Home / देश-विदेश / Narwar Fort : किल्ल्यात १२ दिवसांपासून रेकी… आणि एका रात्रीत ५०० वर्षांची तोफ गायब!

Narwar Fort : किल्ल्यात १२ दिवसांपासून रेकी… आणि एका रात्रीत ५०० वर्षांची तोफ गायब!

Narwar Fort : मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील ऐतिहासिक नरवर किल्ल्यातून शिंदे घराण्याच्या काळातील सुमारे ५०० वर्षे जुनी आणि तब्बल ३,०००...

By: Team Navakal
Narwar Fort
Social + WhatsApp CTA

Narwar Fort : मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील ऐतिहासिक नरवर किल्ल्यातून शिंदे घराण्याच्या काळातील सुमारे ५०० वर्षे जुनी आणि तब्बल ३,००० किलो वजनाची तोफ चोरट्यांनी रात्रीतून पळवून नेल्याची गंभीर घटना समोर आली आहे. १५ ते १६ जुलैच्या मध्यरात्री ही धाडसी चोरी घडली असून, या प्रकारामुळे प्रशासन, पुरातत्व विभाग आणि इतिहासप्रेमींमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, २५ ते ३० जणांची सशस्त्र टोळी किल्ल्यात दाखल झाली. त्यांनी किल्ल्याच्या मागील बाजूने प्रवेश करत थेट कचहरी परिसर गाठला. तेथे ठेवलेल्या १४ ऐतिहासिक तोफांपैकी सर्वात वजनदार तोफ त्यांनी लक्ष्य केली. ही तोफ सुमारे ३,००० किलो वजनाची अष्टधातूची आहे. ती हलवण्यासाठी आरोपींनी ट्रक आणि क्रेनसारखी अवजड यंत्रसामग्री सोबत आणली होती.

घटनेवेळी किल्ल्यावर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांना आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली. रक्षकांकडे केवळ काठ्या असल्याने ते प्रतिकार करू शकले नाहीत. किल्ल्यात पुरेशी प्रकाशयोजना नसल्यामुळे चोरट्यांना कारवाई करणे सोपे झाले. काही मिनिटांत त्यांनी तोफ ट्रकमध्ये चढवली आणि तेथून पसार झाले.

या घटनेनंतर किल्ल्यातील तोफांची संख्या १४ वरून १३ वर आली आहे. विशेष म्हणजे, या चोरीपूर्वी सुमारे १० ते १२ दिवसांपासून किल्ल्याभोवती संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती स्थानिकांनी दिली होती. मात्र, या इशाऱ्याकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही आणि सुरक्षा वाढवण्यात कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत, अशी चर्चा आहे.

तपासात असेही समोर आले आहे की, आरोपींना तोफ नेमकी कुठे ठेवली आहे, तिचे वजन किती आहे आणि ती हलवण्यासाठी किती मनुष्यबळ लागेल, याची अचूक माहिती होती. यावरून ही चोरी पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट होत आहे.

इतिहास अभ्यासकांच्या मते, चोरीस गेलेली तोफ १६व्या शतकातील असून त्या काळातील प्रगत धातुकाम, युद्धतंत्र आणि कारागिरीचे उत्कृष्ट उदाहरण मानली जाते. तिच्यावरील नक्षीकाम आणि ऐतिहासिक खुणांमुळे तिचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व अत्यंत मोठे आहे. अशा प्रकारच्या तोफेचे आर्थिक मूल्य निश्चित सांगणे कठीण असले, तरी आंतरराष्ट्रीय अवैध पुरातन वस्तूंच्या बाजारात तिची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये असू शकते.

या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून सायबर सेलची मदत घेतली जात आहे. तसेच, या चोरीमागे आंतरराष्ट्रीय पुरातन वस्तू तस्करी रॅकेटचा संबंध आहे का, या दृष्टीनेही तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या धाडसी चोरीमागील संपूर्ण कट आणि आरोपींचा तपशील समोर येणार आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या