Home / महाराष्ट्र / Nasrapur : नसरापूर प्रकरणात नराधमाला फाशी ! न्यायाधीश म्हणाले,फाशी शिक्षाही अपुरी

Nasrapur : नसरापूर प्रकरणात नराधमाला फाशी ! न्यायाधीश म्हणाले,फाशी शिक्षाही अपुरी

Nasrapur – पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची अत्यंत निर्दयीपणे हत्या केल्याप्रकरणी भीमराव कांबळे...

By: Team Navakal
Nasrapur Case
Social + WhatsApp CTA

Nasrapur – पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची अत्यंत निर्दयीपणे हत्या केल्याप्रकरणी भीमराव कांबळे याला शिवाजीनगर सत्र न्यायालयाने आज मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली. हे प्रकरण दुर्मिळात दुर्मीळ (रेअरेस्ट ऑफ रेअर) असल्याचे आणि या निर्घृण गुन्ह्यासाठी आरोपीला फाशीची शिक्षा देणेदेखील अपुरे वाटते, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायाधीश एस.आर.साळुंखे यांनी निकालपत्रात नोंदवले. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 55 दिवसांत पोलीस तपास आणि सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन निकाल लागल्यामुळे हा खटला जलदगती न्यायालयाच्या इतिहासातील संस्मरणीय खटला ठरला आहे.


1 मे 2026 रोजी आरोपी भीमराव कांबळे याने निष्पाप चिमुरडीला गायीचे वासरू दाखवण्याच्या बहाण्याने जनावरांच्या गोठ्यात नेऊन तिच्यावर अमानुषपणे लैंगिक अत्याचार केले आणि अत्यंत निर्घृणपणे तिची हत्या केली. तिचा चेहरा दगडाने ठेचला. तिचा मृतदेह गोठ्यात गवर्‍यांच्या खाली टाकून दिला. या घटनेचे वृत्त कळताच संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. राज्यात उसळलेल्या जनक्षोभाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा खटला जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) चालवण्याचे आदेश दिले होते. पुणे ग्रामीण पोलिसांनी मुख्य तपास अधिकारी विजयमाला पवार यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत जलद गतीने तपास करत अवघ्या 16 दिवसांत आरोपीविरुद्ध बाराशे पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. आरोपपत्रात पोलिसांनी आरोपीविरोधात दाखल केलेले अपहरण, हत्या, अत्याचार असे सात गुन्हे न्यायालयात सिद्ध होतील, असे भक्कम तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुरावे सादर केले.  आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. न्या. एस. आर. साळुंखे यांच्या न्यायासनासमोर विशेष जलदगती न्यायालयात 21 मेपासून खटल्याची दैनंदिन सुनावणी सुरू झाली.  एकूण 55 जणांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यात दोन लहान मुलांची साक्ष महत्त्वाची होती . 25 जून रोजी प्रक्रिया पूर्ण होऊन न्यायालयाने आरोपीला सर्व गुन्ह्यांत दोषी ठरवले होते. शिक्षेची सुनावणी आज  करण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार आज न्यायालयाने निकाल जाहीर केला.


महत्त्वाची बाब म्हणजे या खटल्यात एकही प्रत्यक्षदर्शी पुरावा नव्हता. संपूर्ण खटला परिस्थितीजन्य पुरावे आणि न्यायवैद्यक (फोरेन्सिक) पुराव्यांवर आधारित होता. गुन्हा घडला त्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात आरोपी कांबळे पीडित चिमुरडीसोबत गोठ्याकडे जाताना दिसला होता. हे सीसीटीव्ही फुटेजही महत्त्वपूर्णपुरावा ठरले. आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास न्या.साळुंखे यांनी निकालाचे वाचन करण्यास सुरुवात केली. 137 पानी निकालपत्रात न्या.साळुंखे यांनी लैंगिक अत्याचार आणि खून अशा देशभरातील  12 प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांचा उल्लेख केला. यात बशर अली, बच्चन सिंग , वसंत दुपारे, निर्भया, कठुआ आदि खटले होते. त्या 12 खटल्यांपैकी बहुतांश खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने आरोपींना फाशीचीच शिक्षा सुनावली होती. आरोपीला स्वतःचा बचाव करण्यासाठी आपल्या वयाचा (65 वर्षे) एकमेव मार्ग उपलब्ध होता. मात्र त्याने वयाच्या 53 व्या वर्षी एका वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न आणि कुटुंबातील एका मुलीचा विनयभंग केल्याची पार्श्वभूमी विचारात घेता आरोपी सुधारण्यापलीकडे गेल्याचे  स्पष्ट होते. त्यामुळे त्याला त्याच्या वयाचा विचार करून सौम्य शिक्षा देता येणार नाही, असे निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवले. पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर 17 जखमा असल्याचे आणि तिच्या पायावरील जखम 24 सेंटिमीटर खोल असल्याचे  नमूद करण्यात आले होते. या गोष्टींचा गांभीर्याने विचार करत आरोपीने अत्यंत शांत डोक्याने हा प्रकार केला असा निष्कर्ष न्यायालयाने काढला. सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. अजय मिसर यांनी युक्तिवाद केला.


अशा नराधमांना समाजात राहण्याचा कुठलाही अधिकार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नसरापूर निकालावर आपल्या भावना व्यक्त केल्या. न्यायालयाने दिलेला हा निकाल ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण असून मी या निर्णयाचे स्वागत करतो, असे फडणवीस म्हणाले. हे कायद्याचे राज्य आहे. इथे गुन्हेगारांना अभय दिले जाणार नाही. नसरापुरच्या निकालाने खर्‍या अर्थी न्याय मिळाला आहे. महिला आणि बालिकांवर अत्याचार करणार्‍यांना या निकालाने स्पष्ट इशारा मिळाला आहे. यापुढे कोणी असे घृणास्पद कृत्य करण्यास धजावणार नाही, असा हा कडक इशारा आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या