Blast In Uri Sector : जम्मू- काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्रातील दोन जवान शहीद झाल्याने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली. नवी मुंबईतील ऐरोलीचे विक्रम चव्हाण आणि सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शाहपूरचे अर्जुन जाधव यांनी देशसेवेवर कार्यरत असताना वीरमरण आले. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
काल संध्याकाळी उरी सेक्टरमधील कमलकोट भागात नियंत्रण रेषेजवळ लष्कराच्या तैनातीदरम्यान अचानक स्फोट झाला. या स्फोटात दोन जवान गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने बचाव पथकाच्या मदतीने श्रीनगर येथील लष्कराच्या 92 बेस हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही दोघांना वाचवता आले नाही. लष्कराच्या माहितीनुसार, कमलकोट लष्करी कॅम्पमध्ये शस्त्रास्त्रांची आणि लष्करी साहित्याची नियमित देवाणघेवाण सुरू असताना अचानक हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. या स्फोटात दोन्ही जवान गंभीर जखमी झाले. घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून लष्कराकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. या घटनेनंतर लष्कराने सर्व आवश्यक प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून शहीद जवानांचे पार्थिव लष्करी इतमामात त्यांच्या मूळ गावी पाठविण्याची तयारी केली.









