EPF Interest Credit: नोकरदार वर्गासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या कोट्यवधी सदस्यांच्या खात्यात वार्षिक व्याज जमा करण्याची प्रक्रिया आज 15 जुलैपासून सुरू केली आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या वार्षिक 8.25 टक्के या चक्रवाढ व्याजदराने हे पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात पाठवले जात आहेत.
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील सुमारे 34 कोटी सदस्यांच्या खात्यांमध्ये एकूण 1.44 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त व्याजाची रक्कम जमा केली जात आहे. 15 जुलै 2026 पर्यंत बहुतांश कर्मचाऱ्यांच्या खात्यात हा वाढलेला बॅलन्स दिसू लागेल.
नुकतेच ईपीएफओने आपल्या संपूर्ण डेटाबेसचे एका नवीन केंद्रीय डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्थलांतर केले आहे, ज्याला सीआयटीईएस प्रकल्प म्हटले जाते. या मोठ्या तांत्रिक बदलामुळे ऑनलाईन क्लेम आणि इतर सेवांना सध्या काहीसा उशीर होऊ शकतो, असे संकेतही संकेतस्थळावर देण्यात आले आहेत.
व्याज उशिरा दिसल्यास आर्थिक नुकसान होणार का?
अनेकदा तांत्रिक कारणांमुळे किंवा बँकेच्या प्रक्रियेमुळे खात्यात व्याजाची रक्कम उशिरा जमा होते किंवा पासबुकमध्ये दिसत नाही. मात्र, यामुळे नोकरदारांचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही.
ईपीएफ योजना 1952 च्या परिच्छेद 60 नुसार, व्याजाचे गणित हे दर महिन्याच्या शिल्लक रक्कमेवर (रनिंग बॅलन्स) केले जाते. त्यामुळे पासबुकमध्ये एंट्री उशिरा झाली, तरी मिळणाऱ्या व्याजाच्या एकूण रक्कमेत एक रुपयाचाही फरक पडत नाही. हे व्याज पूर्णपणे सुरक्षित असते. स्थानिक अधिकाऱ्यांच्या पडताळणीनंतर ते आपोआप खात्यात जोडले जाते.
तुमच्या खात्यात व्याज जमा झाले की नाही? असे तपासा ३ सोप्या पर्यायांद्वारे
तुमच्या पीएफ खात्यात व्याजाचे पैसे आले आहेत की नाही, हे तपासण्यासाठी खालील ३ डिजिटल माध्यमांचा वापर करता येईल:
- ईपीएफओ मेंबर ई-सेवा पोर्टल: तुम्ही तुमच्या 12 अंकी युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN), पासवर्ड आणि कॅप्चा टाकून अधिकृत मेंबर पासबुक पोर्टलवर लॉगिन करू शकता. आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचे नवीन पासबुक पाहता येईल.
- उमंग ॲप (UMANG App): मोबाईलमधील उमंग ॲपद्वारे देखील ग्राहक आपला पीएफ बॅलन्स अत्यंत सहजपणे पाहू शकतात. या ॲपवर पासबुक डाऊनलोड करणे, क्लेम ट्रॅक करणे आणि पेन्शनचा तपशील पाहण्याची सुविधा मिळते.
- पासबुक लाईट: सध्याच्या जुन्या पोर्टलवरून पासबुक लाईट या पर्यायाची निवड करून नुकतेच जमा झालेले पैसे आणि एकूण रक्कम तपासता येते.
पीएफ योजनेचे स्वरूप आणि नोकरदारांना मिळणारे मोठे फायदे
भविष्य निर्वाह निधी (EPF) ही केंद्र सरकारची अत्यंत सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा देणारी गुंतवणूक योजना आहे. याद्वारे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर (रिटायरमेंट) मोठा आर्थिक आधार मिळतो.
मर्यादा आणि स्वेच्छा: सरकारी चौकटीनुसार, दोन्ही बाजूंचे हे अनिवार्य योगदान सध्या 1800 रुपयांपर्यंत मर्यादित (कॅप) आहे. मात्र, जर एखाद्या कर्मचाऱ्याला भविष्य सुरक्षित करण्यासाठी जास्त गुंतवणूक करायची असेल, तर तो स्वतःच्या इच्छेने यापेक्षा जास्त रक्कम कट करू शकतो.
मासिक योगदान: या नियमानुसार, कर्मचारी आणि त्याचा मालक (कंपनी) हे दोघेही कर्मचाऱ्याच्या मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या प्रत्येकी 12 टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा करतात.











