Home / देश-विदेश / West Bengal New CM : ममता दीदींना शह! सुवेंदू अधिकारी होणार नवे मुख्यमंत्री; भाजपच्या घोषणेने तृणमूलच्या गोटात खळबळ!

West Bengal New CM : ममता दीदींना शह! सुवेंदू अधिकारी होणार नवे मुख्यमंत्री; भाजपच्या घोषणेने तृणमूलच्या गोटात खळबळ!

West Bengal New CM : पश्चिम बंगालच्या राजकारणात आज एका ऐतिहासिक आणि नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा...

By: Team Navakal
West Bengal New CM
Social + WhatsApp CTA

West Bengal New CM : पश्चिम बंगालच्या राजकारणात आज एका ऐतिहासिक आणि नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचा सलग दोनवेळा पराभव करणारे भारतीय जनता पक्षाचे धडाडीचे नेते सुवेंदू अधिकारी हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचे शुक्रवारी निश्चित झाले. कोलकाता येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अधिकारी यांची पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.

अमित शाह यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक बैठक
राज्यात सत्ता स्थापनेचा दावा करण्यापूर्वी भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची महत्त्वाची बैठक कोलकाता येथील बिस्वा बांगला कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विशेष निमंत्रित म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि प्रदेशाध्यक्ष शमिक भट्टाचार्य उपस्थित होते. बैठकीत आमदारांशी चर्चा केल्यानंतर अमित शाह यांनी सुवेंदू अधिकारी यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी बोलताना शाह म्हणाले, “निवडणुकीत पक्षाला अभूतपूर्व विजय मिळाला असून सर्व नवनिर्वाचित आमदारांनी एका सुरात सुवेंदू अधिकारी यांचेच नाव सुचवले आहे. लोकशाही प्रक्रियेनुसार दुसऱ्या नावाची संधी देण्यात आली होती, मात्र सर्वांचे एकमत असल्याने आता पश्चिम बंगालची धुरा सुवेंदू यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय झाला आहे.”

ममता बॅनर्जींचे ‘जायंट किलर’
५५ वर्षीय सुवेंदू अधिकारी यांनी भारतीय राजकारणात आपली ओळख एक ‘जायंट किलर’ म्हणून निर्माण केली आहे. २०२१ च्या निवडणुकीत त्यांनी नंदीग्राममधून ममता बॅनर्जींना पराभूत करून खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा भवानीपूर या हाय-प्रोफाइल मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा सुमारे १५ हजार मतांच्या फरकाने दणदणीत पराभव केला. विरोधी पक्षनेते म्हणून गेल्या पाच वर्षांत त्यांनी आक्रमकपणे राज्य सरकारला धारेवर धरले होते, त्याचेच फळ आज त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या रूपाने मिळाले आहे.

राजकीय प्रवासाचा चढता आलेख
सुवेंदू अधिकारी हे एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. मात्र, २०२० मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर बंगालमध्ये भाजपची ताकद झपाट्याने वाढली. २०२१ मध्ये भाजपचे ७७ आमदार निवडून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. ग्रामीण बंगालमधील त्यांची मजबूत पकड आणि कार्यकर्त्यांचे मोठे जाळे यामुळे भाजपने त्यांच्यावर हा ऐतिहासिक विश्वास टाकला आहे.

बंगालमध्ये बदलाचे वारे
सुवेंदू अधिकारी यांच्या निवडीमुळे पश्चिम बंगालमध्ये अनेक दशकांपासून असलेल्या एकाधिकारशाहीला पूर्णविराम मिळाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. लवकरच ते राज्यपाल यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करतील आणि त्यानंतर त्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या