LPG Cylinder New Rules: देशातील एलपीजी सिलिंडरचा तुटवडा रोखण्यासाठी आणि काळाबाजार थांबवण्यासाठी सरकारने ‘एक कुटुंब, एक गॅस कनेक्शन’ हे नवीन धोरण आणले आहे. या अंतर्गत ज्या घरांमध्ये पाईपलाईन गॅस म्हणजेच पीएनजी पोहोचला आहे, त्यांना एलपीजी सिलिंडरचा वापर बंद करावा लागणार आहे.
या पार्श्वभूमीवर एचपीसीएल आणि बीपीसीएल सारख्या मोठ्या सरकारी तेल कंपन्यांनी ग्राहकांसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. ग्राहकांनी लवकरात लवकर पीएनजी कनेक्शनवर शिफ्ट व्हावे, यासाठी विशेष प्रोत्साहन दिले जात आहे.
तेल कंपन्यांकडून ग्राहकांना नवीन आवाहन
- एचपी गॅस: एचपीसीएलने सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे की, कोणत्याही अॅडव्हान्स पेमेंटशिवाय ग्राहक पीएनजी कनेक्शन मिळवू शकतात. हा पर्याय अधिक स्वस्त, सोयीस्कर आणि पर्यावरणासाठी सुरक्षित आहे. यासाठी ग्राहकांनी ‘ई-गॅस सुईट’ अॅप डाऊनलोड करून नोंदणी करावी.
- भारत गॅस: बीपीसीएलने देशातील एलपीजीचा पुरवठा सुरळीत ठेवण्याची ग्वाही दिली आहे. ग्राहकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून गरजेपेक्षा जास्त सिलिंडर बुक करू नयेत, असे आवाहन कंपनीने केले आहे.
कच्च्या तेलाच्या आयातीवरील देशाचे अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकार पीएनजी नेटवर्कचा विस्तार वेगाने करत आहे.
सिलिंडर बुकिंगचे ‘हे’ ७ नवीन नियम जाणून घ्या
१. बुकिंगमधील अंतर वाढवले (लॉकिंग पिरियड): सिलिंडरचा तुटवडा कमी करण्यासाठी दोन बुकिंगमधील अंतर वाढवण्यात आले आहे. आता शहरी भागातील ग्राहकांना 25 दिवसांनंतर, तर ग्रामीण भागातील ग्राहकांना 45 दिवसांनंतरच दुसरे सिलिंडर बुक करता येणार आहे. आधी हा कालावधी केवळ 21 दिवसांचा होता.
२. ओटीपी आधारित डिलिव्हरी: तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला वन टाईम पासवर्ड (ओटीपी) डिलिव्हरी बॉयसोबत शेअर केल्याशिवाय सिलिंडर दिला जाणार नाही.
३. मोबाईल नंबर अपडेट करणे आवश्यक: इंधन पुरवठा सुरळीत राहण्यासाठी ग्राहकांनी गॅस एजन्सीकडे आपला चालू मोबाईल नंबर अपडेट करून घेणे गरजेचे आहे, अन्यथा बुकिंगमध्ये अडचणी येऊ शकतात.
४. आधार बायोमेट्रिक पडताळणी: प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आधार आधारित ई-केवायसी (eKYC) करणे बंधनकारक आहे. ज्या बिगर-उज्ज्वला ग्राहकांनी अद्याप आपली पडताळणी केलेली नाही, त्यांनाही ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
५. २४ जून ते ३० जून दरम्यान कनेक्शन कापले जाणार? ज्या भागात पीएनजी पायाभूत सुविधा तयार आहेत, तिथे राहणाऱ्या नागरिकांना 90 दिवसांच्या आत नवीन कनेक्शन घेण्याची नोटीस देण्यात आली होती. या नियमाचे पालन न केल्यास एलपीजी पुरवठा स्थगित केला जाऊ शकतो. अहवालानुसार, ही मुदत 30 जून 2026 पर्यंत वाढवली जाऊ शकते आणि 1 जुलै 2026 पासून अशी एलपीजी कनेक्शन निष्क्रिय केली जाऊ शकतात.
६. दुहेरी कनेक्शन घेता येणार नाही: ज्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये किंवा घरांमध्ये पीएनजी लाईन आलेली आहे, तिथून एलपीजी सिलिंडर पूर्णपणे हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशा ग्राहकांना त्यांचे जुने एलपीजी कनेक्शन सरेंडर करण्याचे मेसेज पाठवले जात आहेत.
७. ऑनलाईन बुकिंगला प्रोत्साहन: लांब रांगा टाळण्यासाठी सरकारने ग्राहकांना डिजिटल पद्धतीने सिलिंडर बुक करण्याचे प्रोत्साहन दिले आहे. तसेच एलपीजीला पर्याय म्हणून इंडक्शन शेगडी किंवा पीएनजी वापरण्याचा सल्ला दिला जात आहे.
हे देखील वाचा – IPL 2026 Playoff Schedule: आयपीएल प्ले-ऑफचे चित्र स्पष्ट! ‘या’ संघात होणार सामने; पाहा संपूर्ण शेड्युल











