Hardik Pandya IPL Trade: पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्स (MI) संघाचा कर्णधार आणि स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या आगामी हंगामापूर्वी संघ सोडण्याच्या तयारीत आहे. आयपीएल 2026 मधील मुंबई इंडियन्सच्या अत्यंत खराब आणि निराशाजनक कामगिरीनंतर हार्दिकने हा मोठा निर्णय घेतल्याचे समजते.
32 वर्षांच्या या मॅचविनर खेळाडूला आपल्या संघात घेण्यासाठी आयपीएलमधील फ्रँचायझींमध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, आयपीएलमधील तब्बल 7 संघांनी हार्दिकला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. या शर्यतीत केवळ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) हे दोन संघ सध्या लांब असून ते केवळ प्रेक्षकाची भूमिका घेत आहेत.
चेन्नई आणि केकेआरमध्ये तगडी फाईट; एमएस धोनीच्या जागेसाठी चर्चा?
हार्दिक पांड्याला आपल्या संघात घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सने (CSK) उशिरा का होईना, पण जोरदार एन्ट्री घेतली आहे. यामुळे कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यासमोरील आव्हान आणखी वाढले आहे:
- चेन्नई सुपर किंग्स: महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर चेन्नईला एका भक्कम भारतीय ऑलराउंडरची गरज आहे. हार्दिक त्यासाठी परफेक्ट मानला जात आहे. मात्र, चेन्नईत आल्यावर त्याला थेट कर्णधारपद मिळेलच, याची कोणतीही गॅरंटी नाही.
- कोलकाता नाईट रायडर्स: केकेआर सध्या एका चांगल्या कर्णधाराच्या शोधात आहे. ते हार्दिकला संघाचे नेतृत्व सोपवण्यास तयार आहेत.
- राजस्थान रॉयल्स: राजस्थान देखील हार्दिकला नेतृत्वासोबतच दीर्घकालीन भूमिकेची ऑफर देण्यास उत्सुक आहे.
सध्या मुंबई इंडियन्स, चेन्नई आणि केकेआर यांच्यात पडद्यामागे बातचीत सुरू आहे. हा व्यवहार केवळ रोख रकमेच्या (ऑल-कैश डील) बदल्यात होणार की खेळाडूंची अदलाबदल (ट्रेड) केली जाणार, यावर अजून अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही. गेल्या वर्षी केएल राहुलच्या बाबतीत जशा अडचणी आल्या होत्या, तशीच काहीशी परिस्थिती येथेही निर्माण होऊ शकते.
चेन्नईची योग्य वेळेची वाट; पांड्याची भूमिका ठरणार महत्त्वाची
चेन्नई सुपर किंग्स सध्या या संपूर्ण घडामोडींवर शांतपणे लक्ष ठेवून आहे. गेल्या हंगामात संजू सॅमसन, रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांच्या ऐतिहासिक ट्रेड दरम्यान चेन्नईने जशी अचूक वेळ साधली होती, तसाच काहीसा प्लॅन यंदाही दिसतो आहे. चेन्नईतील एका अत्यंत प्रभावशाली व्यक्तीच्या भूमिकेवर हा संपूर्ण व्यवहार अवलंबून असणार आहे.
या ट्रेडमधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे स्वतः हार्दिक पांड्याची संमती होय. कर्णधारपद न मिळताही हार्दिक चेन्नईसारख्या मोठ्या फ्रँचायझीमध्ये जाण्यास तयार होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. उत्तरेकडील एका मोठ्या संघाने हार्दिकला कर्णधारपदाची ऑफर दिली होती, पण सुरुवातीची चर्चा निष्फळ ठरली. मात्र, दाक्षिणात्य संघांसोबतची बोलणी फिस्कटल्यास पुन्हा नवीन चर्चा सुरू होऊ शकते.
मुंबई इंडियन्सचा आणखी एक बडा खेळाडू रांगेत?
या हंगामात केवळ हार्दिक पांड्याच नाही, तर मुंबई इंडियन्सचा आणखी एक हाय-प्रोफाईल भारतीय खेळाडू देखील ट्रेड विंडोचा भाग असू शकतो. मुंबई इंडियन्सला हार्दिकच्या भविष्याचा निर्णय घेतल्यानंतरच या दुसऱ्या खेळाडूबाबत अंतिम निर्णय घ्यावा लागेल.
जर मुंबईने हार्दिकसाठी ऑल-कॅश डील मान्य केली, तर ते या दुसऱ्या भारतीय स्टार खेळाडूसाठीही तोच मार्ग अवलंबणार का? या प्रश्नांची उत्तरे अजून स्पष्ट झालेली नाहीत. मात्र, सध्या आयपीएल जगतात ‘एक वेळ एकच ट्रेड’ या धोरणाने वाटाघाटी सुरू असून लवकरच चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.
हे देखील वाचा – Maharashtra Politics: ‘ऑफर आली तर नक्कीच…’; अमोल कोल्हेंच्या विधानाने ऑपरेशन तुतारीची चर्चा










