Rogue Elephant Attack: नियतीचा खेळ आणि प्राण्यांचा थरार किती भयंकर असू शकतो, याचा प्रत्यय आणून देणारी एक अत्यंत वेदनादायी घटना नेपाळमधून समोर आली आहे. एका हिंस्र हत्तीने एकाच कुटुंबाचा जणू पिच्छाच पुरवला आहे. तब्बल 14 वर्षांच्या कालावधीत या हत्तीने एकाच कुटुंबातील 4 निष्पाप लोकांचा जीव घेतला आहे.
विशेष म्हणजे हत्तीच्या दहशतीमुळे या कुटुंबाने आपले मूळ गाव सोडून 9 मैल दूर दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केले होते, तरीही त्यांचा जीव वाचू शकला नाही.
या भीषण कथेची सुरुवात डिसेंबर 2012 मध्ये झाली होती. नेपाळच्या चितवन राष्ट्रीय उद्यानाजवळ असलेल्या माडी शहरात ‘धुर्वे’ नावाच्या एका हत्तीने शनीचरा बोटे यांच्या आई-वडिलांना चिरडून ठार केले होते. या दुःखातून सावरत आणि हत्तीच्या दहशतीपासून वाचण्यासाठी शनीचरा यांनी रापती नदी ओलांडून 9 मैल दूर जगतपूर येथे नवीन संसार थाटला. नदी ओलांडल्यामुळे आपण आता सुरक्षित आहोत, असा या कुटुंबाचा समज होता.
25 जणांचा बळी घेणारा नेपाळचा सर्वात खतरनाक हत्ती
अनेक वर्षे शांततेत गेल्यानंतर या महिन्याच्या सुरुवातीला जगतपूरमध्ये पुन्हा एकदा काळाने घाला घातला. धुर्वे हत्तीने शनीचरा यांच्या घरात घुसून त्यांची 25 वर्षांची सून आशिका बोटे आणि अवघ्या 4 वर्षांचा नातू भरत बोटे यांना चिरडून ठार केले.
या हत्तीशी संबंधित काही महत्त्वाच्या बाबी खालीलप्रमाणे आहेत:
- एकूण मृत्यू: चितवन राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2010 पासून आतापर्यंत या एकाच हत्तीने 25 जणांचा बळी घेतला आहे.
- विकिपीडिया पेज: या हत्तीची दहशत इतकी मोठी आहे की, इंटरनेटवर धुर्वे या हत्तीच्या नावाचे स्वतंत्र विकिपीडिया पेज असून त्यावर त्याने घेतलेल्या 25 बळींची सविस्तर माहिती नोंदवण्यात आली आहे.
- हताश कुटुंब: “आम्हाला वाटले होते की मोठी नदी ओलांडून दूर गेल्यावर आम्ही सुरक्षित राहू. पण इतक्या वर्षांनी त्याच हत्तीने आमचा शोध घेतला आणि माझ्या सुनेला व नातवाला हिरावून नेले. आता आमच्यासाठी पळून जाण्यासारखी कोणतीही जागा उरलेली नाही,” अशी उद्विग्न प्रतिक्रिया शनीचरा यांनी दिली.
ट्रॅकिंग कॉलर लावूनही यंत्रणा अपयशी
चितवन राष्ट्रीय उद्यानाचे प्रतिनिधी अविनाश थापा मगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेपूर्वी धुर्वेच्या नावावर 23 मृत्यूंची नोंद होती. परंतु, जगतपूरमधील या ताज्या 2 दुर्घटनेनंतर हा आकडा आता 25 वर पोहोचला आहे.
वन्यजीव अधिकाऱ्यांनी या हिंस्र हत्तीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि पुढील हल्ले रोखण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न केले आहेत. या मोहिमेचा भाग म्हणून खालील गोष्टी करण्यात आल्या होत्या:
- या हत्तीला 2016 मध्ये पहिल्यांदा शोधून त्याच्या गळ्यात ट्रॅकिंग कॉलर बसवण्यात आली होती.
- पहिली कॉलर निकामी झाल्यानंतर 2020 मध्ये दुसरी नवीन ट्रॅकिंग कॉलर बसवण्यात आली.
- त्यानंतर 2023 मध्ये पुन्हा एकदा कॉलर बदलून नवीन यंत्रणा बसवण्यात आली होती.
इतकी प्रगत यंत्रणा आणि ट्रॅकिंग कॉलर लावूनही हा हत्ती मानवी वस्तीत घुसून लोकांचे जीव घेत असल्याने स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.









