EPFO UAN Activation: नोकरदार वर्गासाठी भविष्य निर्वाह निधी ही दीर्घकालीन गुंतवणुकीची आणि निवृत्तीनंतरची एक अत्यंत सुरक्षित ठेव आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ‘ईपीएफओ’ ने आपल्या ऑनलाइन सेवा अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी एक मोठा तांत्रिक बदल केला आहे. ईपीएफओने आपल्या अधिकृत पोर्टलवरून युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच यूएएन (UAN) अॅक्टिव्हेट करणे आणि नवीन यूएएन तयार करण्याची सुविधा पूर्णपणे बंद केली आहे.
आता या दोन्ही सेवा अधिकृतपणे ‘उमंग’ मोबाईल अॅपवर हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. यापुढे कोणत्याही कर्मचाऱ्याला आपले पीएफ खाते सुरू करण्यासाठी उमंग अॅपचा वापर करावा लागेल आणि त्यासाठी आधार-आधारित फेस ऑथेंटिकेशन प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
उमंग अॅपद्वारे यूएएन अॅक्टिव्हेट करण्याची 7 टप्प्यांची सोपी पद्धत
नवीन नियमांनुसार तुमचे पीएफ खाते सक्रिय करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
- अॅप डाउनलोड करा: सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअरवरून ‘Umang’ अॅप डाउनलोड करा.
- नोंदणी: आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर वापरून अॅपवर नोंदणी करा आणि भविष्यातील लॉगिनसाठी 4 अंकी एम-पिन (M-PIN) सेट करा.
- पर्याय निवडा: अॅपमध्ये लॉगिन केल्यावर ‘EPFO’ सर्च करा आणि तिथल्या पर्यायांमधून ‘UAN Services Through Face Auth’ अंतर्गत ‘UAN Activation’ वर क्लिक करा.
- माहिती भरा: आता तुमचा यूएएन नंबर, आधार क्रमांक आणि आधार लिंक असलेला मोबाईल नंबर टाकून ‘Send OTP’ वर क्लिक करा.
- चेहरा स्कॅन करा: मोबाईलवर आलेला ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर, अॅप तुम्हाला ‘Aadhaar Face RD app’ इन्स्टॉल करण्यास सांगेल. ते इन्स्टॉल झाल्यावर कॅमेरा उघडेल. तुमचा चेहरा कॅमेऱ्यासमोर व्यवस्थित स्कॅन करा, स्क्रीनवर हिरवे वर्तुळ दिसल्यास चेहरा यशस्वीरित्या कॅप्चर होईल.
- माहिती तपासा: स्क्रीनवर तुमचे नाव, जन्मतारीख इत्यादी तपशील दिसतील. ते तपासून ‘Submit’ करा. तुमचे खाते सक्रिय होईल आणि तात्पुरता पासवर्ड एसएमएसद्वारे पाठवला जाईल.
- स्टेटस तपासणे: तुमचे खाते अॅक्टिव्हेट झाले आहे की नाही हे तपासण्यासाठी पुन्हा याच अॅपमधील ‘UAN allotment and activation’ पर्यायावर जाऊन माहिती भरा. प्रक्रिया यशस्वी झाली असल्यास स्क्रीनवर “The UAN entered is already activated” असा संदेश दिसेल.
पीएफ व्याजदर आणि कर बचतीचे नियम
चालू आर्थिक वर्षासाठी (FY 2025-26) वित्त मंत्रालयाने ईपीएफ आणि व्हीपीएफ (VPF) योगदानासाठी 8.25% व्याजदराला मंजुरी दिली आहे. पीएफ खात्यात 15 जुलैपर्यंत व्याजाचे पैसे जमा होण्याची अपेक्षा होती. सलग तिसऱ्या वर्षी कर्मचाऱ्यांना 8.25% दराने व्याज मिळत आहे.
कर बचतीचा विचार केला तर, जुन्या कर रचनेनुसार कलम 80C अंतर्गत वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सूट मिळते. मालकाचे (एम्प्लॉयर) 12% पर्यंतचे योगदान (7.5 लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास) जुन्या आणि नवीन अशा दोन्ही कर रचनांमध्ये करमुक्त आहे. याशिवाय, कर्मचाऱ्याच्या जमा रकमेवरील व्याज वार्षिक 2.5 लाख रुपयांपर्यंत पूर्णपणे करमुक्त असते.
खात्यातून पैसे काढण्याचे नवीन नियम आणि मर्यादा
ईपीएफओच्या नियमांनुसार, कर्मचाऱ्यांना विशिष्ट कारणांसाठी खात्यातून पूर्ण किंवा अंशतः पैसे काढण्याची परवानगी मिळते. अंतिम सेटलमेंट नोकरी सोडल्यानंतरच मंजूर केली जाते. पैसे काढताना खालील नियमांचे पालन करावे लागते:
- किमान शिल्लक: पीएफ खातेधारकांना त्यांच्या खात्यात नेहमी एकूण रकमेच्या 25% किमान शिल्लक (मिनिमम बॅलन्स) ठेवणे बंधनकारक आहे.
- मर्यादा: याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या एकूण जमा पुंजीतून जास्तीत जास्त 75% रक्कमच अंशतः काढू शकता.
- उदाहरण: जर एखाद्या कर्मचाऱ्याच्या खात्यात एकूण 2 लाख रुपये जमा असतील, तर तो जास्तीत जास्त 1,50,000 रुपये काढू शकतो आणि 50,000 रुपये खात्यात शिल्लक राहतील.
- पात्रता: ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्ता 15,000 रुपयांपर्यंत आहे, ते ईपीएफ खाते उघडू शकतात. यापेक्षा जास्त वेतन असल्यास ते व्हीपीएफचा पर्याय निवडू शकतात.










