Home / लेख / Commercial LPG Gas Rules: व्यावसायिक गॅस सिलिंडरबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! हॉटेल आणि उद्योगांना मोठा दिलासा

Commercial LPG Gas Rules: व्यावसायिक गॅस सिलिंडरबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! हॉटेल आणि उद्योगांना मोठा दिलासा

Commercial LPG Gas Rules: देशातील हॉटेल व्यावसायिक, रेस्टॉरंट्स आणि विविध उद्योगांसाठी केंद्र सरकारकडून एक अत्यंत दिलासादायक बातमी आली आहे. केंद्र...

By: Team Navakal
Commercial LPG Gas Rules: व्यावसायिक गॅस सिलिंडरबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! हॉटेल आणि उद्योगांना मोठा दिलासा
Social + WhatsApp CTA

Commercial LPG Gas Rules: देशातील हॉटेल व्यावसायिक, रेस्टॉरंट्स आणि विविध उद्योगांसाठी केंद्र सरकारकडून एक अत्यंत दिलासादायक बातमी आली आहे. केंद्र सरकारने व्यावसायिक वापराच्या पॅकबंद एलपीजी गॅस पुरवठ्यावरील सर्व क्षेत्रनिहाय निर्बंध पूर्णपणे उठवले असून पुरवठा संकटपूर्व पातळीवर आणला आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने गुरुवारी अधिकृत पत्रक जारी करून या निर्णयाची घोषणा केली.

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे उद्भवलेल्या जागतिक संकटानंतर एलपीजी पुरवठ्यात मोठे अडथळे निर्माण झाले होते. मात्र, आता सामंजस्य करारानुसार हे युद्ध थांबले असून पुरवठा साखळीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. त्यामुळे ऑईल मार्केटिंग कंपन्या आता युद्धपूर्व काळाप्रमाणेच व्यावसायिक गॅस सिलिंडरचा नेहमीसारखा पुरवठा करणार आहेत.

बल्क एलपीजी पुरवठ्यात ५0 टक्के शिथिलता; नवीन नियम खालीलप्रमाणे:

औद्योगिक क्षेत्राला गती देण्यासाठी सरकारने खालीलप्रमाणे नवीन नियमावली जाहीर केली आहे:

  • मोठ्या ग्राहकांना दिलासा: सरकारने केवळ सिलिंडरच नाही, तर ‘बल्क एलपीजी’ (मोठ्या प्रमाणावरील गॅस) पुरवठ्यावरील निर्बंधही शिथिल केले आहेत. व्यावसायिक आणि औद्योगिक वापरकर्त्यांना आता त्यांच्या संकटपूर्व काळातील एकूण वापराच्या 50 टक्क्यांपर्यंत पुरवठा मिळवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
  • इतर उद्योगांना कच्चा माल उपलब्ध: गॅस टंचाईच्या काळात सरकारने जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत हायड्रोकार्बनचे विशिष्ट प्रवाह (C3 आणि C4 वायू) केवळ घरगुती एलपीजी उत्पादनासाठी राखीव ठेवले होते. आता पुरवठा सुधारल्याने हे वायू इतर उद्योगांनाही वापरता येणार आहेत. मात्र, घरगुती गॅस उत्पादनात कोणतीही कपात केली जाणार नाही.
  • ग्राहकांचा डेटाबेस तयार होणार: पुरवठ्याचे उत्तम नियोजन करण्यासाठी केंद्र सरकार देशातील सर्व औद्योगिक आणि व्यावसायिक एलपीजी वापरकर्त्यांचा एकच मध्यवर्ती डेटाबेस तयार करणार आहे.

पाईप गॅस (PNG) वापरण्यावर सरकारचा भर

केंद्र सरकारकडून व्यावसायिक क्षेत्राला एलपीजीऐवजी पाईप नॅशनल गॅस म्हणजेच पीएनजी वापरण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. ज्या उद्योगांनी आधीच पीएनजीचा पर्याय निवडला आहे, ते तोच वापरत राहतील. तर इतर ग्राहकांना गॅस वितरण कंपन्यांच्या मदतीने हळूहळू पीएनजी नेटवर्कशी जोडले जाईल. ऊर्जा सुरक्षा वाढवणे आणि स्वच्छ इंधनाचा वापर वाढवणे हा यामागील मुख्य हेतू आहे.

इराण युद्ध आणि गॅस टंचाईची पार्श्वभूमी; देशात वाढले होते दर

इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील संघर्षानंतर इराणने जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ हा सागरी मार्ग तात्पुरता बंद केला होता. जगातील बहुतांश कच्चे तेल आणि एलपीजी याच मार्गावरून वाहून नेले जाते. हा मार्ग बंद झाल्यामुळे भारताच्या गॅस आयातीवर परिणाम झाला होता. परिणामी, सरकारने हॉटेल आणि कारखान्यांचा गॅस पुरवठा मर्यादित करून सर्व साठा घरगुती गॅससाठी वळवला होता.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या