दिनविशेष! नेमबाज स्पर्धेत भारताचं उंचावणारी राही सरनोबत

आज ३० ऑक्टोबर. नेमबाज राही सरनोबतचा वाढदिवस.
जन्म 3० ऑक्टोबर १९९० कोल्हापूर येथे झाला.

राही कोल्हापूरमध्ये शाळेत NCC कॅडेट होती. तिथेच तिची बंदुकीशी ओळख झाली. तेजस्विनी सावंत राहीच्याच शाळेत होती. 2006 साली ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये तेजस्विनीने सुवर्णपदक पटकावलं होतं. सावंतने सुवर्ण पदक पटकावल्याने राहीला या खेळाविषयी अधिक जाणून घेण्याची प्रेरणा मिळाली. तिने ताबडतोब तिच्या शहरात नेमबाजीच्या प्रशिक्षणासाठीची चौकशी सुरू केली. २००८ मध्ये राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत राहीने पहिले सुवर्ण पदक मिळविले. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे. तिने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल नेमबाजीसाठी २०१८ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत जकार्ता पालेबांग येथे सुवर्णपदक जिंकले. तसेच तिने २०१० च्या नवी दिल्लीमध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावली होती.

विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली पिस्तुल नेमबाज ठरली. चॅंगवॉन येथे झालेल्या आयएसएसएफ वर्ल्ड कपमध्ये तिने २५ मीटर पिस्तूल स्पर्धा जिंकली. ग्लासगो येथे २०१४ च्या राष्ट्रकुल खेळात,तिने महिलांच्या २५ मीटर पिस्तूलमध्ये सुवर्ण जिंकले. त्याच वर्षी तिने इंचीऑन येथे २०१४ मध्ये आशियाई स्पर्धेत २५ मीटर पिस्तूल प्रकारात कांस्य पदक जिंकले. जिथे ती,अनीसा सय्यद आणि हीना सिध्दू या तिघी विजेत्या ठरल्या. राहीने विश्वचषक २०११ मध्ये कांस्यपदक जिंकले आणि २०१२ मध्ये लंडन ऑलिंपिकसाठी तिची निवड झाली. २२ ऑगस्ट २०१८ रोजी, २५ मीटर पिस्तूल प्रकारात ३४ गुण मिळवून आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली. तिने थायलंडच्या प्रतिस्पर्ध्याला सुवर्ण पदकाच्या शर्यतीत मागे टाकून हा विजय मिळविला.

२०१५ मध्ये झालेल्या एका दुखापतीने तिच्या खेळावर मोठा परिणम झाला. खेळातून निवृत्ती घ्यायच्या निर्णयापर्यंत ती येऊन ठेपली. मात्र, आपल्या मनोनिग्रहाने तिने त्याही परिस्थितीवर मात केली आणि २०१८ साली जकार्तामध्ये झालेल्या एशियन गेम्समध्ये पुन्हा एकदा सुवर्ण पदकावर नाव कोरलं. एशियन गेम्समध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक पटकवणारी ती भारताची पहिला महिला नेमबाज ठरली. पुढच्या वर्षी तिने ISSF वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक पटकावून २०२१ साली होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक्समध्ये जागा निश्चित केली. पण टोकियो ऑलिम्पिक्स मध्ये ती पदक मिळवू शकली नाही. २०१८ साली राहीला भारत सरकारचा अर्जुन पुरस्कार देण्यात आला.
संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३

Scroll to Top