Delhi Airport : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील 'इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर' (IGI) आज एका मोठ्या दुर्घटनेतून शेकडो प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. विमानतळावर विमाने धावपट्टीच्या दिशेने संथ गतीने जात असताना (Taxiing), स्पाइसजेट आणि अकासा एअर या दोन कंपन्यांच्या विमानांच्या पंखांची एकमेकांना जोराची धडक बसली. या भीषण प्रसंगामुळे विमानतळ परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
नेमकी घटना आणि तांत्रिक बिघाड-
अधिकच्या माहितीनुसार, दोन्ही विमाने आपल्या नियोजित उड्डाणासाठी धावपट्टीकडे मार्गस्थ होत होती. यावेळी अंतराचा अंदाज चुकल्यामुळे किंवा तांत्रिक त्रुटीमुळे दोन्ही विमानांच्या पंखांचे टोके (Wings) एकमेकांवर घासले गेले. या धडकेत दोन्ही विमानांच्या पंखांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विमानतळ प्रशासनाने तात्काळ बचाव यंत्रणा आणि तांत्रिक पथकाला पाचारण केले. दोन्ही विमानांची उड्डाणे त्वरित रद्द करण्यात आली असून, त्यांना सुरक्षितपणे पार्किंग क्षेत्राकडे वळवण्यात आले आहे.
प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित-
विमानांची धडक बसली तेव्हा दोन्ही विमानांमध्ये प्रवासी आणि कर्मचारी उपस्थित होते. अचानक झालेल्या धक्क्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, दोन्ही कंपन्यांनी अधिकृत पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे की, सर्व प्रवासी आणि विमानातील कर्मचारी (Crew Members) पूर्णपणे सुरक्षित आहेत. कोणालाही साधी दुखापत देखील झालेली नाही, ही सर्वात मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे. प्रवाशांच्या प्रवासाची पर्यायी व्यवस्था संबंधित विमान कंपन्यांकडून केली जात आहे.
दिल्ली विमानतळावर उभ्या असलेल्या अकासा एअरच्या विमानाला स्पाइसजेटची धडक; प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले, उच्चस्तरीय चौकशी सुरू-
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज विमानांच्या हालचालींदरम्यान एक गंभीर चूक समोर आली आहे. धावपट्टीच्या बाजूला स्थिर उभ्या असलेल्या अकासा एअरच्या विमानाला स्पाइसजेटच्या विमानाने धडक दिल्याने मोठी खळबळ उडाली. या अपघातात दोन्ही विमानांच्या पंखांचे नुकसान झाले असून, सुदैवाने विमानतळ प्रशासनाच्या तत्परतेमुळे कोणताही मोठा अनर्थ घडला नाही.
नेमकी घटना आणि विमानांची स्थिती-
अकासा एअरचे ‘क्यूपी-१४०६’ (QP-1406) हे विमान दिल्लीहून हैदराबादकडे जाण्यासाठी सज्ज होते आणि विमानतळावर प्रवाशांसह स्थिर उभे होते. त्याच वेळी स्पाइसजेटचे एक विमान उड्डाणपूर्व प्रक्रियेसाठी टॅक्सींग (Taxiing) करत असताना, वैमानिकाला अंतराचा अचूक अंदाज न आल्याने स्पाइसजेटच्या विमानाचा पंख थेट अकासा एअरच्या विमानाला धडकून घासल्या गेला. या धडकेचा आवाज होताच विमानतळ परिसरात काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
प्रशासनाची भूमिका आणि प्रवक्त्यांचे स्पष्टीकरण-
या दुर्घटनेनंतर अकासा एअरच्या अधिकृत प्रवक्त्यांनी परिस्थिती स्पष्ट करताना सांगितले की, “आमचे हैदराबादला जाणारे विमान उभे असतानाच दुसऱ्या कंपनीच्या विमानाने त्याला धडक दिली. या घटनेनंतर तात्काळ सुरक्षा प्रोटोकॉल कार्यान्वित करण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्यांना कोणतीही इजा न होता विमानाबाहेर सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे.” प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवण्यासाठी विमान कंपनीने तातडीने दुसऱ्या विमानाची आणि पर्यायी प्रवासाची व्यवस्था केली आहे. घटनेची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली असून चौकशी सुरू आहे.











