IRCTC New Website: आयआरसीटीसी (IRCTC) वेबसाईटवरून रेल्वेचे कन्फर्म तिकीट बुक करताना येणाऱ्या अडचणी आता कायमच्या इतिहास जमा होणार आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रवाशांना मोठा दिलासा देणारी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. रेल्वे मंत्रालय पुढील महिन्यात म्हणजेच 15 जुलैपर्यंत आयआरसीटीसीची एक पूर्णपणे नवीन आणि हाय-स्पीड वेबसाईट लाँच करणार आहे.
जयपूर येथील ‘मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन वेबसाईटमध्ये अत्यंत प्रगत, वेगवान आणि आधुनिक फीचर्स असतील, ज्यामुळे ग्राहकांना तिकीट बुक करण्याचा एक वेगळा आणि सुटसुटीत अनुभव मिळेल.
४० वर्षे जुनी आरक्षण प्रणाली बदलणार; ५ पटीने क्षमता वाढणार
भारतीय रेल्वेने आपली इंटरनेट तिकीट बुकिंग सेवा 2002 मध्ये सुरू केली होती. सध्या देशातील एकूण रेल्वे तिकिटांच्या मागणीपैकी तब्बल 88 टक्के तिकिटे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून बुक केली जातात. वाढती गर्दी पाहता, रेल्वे मंत्रालय आपली जवळपास 40 वर्षे जुनी ‘पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीम’ (PRS) ऑगस्ट महिन्यापासून पूर्णपणे अपग्रेड करणार आहे:
- तिकीट बुकिंगची क्षमता: सध्याच्या जुन्या प्रणालीमध्ये एका मिनिटाला केवळ 32,000 तिकिटे बुक होतात. मात्र, नवीन प्रगत प्रणाली लागू झाल्यानंतर ही क्षमता थेट 5 पटीने वाढून प्रति मिनिट 1.5 लाख तिकिटांपेक्षा जास्त होणार आहे.
- चौकशीची क्षमता: तिकीट किंवा ट्रेनची चौकशी करण्याची क्षमता थेट 10 पटीने वाढणार आहे. आता एका मिनिटाला 4 लाख ऐवजी तब्बल 40 लाख चौकशी एकाच वेळी हाताळणे शक्य होईल.
नवीन वेबसाईटमध्ये काय असणार खास?
नवीन आयआरसीटीसी वेबसाईट आणि आरक्षण प्रणालीमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक विशेष बदल करण्यात आले आहेत:
- बहुभाषिक इंटरफेस: युजर्सना त्यांच्या आवडीच्या भाषेत तिकीट बुक करणे आणि चौकशी करणे सोपे होईल.
- भाड्याचे कॅलेंडर: प्रवाशांना संपूर्ण महिन्याचे भाडे एकाच ठिकाणी ‘फेअर कॅलेंडर’द्वारे पाहता येईल, ज्यामुळे स्वस्त तिकीट निवडणे सोपे होईल.
- सीट निवडण्याची सोय: ग्राहक बुकिंग करतानाच त्यांच्या आवडीच्या सीटची पसंती नोंदवू शकतील.
- विशेष सवलती: दिव्यांग व्यक्ती, विद्यार्थी आणि रुग्णांसाठी असलेल्या सवलतींची प्रक्रिया यामध्ये थेट जोडली गेली आहे.
‘रेलवन’ अॅप देणार वेटिंग तिकीट कन्फर्म होण्याची माहिती
रेल्वेने गेल्या वर्षी ‘रेलवन’ (RailOne) नावाचे एक मोबाईल अॅप लाँच केले होते, ज्याला रेल्वेचे ‘सुपर अॅप’ देखील म्हटले जाते. हे अॅप कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर काम करते. जेव्हा एखादा प्रवासी या अॅपवरून वेटिंग लिस्ट असलेले तिकीट बुक करतो, तेव्हा ते तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता किती टक्के आहे, याचा अचूक अंदाज हे अॅप आधीच वर्तवते. या नवीन डिजिटल बदलांमुळे भारतीय रेल्वेचा प्रवास आता अधिक स्मार्ट आणि वेगवान होणार आहे.










