Home / राजकीय / White Strips Controversy : घाटकोपर-दादरनंतर गिरगावातही पांढऱ्या पट्ट्या ; मनसे-गिरगांवकर रस्त्यावर

White Strips Controversy : घाटकोपर-दादरनंतर गिरगावातही पांढऱ्या पट्ट्या ; मनसे-गिरगांवकर रस्त्यावर

White Strips Controversy : घाटकोपरमध्ये (Ghatkopar)सुरू झालेला पांढऱ्या पट्ट्यांचा वाद (White Strips Controversy)दादरनंतर आता गिरगावात पोहोचला आहे. गिरगाव (Girgaon) चौपाटी...

By: Team Navakal
White Strips Controversy
Social + WhatsApp CTA

White Strips Controversy : घाटकोपरमध्ये (Ghatkopar)सुरू झालेला पांढऱ्या पट्ट्यांचा वाद (White Strips Controversy)दादरनंतर आता गिरगावात पोहोचला आहे. गिरगाव (Girgaon) चौपाटी परिसरातील सुखसागर सोसायटीसमोरील (Sukh Sagar Society)फुटपाथवर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या आढळून आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पट्ट्यांवर काळा रंग फासत मनसे आणि ‘आम्ही गिरगांवकर’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. यावेळी गावदेवी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मुंबईतील सार्वजनिक रस्ते आणि फुटपाथवर धार्मिक कारणांसाठी काढल्या जाणाऱ्या कथित पांढऱ्या पट्ट्यांवरून गेल्या काही दिवसांत मोठा वाद निर्माण झाला आहे. मनसे, जैन समाज, स्थानिक संघटना आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष आता अधिक तीव्र होताना दिसत आहे.

घाटकोपरपासून सुरू झालेला वाद

या संपूर्ण वादाची सुरुवात घाटकोपर-विद्याविहार परिसरातून झाली. जैन धर्मगुरूंच्या आगमनासाठी एका सोसायटीच्या परिसरात पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक (Influencer Prasad Vedpathak) यांनी या विषयावर आक्षेप घेतल्याने हा मुद्दा राज्यभर चर्चेत आला.

जैन समाजातील नागरिकांच्या मते, चातुर्मास काळात किंवा धर्मगुरूंच्या आगमनावेळी त्यांच्या पायाखाली कीटक-किडे चिरडले जाऊ नयेत, या धार्मिक श्रद्धेतून अशा पट्ट्या काढल्या जातात. मात्र सार्वजनिक रस्त्यांवर असे रंगकाम करणे योग्य नसल्याचा आक्षेप मनसे आणि काही स्थानिक नागरिकांकडून घेतला जात आहे.

दादरमधून वादाची ठिणगी

मनसे नेते संदीप देशपांडे (MNS leader Sandeep Deshpande)यांच्या दादरमधील जनसंपर्क कार्यालयाजवळील रस्त्यावरही अशाच प्रकारचे पट्टे मारण्यात आले होते. ही बाब समोर आल्यानंतर देशपांडे यांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली. त्यानंतर पालिका आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला थिनर (Thinner) वापरून रंग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र रंग निघत नसल्याने अखेर त्या पट्ट्यांवर काळा रंग फासण्यात आला.

सार्वजनिक रस्त्यांवर अशा प्रकारचे रंगकाम करणाऱ्यांकडून त्याचा खर्च वसूल का केला जात नाही, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

हा सांस्कृतिक दहशतवाद’ – संदीप देशपांडे

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संदीप देशपांडे म्हणाले, “सार्वजनिक जागांचा वापर नियमांनुसारच व्हायला हवा. रस्त्यावरची ही पांढरी पट्टी केवळ प्रतीकात्मक (Symbolic) नाही, तर सार्वजनिक जागांवर धार्मिक वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे. आज येथे, उद्या दुसरीकडे असे प्रकार सुरू राहतील. हा सांस्कृतिक दहशतवाद करण्याचा प्रयत्न असून जो कोणी कायद्याच्या विरोधात जाईल, त्याला आमचा विरोध राहील.”

जैन धर्मगुरूंचा पलटवार

देशपांडे यांच्या वक्तव्यावर जैन धर्मगुरू निलेशचंद्र मुनी (Jain Nileshchandra muni)यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. “जैन समाज शांतताप्रिय आहे, याचा अर्थ आम्ही कमकुवत आहोत असा होत नाही. जर मनसेला खरोखरच सार्वजनिक रस्त्यांच्या वापराबाबत आक्षेप असेल, तर त्यांनी इतर भागांमध्येही जाऊन अशीच भूमिका घ्यावी. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करू नये,” असे ते म्हणाले.

महापालिकेची कारवाई

दरम्यान, मुंबई महापालिकेने (BMC)या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. जी/उत्तर विभागातील विविध रस्त्यांवर अनधिकृतरीत्या पांढरे पट्टे मारल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालिकेने पोलिसांना पत्र पाठवून कारवाईची मागणी केली आहे.

पालिकेने स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारचे पट्टे मारण्यासाठी कोणालाही अधिकृत परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच यासाठी कोणतीही अधिकृत प्रक्रिया (Procedure) अस्तित्वात नसल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन

या वादावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयमाचे आवाहन केले. “कोणत्याही समाजाला एकमेकांसमोर उभे करणे किंवा दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणे योग्य नाही. प्रत्येकाने आपल्या परंपरा जपाव्यात, मात्र इतरांच्या भावना आणि अधिकारांचाही आदर राखला पाहिजे. प्रत्येक विषयाला वादाचे स्वरूप देऊन त्यात राजकारण मिसळल्याने कोणाचाही फायदा होत नाही,” असे ते म्हणाले.

जुने वाद पुन्हा चर्चेत

गेल्या काही महिन्यांत जैन समाज आणि मनसे यांच्यात विविध मुद्द्यांवरून वाद निर्माण झाले आहेत. घाटकोपरमधील कथित मांसाहार वाद, दादरमधील कबुतरखाना प्रकरण, तसेच मलबार हिल परिसरातील गुजराती भाषेतील नामफलकांवरून निर्माण झालेला वाद या घटनांची पार्श्वभूमी असताना आता पांढऱ्या पट्ट्यांचा मुद्दा नव्या संघर्षाचे कारण ठरत आहे. गिरगावातील ताज्या घटनेमुळे हा वाद आता केवळ घाटकोपर किंवा दादरपुरता मर्यादित राहिलेला नसून, मुंबईच्या विविध भागांत त्याचे पडसाद उमटू लागल्याचे चित्र दिसत आहे.


हे देखील वाचा –

सर्वात महाभयानक ‘एल निनो’ समुद्रात सक्रिय? डिसेंबर महिन्यात निसर्ग धारण करणार अत्यंत अक्राळविक्राळ रूप? देशावर पुन्हा दुष्काळाचं सावट? वाचा विशेष रिपोर्ट..

जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र अन् पोलिसांच्या नोटिसींनंतरही रोहित पवार आंदोलनावर ठाम; पंढरपूरच्या ऐतिहासिक चौकात आमदार रोहित पवारांचे ‘अन्नत्याग’ उपोषण…

 महाराष्ट्रातील लाखो महिला शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा निर्णय; आगामी पावसाळी अधिवेशनात येणार ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’!

Web Title:
संबंधित बातम्या