Kohinoor Diamond Return Demand: न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स ३ यांच्याकडे ऐतिहासिक कोहिनूर हिरा भारताला परत करण्याची आग्रही मागणी केली आहे. किंग चार्ल्स सध्या अमेरिका दौऱ्यावर असून, न्यूयॉर्कमधील ९/११ स्मारक स्थळावर आयोजित कार्यक्रमात ममदानी यांनी ही भूमिका मांडली.
भारतीय वंशाचे असलेले ममदानी यांच्या या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा कोहिनूरच्या मालकी हक्कावरून चर्चा सुरू झाली आहे.
Kohinoor Diamond Return Demand: खाजगी भेटीत मांडणार भूमिका
एका पत्रकार परिषदेत बोलताना महापौर ममदानी म्हणाले की, कोहिनूरचा मुद्दा अधिकृत अजेंड्यावर नसला तरी, त्यांना किंग चार्ल्स यांच्याशी खाजगीत संवाद साधण्याची संधी मिळाल्यास ते हा विषय नक्कीच मांडतील. “मी जर राजांशी स्वतंत्रपणे बोललो, तर मी त्यांना कोहिनूर हिरा भारताला परत करण्यासाठी प्रोत्साहित करेन,” असे ममदानी यांनी भेटीपूर्वी स्पष्ट केले होते.
९/११ मेमोरियल इव्हेंटमध्ये या दोघांमध्ये थोडा वेळ संवाद झाला, मात्र कोहिनूरवर नक्की काय चर्चा झाली, हे अद्याप अधिकृतपणे समोर आलेले नाही.
Kohinoor Diamond Return Demand: कोहिनूरचा रक्तरंजित इतिहास
कोहिनूर हा १०५.६ कॅरेटचा मौल्यवान हिरा मूळचा भारतातील आहे. १८४९ मध्ये लाहोरच्या तहानुसार ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने हा हिरा बळजबरीने ताब्यात घेतला होता. त्यावेळी बाल-महाराजा दुलीप सिंग यांना हा हिरा ब्रिटिशांच्या स्वाधीन करण्यास भाग पाडले गेले होते. सध्या हा हिरा ब्रिटीश राजमुकुटाचा भाग असून तो ‘टावर ऑफ लंडन’मध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे.
Kohinoor Diamond Return Demand: भारताची ठाम भूमिका
भारत सरकारने वेळोवेळी हा हिरा परत करण्याची मागणी केली आहे. ब्रिटिशांनी हा हिरा भेट म्हणून नव्हे, तर दबावाखाली लुटून नेला होता, अशी भारताची भूमिका आहे. भारतासाठी कोहिनूर हा केवळ हिरा नसून तो आपल्या समृद्ध इतिहासाचा आणि कलेचा एक अविभाज्य भाग आहे. दुसरीकडे, ब्रिटन १९ व्या शतकातील कराराचा दाखला देत कायदेशीर मालकी हक्क सांगत आहे.
मोगल सम्राट, पर्शियन शाह आणि अफगाण अमिरांच्या हातातून फिरत हा हिरा शेवटी ब्रिटिशांकडे गेला. आता न्यूयॉर्कच्या महापौरांच्या या मागणीमुळे ब्रिटीश राजघराणे यावर काय पाऊल उचलते, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा –
Vidhan Parishad Election Process: विधान परिषद निवडणूक कशी होते? वाचा










