Mamata Banerjee Slams BJP: पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (TMC) सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षावर अत्यंत कडक शब्दांत टीका केली आहे. भाजप आगामी काळात दिल्लीतील सत्ता गमावणार असल्याचे भाकीत त्यांनी केले आहे. आपल्या निवासस्थानी आयोजित टीएमसी आमदारांच्या बैठकीत त्यांनी ही विधाने केली.
पश्चिम बंगालमधील सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील नवीन भाजप सरकारवर निशाणा साधताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, हे सरकार देशाच्या घटनात्मक मूल्यांशी छेडछाड करत आहे. राज्यातील अल्पसंख्याक समुदाय आणि रस्त्यावरील फेरीवाल्यांना जाणूनबुजून लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
‘बुलडोझर’ कारवाईवरून राजकारण तापले
निवडणुकीनंतरचा हिंसाचार आणि बेकायदेशीर अतिक्रमणांवरील कारवाईचा हवाला देत ममता बॅनर्जी यांनी भाजपवर तोफ डागली आहे.
- फेरीवाल्यांवर कारवाई: राज्यातील विविध भागांत फेरीवाल्यांचे स्टॉल्स बुलडोझर लावून पाडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
- टीएमसीचे आंदोलन: या सक्तीच्या निष्कासनाविरोधात आणि भाजपच्या कथित बुलडोझर संस्कृतीविरोधात टीएमसी २१ मे पासून मोठे आंदोलन सुरू करणार आहे.
- आंदोलनाची ठिकाणे: कोलकाता आणि आसपासच्या परिसरातील बालीगंज, हावडा जंक्शन आणि सियालदह रेल्वे स्टेशन अशा ३ प्रमुख ठिकाणी ही निदर्शने केली जातील.
अभिषेक बॅनर्जींचे भाजपला खुले आव्हान
या बैठकीत ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि लोकसभा खासदार अभिषेक बॅनर्जी यांनीही भाजपला थेट आव्हान दिले. दक्षिण कोलकात्यामधील त्यांच्या घराचा कथित अनधिकृत भाग पाडण्यासाठी कोलकाता महानगरपालिकेने (KMC) त्यांना एक नोटीस पाठवली आहे.
या नोटिसीवर बोलताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, त्यांना जे करायचे आहे ते करू देत, माझे घर पाडले किंवा नोटीस पाठवली तरी मी अशा धमक्यांना अजिबात घाबरणार नाही. काहीही झाले तरी भाजपविरुद्धचा हा लढा सुरूच राहील. विशेष म्हणजे, ज्या महानगरपालिकेने ही नोटीस पाठवली आहे ती अजूनही टीएमसीच्याच ताब्यात असून ममता बॅनर्जींचे निकटवर्तीय फिरहाद हकीम हे तिथले महापौर आहेत.
मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यावर टीका
अभिषेक बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यावरही जुन्या प्रकरणावरून निशाणा साधला. २०१४ मधील गाजलेल्या नारदा स्टिंग ऑपरेशनचा उल्लेख करत ते म्हणाले की, राज्याने आजवर अनेक मुख्यमंत्री पाहिले, पण कॅमेऱ्यासमोर पैसे घेताना दिसलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्रिपदावर बसवण्याची ही पहिलीच वेळ आहे. या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे बंगालमधील वातावरण चांगलेच तापले आहे.
हे देखील वाचा – PM Modi Norway Visit: पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करणारी ‘ती’ परदेशी पत्रकार कोण? सोशल मीडियावर तुफान चर्चा










