Home / महाराष्ट्र / Mumbai Watermelon Case : पायधुनी मृत्यूकांडाचं गूढ उकललं! मुघल बिल्डिंगमधील ‘उंदरांच्या औषधा’ने घेतला चौघांचा बळी..

Mumbai Watermelon Case : पायधुनी मृत्यूकांडाचं गूढ उकललं! मुघल बिल्डिंगमधील ‘उंदरांच्या औषधा’ने घेतला चौघांचा बळी..

Mumbai Watermelon Case : मुंबईच्या पायधुनी येथील घाटी मोहल्ला परिसरातील मोगल उमरेट्टी इमारतीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण...

By: Team Navakal
Mumbai Watermelon Case
Social + WhatsApp CTA

Mumbai Watermelon Case : मुंबईच्या पायधुनी येथील घाटी मोहल्ला परिसरातील मोगल उमरेट्टी इमारतीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. सुरुवातीला हा मृत्यू कलिंगड खाल्ल्याने झालेल्या विषबाधेमुळे (Food Poisoning) झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, आता समोर आलेल्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या (FSL) अहवालाने या प्रकरणाला अनपेक्षित वळण दिले आहे. या चौघांचा मृत्यू अन्नातून होणाऱ्या सामान्य विषबाधेमुळे नव्हे, तर ‘झिंक फॉस्फाईड’ या अत्यंत जहाल विषारी पदार्थामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मृतांच्या अवयवांत आढळले घातक विष
अब्दुल्ला डोकाडिया (४०), त्यांची पत्नी नसरीन (३५) आणि आयशा (१६) व झैनब (१३) या दोन मुलींच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीरातील विविध नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. फॉरेन्सिक अहवालानुसार, मृतांच्या यकृत, मूत्रपिंड, पोटातील अन्नाचे अंश आणि पित्त यामध्ये ‘झिंक फॉस्फाईड’ आढळून आले आहे. हे घातक रसायन सामान्यतः उंदीर मारण्याच्या औषधांमध्ये वापरले जाते. धक्कादायक बाब म्हणजे, घरातील उरलेल्या कलिंगडाच्या तुकड्यांमध्येही हेच रसायन सापडले आहे, ज्यामुळे कलिंगडाला या विषाचा संसर्ग कसा झाला, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

पोलीस तपासात उंदीर मारण्याचे औषध जप्त
जे. जे. मार्ग पोलिसांनी डोकाडिया कुटुंबाच्या घरातून उंदीर मारण्याच्या दोन वड्या आणि एक स्प्रे जप्त केला आहे. उंदीर मारण्याच्या वड्यांचे पाकीट सीलबंद अवस्थेत असले, तरी ‘स्प्रे’चा वापर करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. सदर इमारतीत उंदरांचा मोठा उपद्रव असल्याने घरमालकाने फवारणी केली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, हा स्प्रे अन्नावर पडला की त्याचा अन्य काही वापर झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत.

घातपात, आत्महत्या की अपघात?
या घटनेतील मृतांपैकी अब्दुल्ला आणि आयशा यांचा मृत्यू होण्यापूर्वी रुग्णालयात जबाब नोंदवण्यात आला होता. त्यांनी कोणत्याही व्यक्तीवर संशय व्यक्त केला नव्हता किंवा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचे कोणतेही संकेत दिले नव्हते. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) घरातील बिर्याणी, चिकन, तांदूळ, खजूर आणि पाणी अशा ११ पदार्थांचे नमुने तपासले होते, परंतु त्यापैकी कोणत्याही पदार्थात विषारी द्रव्य आढळले नाही. यामुळे, उंदीर मारण्याच्या औषधाचा अंश नेमका कलिंगडात आणि पर्यायाने त्यांच्या शरीरात कसा पोहोचला, हे गुढ अद्याप कायम आहे.

पोलिसांकडून सखोल तपास सुरू
आतापर्यंतच्या तपासात पोलिसांनी कोणत्याही प्रकारच्या घातपाताची शक्यता नाकारली असली, तरी ‘झिंक फॉस्फाईड’चा शरीरातील वावर अपघाती आहे की हेतुपुरस्सर, यावर पोलीस लक्ष केंद्रित करत आहेत. घरातील कीटकनाशकाच्या चुकीच्या वापरामुळे अन्नाचे संदूषण (Contamination) झाले असावे का, या तांत्रिक बाजूचाही विचार केला जात आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या