NEET exam paper leak : नीट परीक्षा पेपरफुटी, सीबीएसई परीक्षा पेपरफुटी, विद्यार्थ्यांच्या तणावातून होणाऱ्या आत्महत्या या विरोधात लढा उभारणारा अभिजित दीपके हा तरुण आणि त्यांच्यामागे पित्याप्रमाणे उभे राहणारे सोनम वांगचुक यांच्या ‘चलो संसद आंदोलना’ला आज भारताच्या तरुणाईने अभूतपूर्व साद दिली. लाखो तरुण जंतरमंतरवर पोहोचले, त्यांनी पोलिसांचे भिंतीएवढे उंच बॅरिकेड पार करून संसद भवन परिसरात घेराव टाकला, पोलिसांच्या लाठ्या,अश्रुधूर सहन करीत आपल्या आंदोलनावर ते कायम राहिले. हे ऐतिहासिक आंदोलन होत असतानाच पंतप्रधान मोदी मात्र काही काळ संसदेत थांबून निघून गेले, धर्मेंद्र प्रधान राजीनामा न देता मस्त संसद भवनात बसून होते, विरोधी पक्षांनी आज नीट परीक्षा आणि अयोध्या दानचोरी यावरून लोकसभा व राज्यसभेत गदारोळ माजवला, त्यामुळे दोन्ही सभागृह दुपारी 3 च्या सुमारास स्थगित झाली. त्यानंतर हे नेते आंदोलनात सहभागी होतील हीच अपेक्षा होती, परंतु आपचे तीन नेते,समाजवादी पार्टीची नेता डिंपल यादव व डावे पक्ष वगळता एकाही पक्षाचा नेता आंदोलनात सहभागी झाला नाही. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आंदोलनावर पूर्ण मौन बाळगले. संसद परिसरात त्यांना याबाबत प्रश्न विचारल्यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नसल्याचे सांगितले. प्रियंका गांधी यांनी केवळ शाब्दिक निषेध केला आणि निघून गेल्या, उबाठाने महाराष्ट्रात आंदोलने केली, पण दिल्लीत त्यांचे तीनही खासदार रस्त्यावर उतरले नाहीत, राज ठाकरे हल्ली भलीमोठी पत्र लिहितात, पण आज तरुणाईला प्रत्यक्ष पाठिंब्याची गरज होती तेव्हा ते गायब होते, शरद पवार व सुप्रिया सुळे कुठेही दिसले नाहीत. पोलीस आंदोलनकर्त्या तरुणांना झोडत होती, सत्ताधारी आरामात होते, अशावेळी विरोधकांनी त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहत आंदोलनात चार पावले चालण्याऐवजी सत्ताधाऱ्यांचे छुपे गुलाम असल्याप्रमाणे गप्प राहिले, तरुणाईला त्यांच्या लढ्यात या सर्वांनी एकटे पाडले.

देशभरातून लाखो विद्यार्थी,तरुण-तरुणी काल रात्रीपासून जंतरमंतरवर दाखल होत होते. दुसरीकडे केंद्र सरकारने हे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात केला होता. जंतरमंतरमधून आंदोलक बाहेर पडू नयेत म्हणून पोलिसांनी त्यांना चारही बाजूंनी घेरले होते . उंच उंच बॅरिकेड उभारले होते. सकाळी आंदोलन सुरू झाल्यावर आंदोलकांनी संसद भवनकडे कूच करण्यास सुरुवात करताच पोलिसांनी लाठीमार सुरू केला. अत्यंत अमानुषपणे पोलीस तरुणांना अक्षरशः फोडून काढत होते. शिवाय अश्रुधूर आणि पाण्याचे फवारे मारले जात होते. संपुर्ण जंतरमंतर परिसरात पोलिसांनी सात-आठ फूट उंचीचे बॅरिकेड लावले होते. मात्र तरीही पोलिसांना चकवा देत हजारो आंदोलक संसद भवनावर धडकले. संसद भवनाच्या परिसरातील सर्व रस्त्यांवर आंदोलकांनी गर्दी केली. पार्लमेंट स्ट्रीट, रायसोना स्ट्रीटवर आंदोलक पोहोचले. त्यांची संख्या इतकी प्रचंड होती की, त्यांना अडवणे शक्य नव्हते. त्यामुळे अखेर संसद भवनाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याची नामुष्की मोदी सरकारवर आली. संसदेच्या दोन्ही सभागृहात या मुद्यावर चर्चा घेण्याची तयारी सरकार दर्शवली नाही. त्यामुळे दोन्ही सभागृहांत विरोधकांनी गोंधळ घालून कामकाज बंद पाडले. दुपारी सोनम वांगचुक यांच्या
वांगचुक यांच्या आवाहनाला मान देत अभिजित दीपके याने शनिवारपासून सुरू केलेले उपोषण मागे घेतले. मात्र त्यानंतरही पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.आजपासून सुरू झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांत विरोधकांनी विद्यार्थी आंदोलन व अयोध्या दान चोरी हे मुद्दे उचलून धरले. या मुद्यावर तातडीने चर्चा घेण्याची विरोधकांची मागणी फेटाळली. त्यामुळे अभुतपूर्व गोंधळात दोन्ही सभागृहांचे कामकाम वारंवार तहकूब करावे लागले. दुपारनंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काहीही कामकाज होऊ शकले नाही. कामकाज संपल्यावर विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारवर टीका केली , पण तिथून कुणीही आंदोलनात सहभागी होण्यास गेले नाही. विरोधी पक्षांचे मोठे नेते सरळ घरी निघून गेले.
खरेतर जंतरमंतरवर रविवारी रात्री 11 वाजल्यापासूनच देशभरातून सोमवारच्या आंदोलनासाठी लोक जमा होऊ लागले होते. हजारो विद्यार्थ्यांनी कालची रात्र फुटपाथवरच काढली. सकाळी मोर्चा सुरू झाला तेव्हा आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. जंतरमंतर ते संसद या मार्गावर सुमारे 5 हजार पोलीस, रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवान, दंगल नियंत्रण पथकाचे जवान तैनात करण्यात आले होते. इंटरनेट जॅम केले होते. आंदोलक एवढ्या मोठ्या संख्येने जमा झाले होते की, संसद भवनाकडे जाणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. दिल्लीत चारही मेट्रो स्थानके बंद केली होती. संपूर्ण संसद व जंतरमंतर परिसराला लष्करी छावणीचे रूप आले होते.हातात तिरंगा घेऊन घोषणा देत आंदोलक संसदेच्या दिशेने कूच करत होते. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूर आणि पाण्याचे फवारे मारले.
तरीही पांगलेल्या आंदोलकांचा एक गट पोलिसांना चकवा देत संसद भवनापासून अगदी काही मीटर अंतरापर्यंत जाऊन पोहोचले. त्यामुळे संसद भवन परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. आंदोलक सरकारवर दबाव टाकण्यात यशस्वी ठरले. अखेर सरकारच्या वतीने केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी आंदोलकांना भेटण्याची तयारी दर्शवली. सीजेपीचे आशुतोष रांका आणि सौरभ दास हे नड्डा यांना भेटायला गेले. मात्र या भेटीतून काही निष्पन्न झाले नाही. दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर नड्डांनी 10 मिनिटे वेळ दिला. त्यांना आम्ही निवेदन दिले आहे, असे सीजेपीच्या वतीने सांगण्यात आले व भेटीचा फोटो पोस्ट करण्यात आला.

दुसरीकडे धर्मेंद्र प्रधान यांनी आज गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असे सांगितले जात होते. याप्रसंगी केंद्रीय मंत्री पियुष गोयल हेदेखील उपस्थित होते. सुमारे दीड तास ही बैठक सुरू होती. या बैठकीत काय झाले तेही जाहीर झाले नाही. आजच्या आंदोलनात अभिनेत्री शबाना आझमी, कम्युनिस्ट नेत्या वृंदा करात, चंद्रशेखर आझाद, तृणमूलच्या मोईत्रा, सपाच्या डिंपल यादव, आपचे सिसोदिया, संजय सिंह, आतिषी हे सहभागी झाले होते.
रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरूच राहिल्यानंतर अभिजित दीपके याने पुन्हा जंतरमंतरवर परत येऊन जाहीर केले की, सोनम वांगचुक हे आपले उपोषण आंदोलन सुरूच ठेवणार असून, कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलनही सुरुच राहणार आहे. दरम्यान, आज रात्री दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवरील कॉकरोच जनता पार्टीचे व्यासपीठ काढून टाकले. यामुळे जमिनीवर बसून आंदोलकांनी आपले आंदोलन सुरू ठेवले. दुर्दैवाने सरकारच्या काही हितचिंतकांकडून असे पसरविले जात आहे की, या आंदोलनाला पाकिस्तानातून बळ देण्यात आले. या आंदोलनाचे पाकिस्तानशी कनेक्शन आहे आणि आंदोलनाची माहिती पाकिस्तानहून विविध व्हॉट्सॲप ग्रुपवर पसरविण्यात आली.
निष्ठूर, निर्दयी सरकार
डिंपल यादवांचा घणाघात
हे सरकार अहंकारी, निष्ठूर आणि निर्दयी आहे. निःशस्त्र आंदोलन करणाऱ्या मुलांवर या सरकारने लाठ्या चालवल्या. या देशाच्या इतिहासात अशा प्रकारचे क्रूर सरकार सत्तेवर आले नव्हते. या लोकांना देश संविधानानुसार नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेवर चालवायचा आहे, अशी घणाघाती टीका समाजवादी पार्टीच्या (सपा) नेत्या खासदार डिंपल यादव
यांनी केली.
झुरळे फार खंबीर निघाली
संजय राऊत यांचा टोला
नीट पेपरफुटीवरून सरकारला धारेवर धरणारे शिवसेना उबाठाचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी आजच्या मोर्चावरून केंद्र सरकारला पुन्हा एकदा लक्ष्य केले. सोनम वांगचुक काय आणि अभिजित दीपके काय त्यांना किड्या-मुंग्यांसारखे चिरडून काढू, असे सरकारला वाटले होते.पण झुरळे फार गंभीर निघाली. संपूर्ण देशातून झुरळे बाहेर निघाली. या झुरळांना देशभरातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे, असे राऊत म्हणाले.









