Vidhan Parishad Election Result : पैशांचे आमीष, मतदारांची फोडाफोडी, राजकीय फसवणूक आणि अंतर्गत विश्वासघाताच्या चर्चांनी ढवळून निघालेल्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या १७ जागांचा निवडणूक निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत राजकीय अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी महायुतीने आपले वर्चस्व राखत एकतर्फी विजय संपादन केला. दुसरीकडे, विरोधी महाविकास आघाडीला (मविआ) या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नसल्याने त्यांचा दारुण पराभव झाला असून मविआ पूर्णपणे भुईसपाट झाली आहे. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत नाशिक आणि नागपूरच्या निकालांनी राज्याच्या राजकारणाला एक वेगळे वळण दिले आहे.
नाशिकमध्ये महायुतीचा अंतर्गत पराभव; नरेंद्र दराडेंचा खळबळजनक आरोप-
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा निकाल अत्यंत धक्कादायक आणि राजकीय संकेत बदलणारा ठरला. येथे भारतीय जनता पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांचा दणदणीत पराभव केला. या पराभवाने संतापलेले नरेंद्र दराडे यांनी जाहीरपणे अंतर्गत फंदफितुरीचा आरोप केला. भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यासह महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी आणि मतदारांनी आपला विश्वासघात केल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला.
वास्तविक पाहता, गिरीश महाजन हे नाशिकमधील भाजपचे नेते गणेश गीते आणि त्यांचे बंधू गोकुळ गीते यांची बंडखोरी शमवण्यासाठी गेले होते. त्यातील गणेश गीते यांनी माघार घेतली, मात्र गोकुळ गीते रिंगणात कायम राहिले. हा संपूर्ण प्रकार पूर्वनियोजित कट होता आणि गिरीश महाजन केवळ मनधरणीचे नाटक करत राहिले, असा थेट आरोप दराडे यांनी केला. नाशिकमध्ये विजयासाठी ३०३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. महायुतीचे गिरीश महाजन, दादा भुसे आणि उदय सामंत हे तीन मंत्री आठवडाभर नाशिकमध्ये तळ ठोकून होते. मतदानाच्या आदल्या दिवशी गोकुळ गीतेंनी केवळ ‘प्रचार थांबवतो’ असे म्हटले होते, ‘माघार घेतो’ असे नाही; याच रणनीतीच्या जोरावर त्यांनी विजय मिळवला.
एकनाथ शिंदेंची ‘विमान’ चाल आणि नाशिकची प्रतिक्रिया
गोकुळ गीते यांचा विजय निश्चित होताच एकनाथ शिंदे यांनी तातडीने राजकीय पावले उचलली. त्यांनी नवनियुक्त अपक्ष आमदार गोकुळ गीते यांना मुंबईला आणण्यासाठी खास विमान पाठवले. यावरून राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू झाली आहे की, गीतेंना निवडून आणून नंतर शिवसेनेत सामील करून घेण्याची योजना उपमुख्यमंत्र्यांनी आधीच आखली होती. दरम्यान, पराभूत नरेंद्र दराडे यांचे बंधू आमदार किशोर दराडे हे तातडीने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले.
या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देताना गिरीश महाजन म्हणाले की, नाशिकचा निकाल आमच्यासाठी अत्यंत धक्कादायक आहे. महायुतीकडे ६२० पैकी पावणेपाचशे मते असतानाही आमचा अधिकृत उमेदवार पराभूत का झाला, याचे आत्मपरीक्षण करावे लागेल. मी स्वतः जळगावची निवडणूक सोडून नाशिकच्या बूथवर पूर्ण वेळ उपस्थित होतो. या पराभवाच्या कारणांविषयी मी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे.
नागपूरमध्ये १० लाखांचा घोडेबाजार; अतुल लोंढेंचा नैतिक विजयाचा दावा-
नागपूर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे राजीव पोतदार तब्बल ६८२ मते मिळवून विजयी झाले, तर काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांना केवळ १३० मतांवर समाधान मानावे लागले. नागपुरात काँग्रेसकडे स्वतःची १७० आणि महाविकास आघाडीचे एकत्रित २११ संख्याबळ असतानाही लोंढे यांना फक्त १३० मते मिळाल्याने मविआची मते मोठ्या प्रमाणावर फुटल्याचे सिद्ध झाले आहे.
निकालानंतर अतुल लोंढे यांनी भाजपवर तीव्र हल्लाबोल केला. भाजपने महाविकास आघाडीच्या मतदारांना प्रत्येकी १० लाख रुपये देऊन तब्बल १०० मते फोडली, असा गंभीर आरोप त्यांनी केला. लोंढे म्हणाले की, मी ही निवडणूक धनशक्तीविरुद्ध हिंमतीने लढलो आणि निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही. मला मिळालेली १३० मते ही विकली न गेलेल्या प्रामाणिक सदस्यांची मते आहेत, त्यामुळे हा माझा नैतिक विजय आहे.
सांगली, लातूर आणि परभणीमध्ये महायुतीची विजयी घोडदौड
राज्यातील इतर मतदारसंघांमध्ये महायुतीने एकतर्फी विजय मिळवला. अत्यंत प्रतिष्ठेच्या सांगली-सातारा मतदारसंघात भाजपच्या धैर्यशील कदम यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांचा ३०१ मतांनी पराभव केला. हा निकाल मविआचे नेते जयंत पाटील यांच्या स्थानिक राजकारणासाठी मोठा धक्का मानला जातो. तर धाराशिव-बीड-लातूर मतदारसंघात भाजपच्या बसवराज पाटील यांनी काँग्रेसच्या महेश देशमुख यांचा ७२१ मतांच्या विक्रमी फरकाने पराभव केला. येथे बसवराज पाटील यांना ८४५ तर महेश देशमुख यांना अवघी १२४ मते मिळाली. मतमोजणीपूर्वीच भाजपच्या विजयाचे फलक लागल्याने आधीच वातावरण तापले होते.
छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघातही अपेक्षेप्रमाणे भाजपच्या सुहास शिरसाठ यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे गणेश लोखंडे यांचा पराभव केला. पराभवानंतर लोखंडे म्हणाले की, संख्याबळ कमी असूनही पक्षप्रमुखांचा शब्द पाळण्यासाठी मी लढलो. आमच्या लढ्यामुळे भाजप नेत्यांना मतदारांच्या दारापर्यंत जावे लागले आणि मविआच्या एकूण ११९ संख्याबळापेक्षा मला १३४ मते मिळाल्याने भाजपची १५ मते मला मिळाली, हे विशेष.
अमरावतीमध्ये हॅटट्रिक तर जळगाव आणि परभणीत अंतर्गत नाराजी-
अमरावती मतदारसंघात भाजपच्या प्रवीण पोटे यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून आपली हॅटट्रिक पूर्ण केली. त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या निलेश विश्वकर्मा यांचा ३५९ मतांनी पराभव केला. येथे काँग्रेसने मतदानात तटस्थ राहण्याचा आदेश (व्हिप) काढूनही काही सदस्यांनी तो धुडकावून मतदान केले, तर काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षजीत देशमुख यांना एकही मत मिळाले नाही. नांदेडमध्ये भाजपचे अमरनाथ राजुरकर तर सोलापूरमध्ये भाजपचे राजेंद्र राऊत विजयी झाले.
परभणी-हिंगोली मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार सईद खान (शिंदे गट) २४२ मते मिळवून विजयी झाले. मात्र, महायुतीचे येथे ३०० हून अधिक संख्याबळ असतानाही त्यांना कमी मते मिळाल्याने त्यांची ५६ मते फुटल्याचे समोर आले. ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला हवी होती, कारण त्यांच्याकडे १३१ सदस्य होते. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या आग्रहामुळे ही जागा शिवसेनेला देण्यात आली आणि सईद खान यांच्या संघटनात्मक कामाची पावती म्हणून त्यांना उमेदवारी मिळाली होती, ज्यावर राष्ट्रवादीचे स्थानिक नेते नाराज होते. तसेच जळगाव मतदारसंघात महायुतीचे नंदकिशोर महाजन यांनी ५७७ मते मिळवून दणदणीत विजय मिळवला, तर मविआचे शरद तायडे यांना केवळ १७ मते मिळाली.
सहा जागा बिनविरोध; भाजप ठरला मोठा भाऊ
या निवडणुकीत महायुतीने आधीच सहा जागा बिनविरोध जिंकल्या होत्या. यामध्ये ठाणे मतदारसंघातून रवींद्र फाटक (शिवसेना), यवतमाळमधून दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना), रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस), पुण्यातून विक्रम काकडे (राष्ट्रवादी काँग्रेस), वर्धा-गडचिरोली-चंद्रपूरमधून अरुण लखाणी (भाजप) आणि अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे (भाजप) यांचा समावेश आहे. या सर्व निकालांनंतर १७ जागांपैकी १६ जागांवर महायुतीने कब्जा केला असून, सर्वाधिक ११ जागा भाजपला, ३ जागा शिवसेनेला आणि २ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या आहेत.
“अनावश्यक गर्दी कशाला?” – आमदार आशिष देशमुख
सत्ताधारी महायुतीकडे आधीच तीन चतुर्थांशपेक्षा जास्त बहुमत असल्याने नवीन आमदारांची पक्षात भर घालण्याची गरज नाही, अशी सूचक भूमिका भाजपचे नेते व नागपूरचे आमदार आशिष देशमुख यांनी मांडली. विधान परिषद निकालांच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले की, सर्व विद्यमान आमदारांना पुरेसा विकास निधी देण्यासाठी आहे ते संख्याबळ पुरेसे आहे. आणखी नवीन लोक पक्षात घेत राहिल्यास भविष्यात मूळ कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना उमेदवारी कशी द्यायची, असा मोठा प्रश्न निर्माण होईल, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
विधान परिषद निवडणूक २०२६ अंतिम पक्षीय बलाबल: महायुतीचे वर्चस्व; विरोधी महाविकास आघाडी पूर्णपणे निष्प्रभ
नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या १७ जागांच्या अत्यंत चुरशीच्या आणि महत्त्वपूर्ण निवडणुकीचे अंतिम पक्षीय चित्र आता स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीच्या निकालांवरून सत्ताधारी महायुतीने राज्याच्या राजकीय पटलावर आपले एकछत्री आणि अभूतपूर्व वर्चस्व सिद्ध केले आहे. संपूर्ण ताकदीनिशी उतरलेल्या महायुतीने विरोधी पक्षांना धोबीपछाड देत बहुतांश जागांवर विजय मिळवला आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला (मविआ) या निवडणुकीत खाते उघडण्यातही अपयश आले आहे.
महायुतीत ‘भारतीय जनता पक्ष’ ठरला सर्वात मोठा पक्ष-
एकूण १७ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने (भाजप) सिंहश्याचा वाटा उचलला आहे. भाजपच्या रणनीतीला आणि तळागाळातील नियोजनाला मोठे यश आले असून, पक्षाने १७ पैकी तब्बल ११ जागांवर दणदणीत विजय संपादन केला आहे. या घवघवीत यशामुळे विधान परिषदेतील भाजपचे संख्याबळ आणि राजकीय वजन अधिकच वाढले आहे.
शिंदे गट आणि अजित पवार गटाची कामगिरी-
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही या निवडणुकीत महायुतीच्या विजयाला मोलाचा हातभार लावला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेने ३ जागांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तर दुसरीकडे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २ जागांवर यश मिळाले आहे. महायुतीच्या तिन्ही घटकांनी मिळून १७ पैकी १६ जागांवर विजय मिळवत विरोधकांना चारी मुंड्या चीत केले आहे.
अपक्षाची अनपेक्षित एन्ट्री आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव
या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे नाशिकच्या जागेवर झालेली नाट्यमय घडामोड होय. महायुती आणि महाविकास आघाडीच्या राजकीय गणितांना छेद देत १ जागेवर अपक्ष उमेदवाराने (गोकुळ गीते) बाजी मारली आहे.
सर्वात धक्कादायक आणि नामुष्कीजनक स्थिती विरोधी पक्षांची, म्हणजेच महाविकास आघाडीची (मविआ) झाली आहे. काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या एकत्रित शक्तीला या निवडणुकीत मतदारांनी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांनी साफ नाकारले आहे. मविआला या १७ जागांपैकी एकही (०) जागा जिंकता आली नाही. यामुळे विधान परिषदेच्या या निवडणुकीत विरोधी पक्षांचा पूर्णपणे सुपडासाफ झाला असून, महायुतीसाठी हा विजय आगामी काळातील राजकीय वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.










