Home / देश-विदेश / Jantar Mantar Protest : चित्रपटातून ज्ञान पाजणाऱ्या बॉलिवूडच्या सुपर हिरोंची बोलती बंद का? जंतरमंतरवरील आंदोलनानंतर बॉलिवूडच्या ‘ग्लॅमरस’ दुटप्पीपणावर नेटीझन्स भडकले….

Jantar Mantar Protest : चित्रपटातून ज्ञान पाजणाऱ्या बॉलिवूडच्या सुपर हिरोंची बोलती बंद का? जंतरमंतरवरील आंदोलनानंतर बॉलिवूडच्या ‘ग्लॅमरस’ दुटप्पीपणावर नेटीझन्स भडकले….

Jantar Mantar Protest : ‘नीट’ (NEET) परीक्षा पेपरफुटीच्या गंभीर प्रकरणावरून आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या...

By: Team Navakal
Jantar Mantar Protest
Social + WhatsApp CTA

Jantar Mantar Protest : ‘नीट’ (NEET) परीक्षा पेपरफुटीच्या गंभीर प्रकरणावरून आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) वतीने दिल्लीत पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला अत्यंत भीषण आणि हिंसक वळण लागले. आंदोलकांनी थेट संसद भवनावर पुकारलेल्या धडक मोर्च्याला चिरडण्यासाठी दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमारामुळे संपूर्ण देशात तीव्र संतापाची लाट उसळली. या रक्तपाताचे आणि पोलिसांच्या अमानवी क्रूरतेचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतानाच, आता मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकारांच्या आणि स्टार्सच्या मौनावर सर्वसामान्य जनतेने आणि चाहत्यांनी अत्यंत बोचरे प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.

शस्त्रांनिशी सज्ज झालेल्या पोलिसांनी जंतरमंतरला बनवले छावणी; रक्त वाहेपर्यंत लाठीमार
‘कॉकरोच जनता पार्टी’च्या वतीने संसदेवर काढण्यात येणाऱ्या मोर्च्याची धास्ती घेत दिल्ली पोलिसांनी आदल्या दिवसापासूनच जंतरमंतर परिसराची पूर्ण नाकेबंदी केली होती. संपूर्ण परिसराला अजस्र लोखंडी बॅरिकेड्स लावून छावणीचे स्वरूप देण्यात आले होते. मात्र, लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलणाऱ्या या घोटाळ्याविरोधात जेव्हा आंदोलक पुढे सरसावले, तेव्हा पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या नावाखाली क्रूरतेची सीमा ओलांडली.

आंदोलन मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर अत्यंत अमानुषपणे लाठ्या चालवल्या. पोलिसांनी आंदोलनात सहभागी झालेल्या तरुण – तरुणींना आणि विद्यार्थ्यांना रक्त निघेपर्यंत बेदम झोडपून काढले. या दडपशाहीत कित्येकांची डोकी फुटली, तर कित्येक विद्यार्थ्यांच्या अंगावर लाठ्यांचे काळेनिळे वळ उमटले आहेत. पोलिसांनी अनेकांना बळजबरीने ताब्यात घेऊन अज्ञात स्थळी हलवले. या रक्तलांछित घटनेचे पडसाद आता सोशल मीडियावरून देशभरात उमटत असून, केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या हुकूमशाही वृत्तीचा जाहीर निषेध केला जात आहे.

“एका हाकेसरशी गर्दी जमवणारे अभिनेते आता कुठे दडलेत?” – जनतेचा संतप्त सवाल
या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, आता देशातील आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातील अग्रगण्य चित्रपट व रंगभूमी क्षेत्रातील सेलिब्रिटींना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. भारत हा जसा कृषिप्रधान देश आहे, तसाच आपल्या देशात चित्रपट, कला आणि रंगभूमी या क्षेत्रालाही अत्यंत मानाचे स्थान आहे. महाराष्ट्रात आणि देशात असे अनेक दिग्गज अभिनेते व कलावंत आहेत, ज्यांनी आपल्या कसदार अभिनयाच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अनेकदा या स्टार्सच्या केवळ एका हाकेवर किंवा सोशल मीडिया पोस्टवर त्यांचे लाखो चाहते स्वतःचे काम सोडून धावून जातात.

परंतु, आज जेव्हा देशाचे भवितव्य असलेले तरुण विद्यार्थी रस्त्यावर आपल्या हक्कांसाठी लढत आहेत, पोलिसांच्या लाठ्या खात आहेत आणि त्यांची डोकी रक्ताने माखत आहेत, अशा अत्यंत संवेदनशील प्रसंगी हेच कोट्यवधींचे मानधन घेणारे आणि पडद्यावर समाजसेवेचे धडे देणारे अभिनेते कुठे गायब झाले आहेत? आपल्या चाहत्यांच्या जोरावर स्टारडम उपभोगणारे हे सेलिब्रिटी देशातील इतक्या मोठ्या राष्ट्रीय संकटाच्या वेळी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांच्या रक्षणासाठी पुढे येण्याचे धाडस का दाखवत नाहीत, की ते केवळ सत्ताधाऱ्यांच्या भीतीने गप्प बसले आहेत?

“पडद्यावर अन्यायाविरोधात लढणारे ‘सुपरहिरो’ खऱ्या आयुष्यात मूक प्रेक्षक?”; दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर बॉलिवूडच्या दिग्गजांच्या मौनामुळे चाहते संतप्त-
देशातील चित्रपटसृष्टीतील सर्वात बलाढ्य आणि प्रभावशाली अशा ‘बॉलिवूड’च्या (Bollywood) आघाडीच्या अभिनेत्यांनी या संवेदनशील विषयावर पांघरलेले मौन आता चाहत्यांच्या तीव्र संतापाचे कारण ठरत आहे. करोडो चाहत्यांच्या जिवावर अब्जावधी रुपयांचे साम्राज्य उभे करणाऱ्या या महानायकांनी समाजमाध्यमांवर (Social Media) साधी एक संताप किंवा सहभूतीची पोस्टही टाकू नये.

अजय देवगणचा ‘सिंघम’ पडद्यापुरताच मर्यादित?
चित्रपटसृष्टीत ‘फायटिंग हिरो’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजय देवगणने (Ajay Devgn) आपल्या ‘सिंघम’ (Singham) या अत्यंत लोकप्रिय चित्रपटाच्या तीन भागांमध्ये एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. या चित्रपटांमध्ये त्याने व्यवस्थेतील भ्रष्ट लोकांविरोधात जोरदार वाचा फोडली, भ्रष्टाचाराचा समूळ उच्चाटन करण्याचा प्रयत्न केला आणि अत्याचारी प्रवृत्तींना त्यांची खरी जागा दाखवून दिली.

“अशा मोठ्या आणि संदेश देणाऱ्या चित्रपटांमध्ये काम करून तुम्ही स्वतःच्या चाहत्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देता, ती कशासाठी? केवळ कोट्यवधी रुपयांचे मानधन (Remuneration) मिळाले की तुमचे कर्तव्य संपले का? आज खऱ्या आयुष्यात देशातील तरुण अन्यायाविरुद्ध आणि भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध रस्त्यावर उतरले आहेत. अशा वेळी दिल्लीला जाऊन त्यांना प्रत्यक्ष पाठिंबा देणे तर दूरच, पण समाजमाध्यमांवर साधा एक डिजिटल पाठिंबा दर्शवण्याचे सौजन्यही अजय देवगण दाखवू शकलेला नाही.”

‘स्वदेश’ बनवणारा शाहरुख खान आणि ‘भाईजान’ सलमान खानचे मौन
९० च्या दशकातील मुलांचा ‘चॉकलेट बॉय’ असलेला आणि आजही जागतिक स्तरावर अफाट क्रेझ असलेला बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने ‘स्वदेश’ (Swades) सारखा अत्यंत संवेदनशील आणि देशाभिमान जागवणारा चित्रपट केला आहे. आजही त्याने समाजमाध्यमांवर आपली आयकॉनिक (Iconic Pose) पोझ देत एखादी लहानशी रील (Reel) पोस्ट केली, तरी त्याला अवघ्या काही मिनिटांत लाखो-करोडो व्ह्यूज मिळतात. त्याच्या एका शब्दाला देशातील तरुणाईमध्ये प्रचंड वजन आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या मुद्द्यावर शाहरुख खानने पूर्णपणे मौन बाळगणे पसंत केले आहे.

हीच अवस्था बॉलिवूडचा ‘भाईजान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानची (Salman Khan) आहे. ९० च्या दशकापासून आजतागायत चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या सलमानच्या प्रत्येक चित्रपटाला केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर अवघ्या देशातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो. चाहत्यांच्या या अथांग प्रेमामुळेच त्याला ‘सुपरहिरो’ आणि ‘भाईजान’ बोलले जाते. परंतु, जेव्हा देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडले आहे, तेव्हा या कथित सुपरहिरो कडून संपूर्ण देशाला आशेचा एक किरण हवा होता, पण त्याने या विषयावर साधी एक पोस्टही सोशल मीडियावर शेअर न केल्यामुळे चाहते अत्यंत नाराज झाले आहेत.

तीन दशके गाजवणारे ‘द लेजेंड’ अमिताभ बच्चनही गप्प!
या यादीत सर्वात मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे ते म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीचे महानायक, ‘द लेजेंडरी ॲक्टर’ अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या भूमिकेबद्दल. सलग तीन दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीवर एकछत्री अंमल गाजवणाऱ्या बिग बींना (Big B) आता या वयात स्वतःचे स्थान टिकवून ठेवण्यासाठी कोणत्याही नवीन चित्रपटाची गरज राहिलेली नाही. त्यांची केवळ एखादी जाहिरात किंवा एक साधी एक्स पोस्ट त्यांच्या चाहत्यांना वेड लावण्यासाठी पुरेशी ठरते.

इतके प्रचंड सामाजिक आणि सांस्कृतिक वलय लाभलेले महानायक, ज्यांना देश आदराने ऐकतो, ते सुद्धा विद्यार्थ्यांवर झालेल्या या अमानुष अत्याचारावर आणि देशातील शिक्षण व्यवस्थेच्या झालेल्या दुरवस्थेवर एक अवाक्षरही बोलायला किंवा पोस्ट करायला तयार नाहीत.

चाहत्यांच्या बळावर उच्च पदावर पोहोचलेल्या स्टार्सचे आत्मपरीक्षण कधी?
“या सर्व कलाकारांना आज जे काही अफाट वैभव, मान-सन्मान आणि सर्वोच्च पद मिळाले आहे, ते केवळ आणि केवळ देशातील सामान्य जनतेमुळे व चाहत्यांमुळे मिळाले आहे,” अशी आठवण आता नेटकरी करून देत आहेत. चित्रपटगृहात तिकीट काढून या स्टार्सना देवमाणूस बनवणारा तरुण वर्ग आज दिल्लीच्या रस्त्यांवर लाठ्या खात असताना, या सेलिब्रिटींनी दाखवलेली ही उदासीनता अत्यंत वेदनादायी आहे.

आमिर खानचे ‘ते’ वादग्रस्त विधान आणि चाहत्यांची नाराजी
चित्रपटसृष्टीत ‘मिस्टर परफेक्टनिस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानने (Aamir Khan) नुकतेच एक अत्यंत वादग्रस्त विधान केले होते, ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. २००९ मध्ये आलेल्या ‘३ इडियट्स’ (3 Idiots) या ब्लॉकबस्टर चित्रपटातील त्याने साकारलेली ‘फुंसुक वांगडू’ उर्फ ‘रँचो’ ही मुख्य भूमिका लडाखचे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांच्यावर आधारित नव्हती, असा दावा आमिरने एका जाहीर कार्यक्रमात केला. इतकेच नव्हे तर, हा चित्रपट बनवताना स्वतः आमिर किंवा दिग्दर्शक राजकुमार हिराणी हे सोनम वांगचुक यांना ओळखतही नव्हते, असेही त्याने म्हटले आहे.

या विधानावरून चाहत्यांनी आमिर खानच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. “आमिर खानने ‘तारे जमीन पर’, ‘दंगल’ आणि ‘३ इडियट्स’ सारखे अत्यंत अर्थपूर्ण चित्रपट केले, ज्यातून त्याने देशातील शिक्षण व्यवस्था आणि मुलांच्या कलागुणांवर भाष्य करत लाखो विद्यार्थ्यांना प्रेरित केले. मात्र, आज जेव्हा देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य खरोखरच अंधारात सापडले आहे. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी रुग्णालयात दाखल होईपर्यंत उपोषण केले, अशा संवेदनशील मुद्द्यावर आमिरने स्वतःची कोणतीही स्पष्ट भूमिका मांडलेली नाही.”

‘फिटनेस आयकॉन’ अक्षय कुमारची भावहीनता आणि हृतिक रोशनचे मौन
हाच संताप बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्यावरही व्यक्त केला जात आहे. अक्षय कुमारचे वय कितीही झाले तरी तो आपल्या उत्कृष्ट फिटनेसच्या (Fitness) जोरावर तरुण चाहत्यांना भुरळ पाडतो. त्याने आपल्या कारकिर्दीत सामाजिक संदेश देणारे आणि प्रेक्षकांच्या भावनांना हात घालणारे अनेक चित्रपट केले आहेत. मात्र, देशाच्या राजधानीत लाखो तरुणांच्या भविष्याशी खेळ सुरू असताना आणि त्यांच्यावर अत्याचार होत असताना, नेहमी तत्पर असणाऱ्या अक्षय कुमारने या वेळी कमालीची भावहीनता (Apathy) दाखवली असून, त्याने या अन्यायाविरोधात एक चकार शब्दही काढलेला नाही, अशी खंत चाहते व्यक्त करत आहेत.

दुसरीकडे, ग्रीक गॉड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हृतिक रोशन (Hrithik Roshan) याच्यावरही नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे. त्याच्या उत्कृष्ट डान्सवर चाहते कायमच फिदा असतात पण किती काळ फक्त ह्रितिकचा डान्सस पाहायचा आता पद्यावरची ऍक्शन सोडून खऱ्या आयुष्यात ऍक्शन करायची वेळ आली आहे.

केवळ मानधनापुरतेच सामाजिक भान मर्यादित?
“हे सर्व अभिनेते केवळ कोट्यवधी रुपयांचे मानधन आणि व्यावसायिक नफा मिळवण्यासाठीच पडद्यावर समाजसेवेचे सोंग आणतात का?” असा थेट प्रश्न आता सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. ज्या तरुणांनी आणि चाहत्यांनी या कलाकारांना डोक्यावर घेऊन त्यांना स्टारडमच्या सर्वोच्च पदावर पोहोचवले, तोच तरुण वर्ग आज दिल्लीच्या रस्त्यांवर रक्ताळलेल्या अवस्थेत न्यायासाठी याचना करत आहे. अशा वेळी या अभिनेत्यांनी समाजमाध्यमांवर (Social Media) साधी एक सहभूतीची किंवा पाठिंब्याची पोस्टही शेअर करू नये, ही अत्यंत दुर्दैवी आणि खेदजनक बाब असल्याचे आंदोलक विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या