 पासून चॅम्पियनशिप रिंग्ज दिल्या जातात. याशिवाय अमेरिकेचे ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळाडू तसेच हॉल ऑफ फेमच्या सदस्यांनाही हा बहुमान मिळतो.
सध्या अमेरिकेत व्यावसायिक खेळांपासून ते अगदी कॉलेज, हायस्कूल आणि बालकांच्या क्रीडा स्पर्धांमध्येही विजेतेपद साजरे करण्यासाठी अशा अंगठ्या देण्याची पद्धत सर्रास वापरली जाते. आता हाच ट्रेंड जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल स्पर्धेत पाहायला मिळणार आहे.










