UPI and Cibil Score: आजच्या डिजिटल युगात खिशात रोकड ठेवण्याची गरज उरलेली नाही. चहाच्या टपरीपासून मोठ्या शोरूमपर्यंत सगळीकडे क्युआर कोड स्कॅन करून पैसे दिले जातात. मात्र, वाढत्या डिजिटल व्यवहारांमुळे अनेक युजर्सच्या मनात एकच भीती असते, ती म्हणजे सतत UPI व्यवहार केल्याने आपला सिबिल स्कोअर (Cibil Score) तर खराब होणार नाही ना? जर तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
UPI व्यवहार आणि सिबिल स्कोअरचा संबंध काय?
सगळ्यात आधी हे स्पष्ट समजून घ्या की, तुम्ही दिवसातून 5 वेळा पेमेंट करा किंवा 50 वेळा, त्याचा तुमच्या सिबिल स्कोअरवर कोणताही थेट परिणाम होत नाही. सिबिल स्कोअर हा प्रामुख्याने तुम्ही घेतलेल्या कर्जाचे हप्ते (EMI) आणि क्रेडिट कार्डच्या बिलांचा भरणा वेळेवर करता की नाही, यावर अवलंबून असतो.
UPI द्वारे केलेले व्यवहार हे तुमच्या बँक खात्यातील स्वतःच्या पैशांचा वापर असतो, त्यामुळे ते क्रेडिट रेटिंग किंवा सिबिल स्कोअरच्या कक्षेत येत नाहीत.
बँकेच्या नजरेत ‘स्टेटमेंट’ महत्त्वाचे
तुमचा स्कोअर जरी कमी होत नसला, तरी भविष्यात जेव्हा तुम्ही पर्सनल लोन किंवा गृहकर्जासाठी अर्ज करता, तेव्हा बँका तुमचे बँक स्टेटमेंट बारकाईने तपासतात.
- जटिल स्टेटमेंट: जर तुमच्या स्टेटमेंटमध्ये 10-20 रुपयांचे शेकडो छोटे ट्रान्झॅक्शन्स असतील, तर ते स्टेटमेंट खूप मोठे आणि गुंतागुंतीचे होते.
- खर्चाची सवय: बँका यातून तुमच्या खर्चाच्या सवयीचा अंदाज लावतात. जर तुमचे बँक खाते वारंवार ‘झिरो बॅलन्स’च्या जवळ पोहोचत असेल, तर ते कमकुवत आर्थिक नियोजनाचे लक्षण मानले जाते. यामुळे कर्ज मंजूर होण्यात तांत्रिक अडचणी येऊ शकतात.
कर्ज घेताना आर्थिक शिस्त गरजेची
बँका केवळ सिबिल स्कोअरच पाहत नाहीत, तर तुमच्या उत्पन्नाच्या तुलनेत तुमचा खर्च किती आहे, हेदेखील तपासतात. UPI चा बेधुंद वापर करून जर तुमचे बजेट कोलमडत असेल, तर बँका तुम्हाला ‘जोखीम असलेला ग्राहक’ समजू शकतात.
त्यामुळे डिजिटल पेमेंट जरूर करा, पण आपल्या बँक बॅलन्स आणि खर्चात संतुलन राखा. जेणेकरून भविष्यात कर्ज घेताना तुमची प्रतिमा एक जबाबदार ग्राहक म्हणून राहील.
हे देखील वाचा –











