ISRO Rocket Woman Saree: भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक अत्यंत मानाचा तुरा रोवला गेला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) ‘मंगळयान’ मोहिमेचे यश संपूर्ण जगाने पाहिले आहे. आता या ऐतिहासिक मोहिमेची आणि भारताच्या ‘रॉकेट वुमन’ची एक अनोखी ओळख थेट अमेरिकेत पोहोचली आहे.
वॉशिंग्टन येथील जगप्रसिद्ध ‘स्मिथसोनियन नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियम’मध्ये इस्रोच्या वरिष्ठ महिला शास्त्रज्ञ नंदिनी हरिनाथ यांनी परिधान केलेली लाल आणि निळ्या रंगाची सिल्क साडी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. आंतरशाखीय अंतराळ विज्ञानाच्या संग्रहात स्थान मिळवणारी ही भारतातील पहिलीच वस्तू, तर या संग्रहालयातील पहिलीच साडी ठरली आहे.
ISRO Rocket Woman Saree: काय आहे या साडीचे ‘मंगळयान’ कनेक्शन?
म्युझियममध्ये ठेवण्यात आलेली ही साडी केवळ एक वस्त्र नसून, भारताच्या एका अत्यंत कठीण अंतराळ मोहिमेच्या यशाची साक्षीदार आहे:
- करो या मरोची स्थिती: 5 नोव्हेंबर 2013 रोजी श्रीहरीकोटा येथून मंगळयान अवकाशात झेपावले होते. त्यानंतर डिसेंबर 2013 मधील एक दिवस मोहिमेसाठी अत्यंत धोक्याचा आणि महत्त्वाचा होता.
- सर्वात कठीण मोहीम: या मोहिमेच्या डेप्युटी ऑपरेशन्स डायरेक्टर असलेल्या नंदिनी हरिनाथ यांच्यासह सर्व शास्त्रज्ञ कंट्रोल रूममध्ये उपस्थित होते. अंतराळ यानाला पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर काढून मंगळाच्या दिशेने 300 दिवसांच्या प्रवासावर ढकलणे हा सर्वात मोठा टप्पा होता.
- यशाचा तो ऐतिहासिक दिवस: नंदिनी यांच्या मते, तो दिवस ‘करो या मरो’ असा होता. यान कुठे, कसे आणि कधी जाणार हे त्या दिवशी ठरत होते. याच अत्यंत महत्त्वाच्या दिवशी नंदिनी यांनी ही लाल-निळी सिल्क साडी परिधान केली होती. पुढे 24 सप्टेंबर 2014 रोजी भारताचे मंगळयान मंगळाच्या कक्षेत यशस्वीरित्या पोहोचले.
ISRO Rocket Woman Saree: अमेरिकन क्युरेटरला भावला भारतीय महिलांचा ‘तो’ फोटो
मंगळयान मोहीम फत्ते झाल्यानंतर इस्रोच्या कंट्रोल रूममधील साडी नेसलेल्या भारतीय महिला शास्त्रज्ञांच्या आनंदाचा आणि सुखाचा फोटो जगभर प्रचंड व्हायरल झाला होता.
म्युझियमचे अंतराळ इतिहास क्युरेटर मॅट शिंडेल यांनी सांगितले की, तो फोटो मनाला भिडणारा होता. पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या रॉकेट सायन्स क्षेत्रात भारतीय महिलांनी मिळवलेले हे यश थक्क करणारे होते. याच कारणामुळे त्यांनी 2020 मध्ये नंदिनी हरिनाथ यांच्याशी ईमेलद्वारे संपर्क साधला. भारताच्या या यशाचे प्रतीक म्हणून कोणती वस्तू म्युझियममध्ये ठेवता येईल, यावर चर्चा करताना नंदिनी यांनी त्या खास दिवशी नेसलेली साडी देण्याचे मान्य केले.
ISRO Rocket Woman Saree: यूट्यूबवरून शिकले साडी नेसवायला; ‘या’ अमेरिकन स्टारच्या शेजारी स्थान
साडी आणि ब्लाऊज जेव्हा अमेरिकेतील म्युझियममध्ये पोहोचले, तेव्हा तिथल्या कापड संरक्षकांना (टेक्सटाईल कन्झर्व्हेटर) पुतळ्याला साडी कशी नेसवायची हे माहित नव्हते. अखेर त्यांनी यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून साडीचा अचूक घोळ आणि पदर कसा काढायचा हे शिकून घेतले.
या संग्रहालयात दर आठवड्याला लाखो पर्यटक भेट देतात. या म्युझियममध्ये भारताच्या हवाई दलाच्या काही वस्तू आधीपासून आहेत, परंतु अंतराळ क्षेत्रातून स्थान मिळवणारी ही पहिलीच भारतीय वस्तू आहे. विशेष म्हणजे, नंदिनी यांची ही साडी अंतराळात जाणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला शास्त्रज्ञ सॅली राइड यांनी 1983 च्या मोहिमेत घातलेल्या निळ्या रंगाच्या आयकॉनिक टी-शर्टच्या अगदी शेजारी सन्मानाने मांडण्यात आली आहे. ही साडी भारतीय अस्मितेचे आणि जगातील कोट्यवधी मुलींना विज्ञान क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरित करणारे एक उत्तम प्रतीक बनली आहे.
हे देखील वाचा – LPG Price Hike: सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका! घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा वाढ; पाहा नवीन दर










