नोकरदार वर्गासाठी केंद्र सरकारकडून एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकारने आर्थिक वर्ष 2025-26 साठी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) ठेवींवर 8.25% व्याजदर कायम ठेवण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. सलग तिसऱ्या वर्षी या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, देशातील 7 कोटींपेक्षा जास्त नोकरदारांच्या खात्यात याच महिन्यात हे व्याजाचे पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. केंद्रीय विश्वस्त मंडळाने (सीबीटी) यापूर्वीच 2 मार्च 2026 रोजी या व्याजदराची घोषणा केली होती, ज्याला आता सरकारने अंतिम मंजुरी दिली आहे.
व्याजाचे पैसे जमा होण्यास उशीर झाल्यास नुकसान होणार का?
अनेकदा ईपीएफ खात्यात व्याजाची रक्कम जमा होण्यास तांत्रिक कारणांमुळे विलंब होतो. मात्र, यामुळे कर्मचाऱ्यांचे कोणतेही आर्थिक नुकसान होत नाही. ईपीएफ योजना 1952 च्या परिच्छेद 60 नुसार, व्याजाची गणना दरमहा असणाऱ्या शिल्लक रकमेवर (रनिंग बॅलन्स) केली जाते.
ईपीएफओ दरमहा तुमच्या खात्यातील रकमेवर व्याज मोजत असल्यामुळे जरी प्रत्यक्ष रक्कम खात्यात उशिरा दिसली, तरीही संपूर्ण वर्षाचे व्याज चक्रवाढ पद्धतीने क्लोजिंग बॅलन्समध्ये पूर्ण जोडले जाते. त्यामुळे विलंबाचा कोणताही फटका खातेदाराला बसत नाही, असे स्पष्टीकरण ईपीएफओने दिले आहे.
खात्यात पैसे जमा झाले की नाही? ‘असे’ तपासा
तुमच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही ‘पासबुक लाईट’ या सुविधेचा वापर करू शकता:
१. सर्वप्रथम ईपीएफओच्या अधिकृत मेंबर पासबुक पोर्टलला भेट द्या.
२. तुमचा 12 अंकी यूएएन नंबर (UAN), पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इन करा.
३. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी (OTP) प्रविष्ट करा.
४. डाव्या कोपऱ्यात असलेल्या ‘व्ह्यू’ पर्यायावर क्लिक करून ड्रॉप-डाऊन मेनूमधून ‘पासबुक लाईट’ निवडा. येथे तुम्हाला खात्याची माहिती दिसेल.
याशिवाय तुम्ही उमंग (Umang) अॅपचा वापर करून, ई-सेवा पोर्टलला भेट देऊन, नोंदणीकृत क्रमांकावरून मिस्ड कॉल देऊन किंवा एसएमएस (SMS) पाठवून देखील तुमचा ईपीएफ बॅलन्स सहज तपासू शकता.










