दिनविशेष : प्रख्यात सारंगी वादक पंडित ध्रुव घोष

आज प्रख्यात सारंगी वादक पंडित ध्रुव घोष यांचा जन्मदिन. त्यांचा जन्म २५ ऑक्टोबर १९५७ रोजीचा. ध्रुव घोष यांचे कुटुंब संगीताशी निगडित होते. भारतीय वाद्यांच्या दुनियेत बासरी या वाद्याला अग्रस्थान मिळवून देणारे पन्नालाल घोष हे त्यांचे काका. ज्येष्ठ तबलावादक निखिल घोष हे वडील, तर पंडित नयन घोष यांचे धाकटे बंधू. अशा तालेवार कुटुंबात राहून ध्रुव यांनी सारंगी हे वाद्य हाती घेतले. घोष यांनी देशभरात एकल सारंगीवादक म्हणून स्थान मिळवले. त्यांचे सारंगी वादन भारताबाहेरही आवडीने ऐकले जात. आजमितीस उत्कृष्ट सारंगी वाजवणाऱ्या कलावंतांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याएवढीच आहे. यामुळेच ध्रुव घोष यांचे महत्त्व अधोरेखित होते. भारतीय संगीत परंपरेतील या एका अत्यंत महत्त्वाच्या वाद्याकडे त्यांचे लक्ष गेले आणि त्यांनी त्यावर प्रचंड कष्ट घेऊन आपली सारी प्रतिभा पणाला लावून हे वाद्य आपलेसे केले.

ध्रुव घोष यांनी या वाद्यावर स्वत:चे तंत्र विकसित केले. तंतुवाद्य वादनात तारेची सुरेलता सर्वात महत्त्वाची असते. ध्रुव यांनी या वाद्यात काळानुरूप तांत्रिक बदल केले. त्याच्या वादनतंत्रातही वेगळा विचार केला. त्यामुळेच सारंगी वादनातील प्रसिद्ध अशा बुंदू खान यांच्या घराण्यातील ज्येष्ठ वादक सगीरुद्दीन खाँ यांची शिस्तबद्ध तालीम मिळूनही घोष यांच्या वादनात राम नारायण यांच्या वादनशैलीची छाप दिसत असे. पाश्चात्त्य संगीतातील वादकांबरोबर सारंगीची नाळ जोडणाऱ्या फ्यूजनलाही ध्रुव यांनी आनंदाने होकार दिला. जागतिक संगीतात सारंगीने केलेला हा प्रवेश लोकप्रिय ठरला, याचे कारण ध्रुव यांची या संगीताकडे बघण्याची स्वागतशील दृष्टी. भारतीय विद्या भवनाच्या संगीत नर्तन विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. मध्य प्रदेश सरकारतर्फे त्यांना सारंगीवादक उस्ताद अब्दुल लतीफ खान यांच्या नावाचा पुरस्कारही मिळाला होता. पं. ध्रुव घोष यांचे १० जुलै २०१७ रोजी निधन झाले.

  • – संजीव वेलणकर
    ९४२२३०१७३३

Scroll to Top