Income Tax Refund Status: उत्पन्न कर परतावा म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै अत्यंत जवळ आली आहे. ज्या करदात्यांनी आधीच आयटीआर फाइल केला आहे, त्यांच्या बँक खात्यात रिफंडचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अनेक दिवस उलटूनही जर तुमच्या खात्यात रिफंडची रक्कम जमा झाली नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही.
साधारणपणे आयकर विभाग कर परताव्याचे सत्यापन पूर्ण झाल्यानंतर काही आठवड्यांतच पैसे थेट बँक खात्यात जमा करतो. जर तुमचा रिफंड अद्याप आलेला नसेल, तर तुम्ही घरबसल्या केवळ दोन मिनिटांत त्याचे नेमके स्टेटस चेक करू शकता.
पद्धत 1: आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवरून स्टेटस कसे पाहावे?
तुमच्या कर भरण्याची सर्व माहिती आणि रिफंडचे स्टेटस पाहण्यासाठी ई-फायलिंग पोर्टल हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे.
- वेबसाइटला भेट द्या: सर्वप्रथम आयकर विभागाच्या अधिकृत पोर्टलला (incometax.gov.in) भेट द्या.
- लॉगिन करा: मुख्य पानावर वरच्या बाजूला असलेल्या लॉगिन पर्यायावर क्लिक करा. तुमचा पॅन क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
- व्ह्यू फाइल रिटर्न: खात्याचे मुख्य पान उघडल्यानंतर मेनूमध्ये जाऊन ई-फाइल, त्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्न आणि पुढे व्ह्यू फाइल रिटर्न्स या पर्यायावर क्लिक करा.
- असेसमेंट इयर निवडा: तुमच्या समोर तुम्ही आजवर भरलेल्या सर्व परताव्यांची यादी येईल. तेथून योग्य असेसमेंट इयर निवडून तपशील पाहा. तिथे तुमच्या रिफंडची सद्यस्थिती स्पष्ट दिसेल.
पद्धत 2: पासवर्ड आठवत नसेल तर TIN-NSDL वेबसाइटचा वापरा पर्याय
जर तुम्ही तुमच्या ई-फायलिंग खात्याचा पासवर्ड विसरला असाल आणि लॉगिन न करता थेट स्टेटस पाहायचे असेल, तर हा पर्याय उपयुक्त ठरतो:
- वेबसाइटवर जा: टीआयएन-एनएसडीएलच्या (TIN-NSDL) अधिकृत पोर्टलवर जा.
- माहिती भरा: तिथे तुमचा पॅन क्रमांक प्रविष्ट करा.
- वर्ष निवडा: ज्या वर्षाचा रिफंड पाहायचा आहे ते असेसमेंट इयर निवडा.
- कैप्चा कोड द्या: समोर दिसणारा कॅप्चा कोड भरून सबमिट बटणावर क्लिक करा. तुमच्या रिफंडचे स्टेटस लगेच स्क्रीनवर दिसेल.
रिफंड स्टेटस मधील शब्दांचा अर्थ काय?
स्टेटस तपासताना स्क्रीनवर दिसणाऱ्या विविध शब्दांचा अर्थ खालीलप्रमाणे आहे:
अंडर प्रोसेसिंग: तुमचा अर्ज सध्या आयकर विभागाच्या तपासणीखाली असून ही प्रक्रिया पूर्ण होताच पैसे खात्यात पाठवले जातील.
रिर्फंड इश्यूड: याचा अर्थ आयकर विभागाने तुमच्या बँकेला पैसे पाठवले आहेत आणि ते लवकरच खात्यात जमा होतील.
रिफंड फेल्ड: काही तांत्रिक कारणांमुळे किंवा बँकेच्या चुकीच्या माहितीमुळे रिफंड जमा होऊ शकला नाही. अशा वेळी तुम्हाला पुन्हा रिफंड री-इश्यूसाठी विनंती करावी लागेल.










