Home / देश-विदेश / NEET Re-Exam : NEET २०२६ परीक्षा अखेर रद्द! पेपरफुटीच्या कलंकानंतर केंद्र सरकारचा निर्णय; कोट्यवधी विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी?

NEET Re-Exam : NEET २०२६ परीक्षा अखेर रद्द! पेपरफुटीच्या कलंकानंतर केंद्र सरकारचा निर्णय; कोट्यवधी विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी?

NEET Re-Exam : देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या ‘नीट’ (NEET) प्रवेश परीक्षेसंदर्भात केंद्र सरकारने एक अत्यंत मोठा आणि महत्त्वपूर्ण...

By: Team Navakal
NEET Re-Exam :
Social + WhatsApp CTA

NEET Re-Exam : देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या ‘नीट’ (NEET) प्रवेश परीक्षेसंदर्भात केंद्र सरकारने एक अत्यंत मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ३ मे २०२६ रोजी देशभर पार पडलेली ही परीक्षा आता अधिकृतपणे रद्द करण्यात आली आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटल्याचे सिद्ध झाल्यामुळे पारदर्शकतेच्या हेतूने सरकारने हा टोकाचा निर्णय घेतला असून, ही परीक्षा आता नव्याने घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना धक्का-
नुकताच राज्याचा १० वी आणि १२ वीचा निकाल जाहीर झाला आहे. १० वी उत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी आतापासूनच वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी नीटच्या तयारीला सुरुवात केली आहे, तर १२ वीच्या हजारो विद्यार्थ्यांनी ‘डॉक्टर’ होण्याचे स्वप्न उराशी बाळगून यंदाची नीट परीक्षा दिली होती. परीक्षेसाठी दिवसरात्र कष्ट घेतलेल्या या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा रद्द होण्याचा निर्णय अत्यंत धक्कादायक ठरला आहे. तथापि, गुणवत्तापूर्ण आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, यासाठी फेरपरीक्षा घेणे अनिवार्य असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

पेपरफुटीचे प्रकरण आणि राजकीय पडसाद-
३ मे रोजी झालेल्या या परीक्षेनंतर पेपरफुटीच्या तक्रारी समोर आल्या होत्या. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण मंत्रालय आणि संबंधित यंत्रणांनी सखोल चौकशी केली. या प्रकरणावरून देशाच्या राजकीय वर्तुळातही मोठे वादंग निर्माण झाले आहे. काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या पेपरफुटीचा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित केला होता. “देशातील शिक्षण व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार शिरला असून लाखो तरुणांच्या भविष्याशी खेळ खेळला जात आहे,” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले होते. विरोधकांच्या वाढत्या दबावानंतर आणि तपासातील निष्कर्षांनंतर सरकारने अखेर ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

‘नीट’ परीक्षेचा पेपर ४२ तास आधीच फुटला; २२ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी, राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेचा मोठा निर्णय-
देशातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘नीट’ (NEET) प्रवेश परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. ३ मे २०२६ रोजी पार पडलेल्या या परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षेच्या तब्बल ४२ तास आधीच समाजमाध्यमांवर आणि इतर मार्गांनी बाहेर आल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रचंड मोठ्या गोपनीयता भंगाच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेने (NTA) संपूर्ण देशातील परीक्षा प्रक्रिया रद्द करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.

देशभरातील आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर परिणाम-
यंदाच्या वर्षी ‘डॉक्टर’ होण्याचे ध्येय उराशी बाळगून देशातील सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यामध्ये महाराष्ट्रातील अडीच लाख विद्यार्थ्यांचा समावेश होता. वर्षभर कठोर परिश्रम आणि लाखो रुपये खर्च करून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय अत्यंत क्लेशदायक ठरला आहे. परीक्षेच्या दोन दिवस आधीच प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. गुणवत्तेचे नुकसान टाळण्यासाठी आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी ही परीक्षा रद्द करण्यावाचून प्रशासनासमोर दुसरा पर्याय उरला नव्हता.

पेपरफुटीचा विळखा आणि राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेची कारवाई-
तपास यंत्रणांनी दिलेल्या अहवालानुसार, ३ मे रोजी दुपारी होणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका ४२ तास आधीच काही ठराविक केंद्रांवर आणि विद्यार्थ्यांकडे पोहोचली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) सुरुवातीला या प्रकरणाची सखोल चौकशी केली आणि त्यानंतर ही परीक्षा पूर्णपणे रद्द करण्याचे अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले. पेपरफुटीच्या या जाळ्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

फेरपरीक्षेचे आव्हान आणि विद्यार्थ्यांची चिंता-
आता ही परीक्षा नव्याने घेतली जाणार असली, तरी त्याबाबतच्या नियोजनामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी आता फेरपरीक्षेच्या नवीन तारखांची प्रतीक्षा करत आहेत.

‘नीट’ परीक्षेतील गैरप्रकारावरून रोहित पवार आक्रमक; “विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी करणाऱ्या दलालांवर कठोर कारवाई करा”-
नीट (NEET) प्रवेश परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. २८१ प्रश्नांच्या एका ‘गेस पेपर’मधील (Guess Paper) तब्बल १३१ प्रश्न जसेच्या तसे मुख्य परीक्षेत येणे, हा निव्वळ योगायोग नसून पैशांच्या मोठ्या खेळाचा भाग असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तपास यंत्रणांनी दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.

२०२४ च्या पुनरावृत्तीचा आरोप-
रोहित पवार यांनी आपल्या प्रतिक्रियेत नमूद केले की, ज्याप्रमाणे २०२४ मध्ये नीट परीक्षेत घोळ झाला होता, तसाच प्रकार यंदाही घडला आहे. एका विशिष्ट गेस पेपरमधील बहुतांश प्रश्न मुख्य प्रश्नपत्रिकेत आढळणे, हे या परीक्षेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचे स्पष्ट लक्षण आहे. “जर ठराविक दलालांच्या फायद्यासाठी अशा प्रकारे प्रश्नपत्रिका आधीच उपलब्ध करून दिल्या जात असतील, तर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे काय?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

एसआरपीएफ परीक्षेतील गैरप्रकाराचा दिला संदर्भ-
केवळ नीटच नव्हे, तर महाराष्ट्रातील इतर परीक्षांच्या सुरक्षेबाबतही रोहित पवारांनी चिंता व्यक्त केली. गेल्या आठवड्यात राज्यात झालेल्या ‘एसआरपीएफ’ (SRPF) भरती परीक्षेतही अशाच प्रकारचा संशयास्पद प्रकार घडल्याचा उल्लेख त्यांनी केला. “राज्यातील आणि देशातील विविध परीक्षांमध्ये दलालांचा हस्तक्षेप वाढत चालला आहे. या पैशांच्या खेळात गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळ मांडला जात आहे, जो अत्यंत दुर्दैवी आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

कठोर तपासाची मागणी-
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी करणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश करणे आवश्यक असल्याचे रोहित पवार म्हणाले. त्यांनी तपास यंत्रणांना विनंती केली आहे की, या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून यातील मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक करावी.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या