EPFO 3.0: नोकरदार वर्गासाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) करोडो सदस्यांना आता त्यांच्या पीएफ खात्यातील पैसे काढण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागणार नाही. केंद्र सरकारच्या नवीन ‘ईपीएफओ ३.०’ या डिजिटल प्लॅटफॉर्म अंतर्गत, पीएफ धारकांना त्यांचे पैसे थेट युपीआय (UPI) अॅप्स आणि पीएफ खात्याशी लिंक असलेल्या एटीएम (ATM) मधून काढण्याची सुविधा मिळणार आहे.
या ऐतिहासिक सुविधेशिवाय ग्राहकांना आपल्या युपीआय अॅपवरच पीएफचा बॅलन्स देखील तपासता येणार आहे. या डिजिटल सुधारणेमुळे पीएफ क्लेम करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची कटकट पूर्णपणे संपणार असून नोकरदारांना त्यांचे पैसे अत्यंत वेगाने मिळतील.
कधीपासून सुरू होणार ही सुविधा?
ईपीएफओने या नवीन प्रणालीची तांत्रिक चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी काही काळापूर्वी संकेत दिले होते की, या प्रणालीची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल. रिपोर्ट्सनुसार, हा नवा नियम जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला देशभरात रोलआउट केला जाऊ शकतो.
पैसे काढण्याची मर्यादा आणि नियम काय?
युपीआय किंवा एटीएमद्वारे पैसे काढण्यासाठी ईपीएफओने अद्याप कोणतीही वेगळी मर्यादा निश्चित केलेली नाही. याचा अर्थ असा की सध्याचे जे नियम आहेत, तेच या नवीन माध्यमांनाही लागू राहतील:
- ७५ टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येणार: सध्याच्या नियमांनुसार, पात्र सदस्य त्यांच्या एकूण पीएफ शिलकीपैकी कमाल 75% पर्यंतची रक्कम तातडीने काढू शकतात. हीच रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाईल.
- २५ टक्के रक्कम राहणार सुरक्षित: नोकरदारांच्या भविष्यातील सुरक्षिततेचा विचार करून एकूण निधीतील किमान 25% रक्कम खात्यातच लॉक राहील, जेणेकरून निवृत्तीनंतर नागरिकांना आर्थिक संरक्षण मिळेल.
- एटीएम कार्डची सुविधा: या प्रणाली अंतर्गत ईपीएफओ सदस्यांना विशेष एटीएम कार्ड देण्याची शक्यता आहे, जे थेट त्यांच्या पीएफ खात्याशी जोडलेले असेल.
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ‘या’ गोष्टी आवश्यक
नवीन युपीआय आणि एटीएम सुविधा वापरण्यासाठी पीएफ सदस्यांना काही अटी पूर्ण कराव्या लागतील:
- सदस्यांचे युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) अॅक्टिव्ह असणे आणि ते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे.
- खात्यावर पॅन कार्ड अपडेट केलेले असावे, तसेच बँकेचा अचूक आयएफएससी (IFSC) कोड व्हेरिफाय झालेला असावा.
- सुरक्षिततेसाठी आणि ओटीपी आधारित पडताळणीसाठी पीएफ खात्याशी मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. सदस्य आधार ओटीपीच्या मदतीने केवायसी आणि वैयक्तिक माहिती थेट अपडेट करू शकतील.
ईपीएफओ ३.० मधील इतर मोठे बदल
या नवीन प्लॅटफॉर्ममध्ये केवळ एटीएम आणि युपीआय नव्हे, तर इतरही अनेक ग्राहकस्नेही बदल करण्यात आले आहेत. पीएफ खात्यातील ऑटो-सेटलमेंटची (स्वयंचलित मंजुरी) मर्यादा आता 1 लाख रुपयांवरून वाढवून थेट 5 लाख रुपये करण्यात आली आहे. यामुळे मोठ्या रक्कमेचे क्लेम आता संगणकीय प्रणालीद्वारे आपोआप मंजूर होतील. यासोबतच, उमंग अॅपच्या माध्यमातून चेहऱ्याची ओळख पटवणारे ‘फेस ऑथेंटिकेशन’ तंत्रज्ञान आणले जात आहे, ज्यामुळे पेन्शनधारकांना आणि नोकरदारांना कार्यालयात न जाता पडताळणी पूर्ण करता येईल.










