Konkan Railway Reservation: मुंबई आणि आसपासच्या महानगर प्रदेशात राहणाऱ्या लाखो कोकणवासीयांसाठी गणेशोत्सव हा वर्षातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण असतो. या सणासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची लगबग आतापासूनच सुरू झाली आहे. मात्र, यंदा ऐन सणाच्या काळात कोकणात जाणाऱ्या नियमित गाड्यांचे तिकीट मिळणे अत्यंत अवघड झाले आहे. रेल्वेचे आरक्षण सुरू होताच काही मिनिटांत सर्व तिकिटे संपल्यामुळे प्रवाशांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
रेल्वेच्या 60 दिवस आधी तिकीट बुक करण्याच्या नियमानुसार, 10 जुलैपासूनच आरक्षणावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. मुंबई-गोवा मार्गावरील प्रमुख गाड्यांची तिकीट विक्री सुरू होताच आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर प्रतीक्षा यादी संपल्याचा म्हणजेच ‘रिग्रेट’ चा संदेश दिसू लागला आहे, ज्यामुळे चाकरमान्यांचे धाबे दणाणले आहेत.
२०२६ मधील गणेशोत्सवाचे संपूर्ण बुकिंग वेळापत्रक
यंदा 14 सप्टेंबर 2026 रोजी श्रीगणेश चतुर्थी आहे. त्यानुसार, गणेशोत्सवाच्या मुख्य दिवसांत गावी पोहोचण्यासाठी प्रवाशांना खालील तारखा लक्षात ठेवाव्या लागतील:
- 11 सप्टेंबरच्या प्रवासासाठी: ज्या प्रवाशांना 11 सप्टेंबर रोजी रात्री मुंबईतून निघायचे आहे, त्यांच्यासाठी 13 जुलै रोजी सकाळी आरक्षण खिडकी उघडणार आहे.
- 12 आणि 13 सप्टेंबरच्या प्रवासासाठी: या दोन्ही दिवसांचे बुकिंग अनुक्रमे 14 आणि 15 जुलै रोजी करता येईल.
- गौरी आगमनासाठी (17 सप्टेंबर): गौरी पूजनासाठी 17 सप्टेंबर रोजी गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. या प्रवासासाठी 19 जुलै रोजी आरक्षण सुरू होईल.
‘या’ गाड्यांमध्ये थेट नो-रूम; वंदे भारतची तिकिटेही वेटिंगवर
कोकणात जाणाऱ्या नियमित गाड्यांमध्ये सध्या पाय ठेवायलाही जागा शिल्लक राहिलेली नाही. प्रवाशांच्या अत्यंत आवडीच्या गाड्यांमध्ये आरक्षणाची काय स्थिती आहे, ते खालील मुद्द्यांवरून स्पष्ट होते:
- कंडिशन थेट रिग्रेटवर: ट्रेन क्रमांक 20111 कोकणकन्या एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक 12133 मंगळुरू एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक 19057 सुरत मंगळुरू एक्स्प्रेस आणि ट्रेन क्रमांक 22150 पुणे एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये 9 सप्टेंबरच्या प्रवासासाठी तिकीट बुक करताना थेट ‘रिग्रेट’ दाखवले जात आहे.
- इतर गाड्यांची स्थिती: आरामदायी प्रवासासाठी ओळखली जाणारी ‘वंदे भारत’ ट्रेनही 9 सप्टेंबरसाठी वेटिंग लिस्टमध्ये गेली आहे. याशिवाय जनशताब्दी एक्स्प्रेस, वांद्रे मडगाव एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेस या सर्व गाड्यांची प्रतीक्षा यादी मर्यादेबाहेर गेली आहे.
विशेष गाड्या सोडण्याची प्रवाशांची मागणी; मध्य रेल्वेकडे डोळे
नियमित गाड्या हातोहात फुल्ल झाल्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी आणि मीरा-भाईंदर परिसरात राहणाऱ्या कोकणवासीयांची कोंडी झाली आहे. सामान्य आरक्षणातून तिकीट मिळण्याची आशा मावळल्याने आता प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे विशेष फेऱ्या सुरू करण्याची मागणी केली आहे.
दरवर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे प्रशासनाकडून शेकडो विशेष ट्रेन चालवल्या जातात. यंदाही नियमित गाड्यांची अडचण पाहता रेल्वेने तात्काळ अतिरिक्त विशेष गाड्यांची घोषणा करावी, जेणेकरून बाप्पाच्या भक्तांचा प्रवास सुकर होईल, अशी मागणी जोर धरत आहे.











