Rahul Dravid in ETPL: भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक आणि दिग्गज फलंदाज राहुल द्रविड आता एका नव्या भूमिकेत क्रिकेट चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. आगामी ‘युरोपियन टी20 प्रीमियर लीग’ (ETPL) मध्ये राहुल द्रविडने ‘डब्लिन गार्डियन्स’ या फ्रँचायझीची मालकी विकत घेतली आहे. युरोपमधील क्रिकेटचा प्रसार आणि ग्रासरूट लेव्हलवरील खेळाडूंना संधी देणे, या उद्देशाने द्रविडने हा मोठा निर्णय घेतला आहे.
आर अश्विनकडे कर्णधारपद
डब्लिन गार्डियन्स संघासाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे, भारताचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू आर अश्विन या संघाचे नेतृत्व करणार आहे. युरोपमधील स्थानिक टॅलेंट आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्गज खेळाडू यांचा मेळ या संघात पाहायला मिळेल. डब्लिनसोबतच बेलफास्ट, एडिनबर्ग, ग्लासगो, रॉटरडॅम आणि अॅमस्टरडॅम अशा एकूण 6 शहरांचे संघ या लीगमध्ये आमनेसामने असतील.
आंतरराष्ट्रीय ताऱ्यांची मांदियाळी
ETPL च्या पहिल्याच हंगामात जगातील अनेक मोठे क्रिकेटपटू मैदानात उतरणार आहेत. यामध्ये मिचेल मार्श, टिम डेव्हिड, मिचेल सँटनर, लियाम लिव्हिंगस्टोन, ग्लेन मॅक्सवेल, फाफ डू प्लेसिस आणि हेनरिक क्लासेन यांसारख्या स्फोटक खेळाडूंचा समावेश असेल. ही लीग आयर्लंड, स्कॉटलंड आणि नेदरलँड्स क्रिकेट बोर्डाच्या सहकार्याने आयोजित केली जात आहे.
लीगचे वेळापत्रक आणि दिग्गज मालक
या स्पर्धेचा पहिला हंगाम 26 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर या कालावधीत खेळवला जाईल. या लीगमध्ये केवळ राहुल द्रविडच नाही, तर इतरही अनेक मोठे चेहरे मालक म्हणून जोडले गेले आहेत:
- डब्लिन: राहुल द्रविड
- ग्लासगो: ख्रिस गेल आणि विपुल अग्रवाल
- रॉटरडॅम: जॉन्टी रोड्स आणि फाफ डू प्लेसिस
- अॅमस्टरडॅम: स्टीव्ह वॉ
या लीगचे सह-संस्थापक बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन असून, युरोपमधील क्रिकेटला एका नव्या उंचीवर नेण्याचा या लीगचा प्रयत्न आहे. राहुल द्रविडच्या मते, डब्लिनमध्ये क्रिकेटबद्दल मोठी ओढ असून आगामी काळात तिथून अनेक दर्जेदार खेळाडू समोर येतील.
हे देखील वाचा – PM Modi’s Appeal: “विदेशी चलन वाचवा!”; पंतप्रधान मोदींचे इंधन बचत आणि सोनं खरेदी टाळण्याचे देशवासीयांना पुन्हा एकदा आवाहन










