Home / देश-विदेश / Abhijeet Dipke Parents : पोरं शांततेत लढत होती; यांना लेकरू नाही, बायको नाही, कसली दया आणि माया नाही; मोदींना देवाने सुद्बुधी द्यावी- सोनम वांगचूक यांच्या अटकेनंतर अभिजित दिपकेंचे आई-वडील संतप्त

Abhijeet Dipke Parents : पोरं शांततेत लढत होती; यांना लेकरू नाही, बायको नाही, कसली दया आणि माया नाही; मोदींना देवाने सुद्बुधी द्यावी- सोनम वांगचूक यांच्या अटकेनंतर अभिजित दिपकेंचे आई-वडील संतप्त

Abhijeet Dipke Parents : दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर ‘नीट’ (NEET) परीक्षा घोटाळा आणि पेपरफुटीच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनाला शनिवारी सकाळी साडेसात...

By: Team Navakal
Abhijeet Dipke Parents
Social + WhatsApp CTA

Abhijeet Dipke Parents : दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर ‘नीट’ (NEET) परीक्षा घोटाळा आणि पेपरफुटीच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनाला शनिवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास अत्यंत नाट्यमय आणि गंभीर वळण मिळाले. गेल्या २० दिवसांपासून शांततापूर्ण मार्गाने अन्नत्याग उपोषणाला बसलेले ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ सोनम वांगचूक (Sonam Wangchuk) यांना दिल्ली पोलिसांनी बळजबरीने आंदोलन स्थळावरून ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले. या दडपशाहीमुळे जंतरमंतरवर उपस्थित असलेल्या आंदोलकांमध्ये तीव्र असंतोष पसरला. या कारवाईच्या निषेधार्थ ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजित दीपके (Abhijeet Dipke) यांनी तातडीने आमरण उपोषणाची घोषणा करत अन्नत्याग सुरू केला आहे. अभिजित यांच्या या टोकाच्या पाऊलानंतर महाराष्ट्रात राहणाऱ्या त्यांच्या वृद्ध आई-वडिलांची अत्यंत उद्विग्न आणि संतप्त प्रतिक्रिया समोर आली आहे. आपल्या मुलाच्या काळजीपोटी आणि सरकारच्या क्रूर भूमिकेवर बोलताना या पालकांच्या अश्रूंचा बांध फुटला.

“महिना झाला पोरगा घराबाहेर आहे, आम्ही २० तारखेची वाट पाहत होतो” – आईची व्यथा
माध्यमाशी बोलताना अभिजित दीपके यांच्या मातोश्रींनी आपल्या मनातील तीव्र भीती आणि दुःख व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “दिल्लीमध्ये सोनम वांगचूक सरांचे आंदोलन अत्यंत चांगले आणि शांततेच्या मार्गाने सुरू होते. मात्र, आज अचानक पोलिसांनी त्यांना बळजबरीने उचलून नेले. आता वांगचूक सरांना अटक केल्यामुळे माझा मुलगा अभिजितही तिथे आमरण उपोषणाला बसला आहे. एक आई म्हणून मला त्याची प्रचंड काळजी वाटत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून आमचे त्याच्याशी कसलंही बोलणं झालेलं नाही. पोरं तिथे स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, तर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शांततेत आंदोलन करत होती. सरकारने अशा प्रकारे दडपशाही करायला नव्हती पाहिजे, हे अत्यंत चुकीचे आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “आगामी २० तारखेला त्यांचा मोर्चा होणार होता आणि त्यानंतर ते काहीतरी निर्णय घेणारच होते. आम्हीही २० तारीख संपली की लेकरू घरी येईल, याच आशेवर होतो. महिना झाला तो घराबाहेर आहे, आम्ही इथे प्रचंड तणावाखाली आणि टेन्शनमध्ये दिवस काढत आहोत. देशामधले तरुण इतके दिवस रस्त्यावर बसले आहेत, तरीही सरकार या विद्यार्थ्यांच्या मागण्या गांभीर्याने का घेत नाही, हे देवच जाणे.”

“नरेंद्र मोदी जर माणूस असतील, तर देवाने त्यांना सद्बुद्धी द्यावी!” – वडिलांचा घणाघात
अभिजित दिपकेंच्या वडिलांनी अत्यंत आक्रमक आणि संतप्त भूमिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट शब्दांत निशाणा साधला. वडिलांच्या नात्याने आपली चिंता व्यक्त करताना ते म्हणाले, “चार-पाच दिवसांपूर्वी माझी तब्येत बरी नसल्याने अभिजितशी बोलणे झाले होते, त्यानंतर संपर्क झालेला नाही. एक बाप म्हणून मला माझ्या मुलाची चिंता सतावत आहे. या देशाचा जो जबाबदार व्यक्ती गादीवर बसला आहे, त्या नरेंद्र मोदींकडे मी एकच आशा करतो की, देवाने त्यांना सद्बुद्धी द्यावी. देशातील विद्यार्थी जागोजागी उपोषणाला बसले आहेत, मग हे सरकार कोणाच्या मरणाची वाट पाहत आहे का? अजून किती जणांनी जीव दिल्यावर या सरकारला जाग येईल? यांना स्वतःला ना लेकरू आहे, ना बायको आहे; त्यामुळे यांना कोणाची दया, माया आणि आपुलकी काहीच उरलेली नाही.”

पंतप्रधानांच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना ते पुढे म्हणाले, “मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की, नरेंद्र मोदी जर खरोखरच माणूस असतील, पृथ्वीतलावरील ‘मनुष्य’ या प्राणी गटात ते येत असतील, तर देवाने त्यांना बुद्धी द्यावी जेणेकरून ते या विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतील. मनुष्य हा सर्वात बुद्धिमान प्राणी मानला जातो, जो योग्य निर्णय घेऊ शकतो. जर ते योग्य निर्णय घेऊ शकत नसतील, तर त्यांनी स्वतःला मनुष्य म्हणवून घेऊ नये. माझ्या डोळ्यात आज अश्रू आहेत आणि हे त्यांना कळाले पाहिजे. हे आंदोलन करणारे विद्यार्थी काय पाकिस्तानचे आहेत का? ते याच देशाचे नागरिक आहेत. एवढे निर्दयी आणि क्रूर वागणे पंतप्रधानांना शोभत नाही.”

“डोक्यात हिटलरसारखी सत्तेची धुंदी चढली आहे; आम्हीही उपोषणाला जाणार”
सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या हुकूमशाही वृत्तीवर टीका करताना दिपकेंच्या वडिलांनी त्यांची तुलना हिटलरशी केली. “या व्यक्तीच्या डोक्यामध्ये सत्तेची प्रचंड धुंदी चढलेली आहे. हिटलरसारखी ही सत्तेची नशा डोक्यात गेली आहे, पण ही धुंदी एक दिवस लोकशाहीच्या मार्गानेच उतरेल, हे त्यांनी विसरू नये. नीट (NEET) परीक्षेत गैरव्यवहारामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, ते माझे नातेवाईक नव्हते, आमच्या समाजाचेही नव्हते आणि माझ्या स्वतःच्या मुलाने किंवा मुलीनेही ही परीक्षा दिलेली नाही. मला इथे कोणताही जाती-धर्माचा वाद आणायचा नाही, पण या देशातील तरुणांवर अन्याय होत असताना आम्ही शांत बसू शकत नाही,” असे ते म्हणाले.

आपल्या मुलाला या लढ्यात एकटे न सोडण्याचा निर्धार व्यक्त करत दिपकेंच्या आई-वडिलांनी सांगितले की, “अभिजितचे अजून लग्नही झालेले नाही, त्याचा या परीक्षेशी थेट वैयक्तिक संबंध नाही, तरीही तो लाखो मुलांसाठी लढत आहे. आता आम्ही दोघेही दिल्लीला जाणार आहोत आणि आपल्या मुलासोबत, त्या विद्यार्थ्यांसोबत उपोषणाला बसणार आहोत,” अशी उद्विग्न आणि कणखर भूमिका या पालकांनी घेतली आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या