Atrocities in Thailand – थायलंडमध्ये महिन्याला 70 हजार रुपये पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून बीडमधील 25 तरुणांसह देशातील सुमारे 800 भारतीयांना म्यानमार-थायलंड सीमेवरील कुख्यात गोल्डन ट्रँगल परिसरात नेले आणि तिथे गेल्यावर राबवून घेत बंदिस्त ठेवले. त्यापैकी एकाने बीडच्या मित्राला लपूनछपून फोन केल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या सर्वांना सोडवून परत आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे.
भारतातून गेलेल्या या 800 जणांना बंदुकीच्या धाकावर तब्बल 18 तास ऑनलाईन काम करून घेतले जात आहे. ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्याचे हे काम आहे. या ओलीस राहिलेल्यांपैकी बीडमधील एका तरुणाने मित्राला फोन करून हा प्रकार सांगितला. त्यानंतर बीड पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सायबर विभागात गुन्हा दाखल केला. आता अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी परराष्ट्र मंत्रालयासह राज्य व केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.
पीडित आणि त्याच्या मित्राच्या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील त्या तरुणाने मित्राला सांगितले की, फेसबूकवर निमेशन डिझायनर संदर्भातील कामाची जाहिरात पाहिली आणि थायलंडमधील नोकरीसाठी अर्ज केला. महिन्याला 70 हजार रुपये पगार, राहण्याची व्यवस्था आणि आकर्षक सुविधांचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार तो 4 जून रोजी पुण्याहून बँकॉक येथे पोहोचला. मात्र, विमानतळावरूनच त्याला बळजबरीने म्यानमार सीमेवरील घनदाट जंगलातील एका गुप्त छावणीत नेण्यात आले. तेथे पोहोचताच त्याचा पासपोर्ट, मोबाईल आणि इतर सर्व महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. या छावणीत त्याच्यासह शेकडो भारतीय नागरिक आहेत. बंदुकीच्या धाकावर त्यांच्याकडून विविध देशांतील नागरिकांना सावज बनवून ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचे काम करून घेतले जात आहे. दररोज तब्बल 18 तास संगणकासमोर बसून काम करण्यास भाग पाडले जात आहे. याहूनही धक्कादायक बाब म्हणजे काम करण्यास नकार देणार्यांना विजेचे शॉक देणे, अमानुष मारहाण करणे, उपाशी ठेवणे आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. माझा जीव धोक्यात आहे. माझ्यासमोर काही जणांची हत्या करण्यात आली आहे.
याबाबत बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी सांगितले की, या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाशी सातत्याने समन्वय साधून आहेत. अडकलेल्या सर्व भारतीय नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यासाठी अधिकृत पत्रव्यवहार सुरू असून विविध केंद्रीय यंत्रणांची मदत घेतली
जात आहे.जानेवारी 2025 मध्येही लाओसमधील बोकेओ प्रांतातील गोल्डन ट्रँगल स्पेशल इकॉनॉमिक झोन परिसरातील सायबर स्कॅम केंद्रांमध्ये अडकलेल्या 67 भारतीयांची भारतीय दूतावासाने सुटका केली होती. नोकरीचे आमिष दाखवून त्यांची मानवी तस्करी करण्यात आली होती. भारतीय दूतावासाच्या पथकाने लाओस प्रशासनाच्या मदतीने त्यांना सुरक्षितपणे राजधानी व्हिएंतियाने येथे आणले. त्यावेळी लाओसमधून 924 भारतीयांची सुटका करण्यात आली होती. तेव्हा थायलंडमधील या प्रकारच्या नोकरीच्या आमिषापासून सावध राहण्याचा इशारा भारतीय दूतावासाने दिला होता.











