Mutual Fund SIP: संपत्ती निर्माण करण्याचे आणि स्वतःची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्याचे स्वप्न प्रत्येक जण पाहत असतो. जेव्हा तुमचे आर्थिक ध्येय वेळेच्या चौकटीत आणि निश्चित आकड्यात ठरलेले असते, तेव्हा ते साध्य करणे अधिक सोपे जाते. जर तुमचे ध्येय पुढील 10 वर्षांत 1 कोटी रुपयांचा निधी उभा करण्याचे असेल, तर म्युच्युअल फंडमधील एसआयपी हा त्यासाठी एक अत्यंत प्रभावी मार्ग मानला जातो.
म्युच्युअल फंडमधील नियमित गुंतवणूक केवळ तुम्हाला शिस्तबद्ध बनवत नाही, तर बाजाराच्या चढ-उतारात रुपयाच्या सरासरी खर्चाचा मोठा फायदा देखील मिळवून देते. 10 वर्षांत 1 कोटी रुपये जमा करण्यासाठी मुख्यत्वे दोन गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे; तुमचे मासिक गुंतवणुकीचे प्रमाण आणि तुम्हाला मिळणारा परतावा. या दोन गोष्टी जितक्या जास्त असतील, तितका तुमचा फायदा मोठा होईल.
परताव्याच्या दरानुसार मासिक गुंतवणुकीचे गणित
1 कोटी रुपयांचा टप्पा गाठण्यासाठी तुम्हाला मिळणाऱ्या अंदाजित परताव्याच्या दरानुसार दरमहा किती रुपयांची एसआयपी करावी लागेल, याचे गणित खालीलप्रमाणे आहे:
- 13 टक्के वार्षिक परतावा मिळाल्यास: जर तुमच्या गुंतवणुकीवर वर्षाला 13 टक्के दराने परतावा मिळाला, तर १० वर्षांत १ कोटी रुपये जमा करण्यासाठी तुम्हाला दरमहा 40,600 रुपयांची एसआयपी करावी लागेल.
- 12 टक्के वार्षिक परतावा मिळाल्यास: समजा परताव्याचा दर थोडा कमी होऊन 12 टक्के मिळाला, तर दरमहा गुंतवणुकीची रक्कम वाढवून ती 43,050 रुपये करावी लागेल.
- 11 टक्के वार्षिक परतावा मिळाल्यास: जर म्युच्युअल फंडने वर्षाला 11 टक्के परतावा दिला, तर १ कोटींचा निधी तयार करण्यासाठी दरमहा 45,700 रुपयांची मासिक गुंतवणूक आवश्यक आहे.
- 10 टक्के वार्षिक परतावा मिळाल्यास: परतावा आणखी कमी होऊन 10 टक्के राहिल्यास, १० वर्षांत हे उद्दिष्ट गाठण्यासाठी दरमहा 48,500 रुपयांची मोठी एसआयपी करावी लागेल.
गुंतवणूक करताना ‘हा’ नियम लक्षात ठेवा
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की, भविष्यात मिळणाऱ्या परताव्याचा अचूक अंदाज कोणीही लावू शकत नाही. एखाद्या फंडचा भूतकाळातील नफा किंवा कामगिरी पाहून तो भविष्यातही तसाच परतावा देईल, अशी शाश्वती नसते.
त्यामुळे स्वतःचे आर्थिक उद्दिष्ट निश्चित करताना नेहमी सुरक्षितता लक्षात ठेवूनच गुंतवणुकीचे नियोजन करणे बाजारातील जोखमीच्या दृष्टीने शहाणपणाचे ठरते.











