G7 Summit: फ्रान्समध्ये आयोजित G7 परिषदेच्या दरम्यान एक मोठी राजकीय घडामोड घडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात 17 जून रोजी एक अत्यंत महत्त्वाची द्विपक्षीय बैठक होणार असल्याचे व्हाईट हाऊसने जाहीर केले आहे. नोव्हेंबर 2024 मधील अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये मोदींनी ट्रम्प यांची भेट घेतली होती, त्यानंतर या दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच समोरासमोर होणारी भेट असेल.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विशेष निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी 16 आणि 17 जून रोजी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांत भारत आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये अनेक मुद्द्यांवरून मोठी कटुता आली आहे. यामध्ये अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लावलेले कडक आयात शुल्क, मे 2025 मधील भारत-पाकिस्तान वादावर ट्रम्प यांनी केलेला वादग्रस्त दावा आणि भारताचा रशियासोबत सुरू असलेला तेल व्यापार यांमुळे दोन्ही देशांत अंतर्गत तणाव आहे.
व्यापार करारावर होणार चर्चा; पण ट्रम्प अडून बसणार?
गेल्या अनेक महिन्यांपासून भारत आणि अमेरिकेत एक मोठा व्यापारी करार करण्यासाठी पडद्यामागे चर्चा सुरू आहे. या बैठकीत त्या कराराचा आढावा घेतला जाईल:
- व्हाईट हाऊसचे म्हणणे: दोन्ही देश नैसर्गिक आर्थिक भागीदार आहेत. ऊर्जा, औद्योगिक वस्तू आणि शेती उत्पादनांच्या क्षेत्रात अमेरिकेतून भारतात होणारी निर्यात वाढवण्याची मोठी संधी आहे.
- ट्रम्प यांचा कडक पवित्रा: अमेरिकन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत अमेरिकेच्या फायद्याचा ‘अतिशय चांगला करार’ होत नाही, तोपर्यंत ट्रम्प त्याला मंजुरी देणार नाहीत. त्यामुळे या बैठकीत केवळ सद्यस्थितीचा आढावा घेतला जाईल, अंतिम करार होणार नाही.
भारतीय खलाशांच्या मृत्यूमुळे दिल्ली प्रचंड संतप्त!
या दोन्ही नेत्यांची भेट अशा वेळी होत आहे, जेव्हा इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर ओमानच्या समुद्रात अमेरिकन सैन्याने केलेल्या हल्ल्यात भारतीय खलाशांचा मृत्यू झाला आहे. या वादामुळे दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत:
- ८ जूनची घटना: ‘मॅरीव्हेक्स’ या जहाजावर अमेरिकन सैन्याने हल्ला केला, सुदैवाने यातील 24 भारतीय खलाशांना सुखरूप वाचवण्यात आले.
- १० जूनचा भीषण हल्ला: ‘एमटी सेटबेलो’ या जहाजावर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात डेक कॅडेट आदित्य शर्मा, इंजिन फिटर शिवानंद चौरसिया आणि चीफ इंजिनिअर पटनला सुरेश या ३ भारतीय खलाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
- ११ जूनची घटना: ‘जलवीर’ या २० भारतीय खलाशी असलेल्या तिसऱ्या जहाजावरही हल्ला करण्यात आला.
या घटनेनंतर भारताने अमेरिकेच्या राजदूतांना तातडीने समन्स बजावून कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे. नागरी जहाजांवर अशा प्रकारे प्राणघातक हल्ला करणे आंतरराष्ट्रीय व्यापार सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन असल्याचे भारताने म्हटले आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी या हल्ल्याचे समर्थन केले असून हॉरमुझच्या समुद्रधुनीतील नाकेबंदी कोणीही तोडल्यास अमेरिका गप्प बसणार नाही, असा इशारा भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना दिला आहे.
पंतप्रधान मोदींचा फ्रान्स आणि स्लोव्हाकियाचा ऐतिहासिक दौरा
पंतप्रधानांचा हा दौरा केवळ G7 पुरता मर्यादित नसून ते दोन देशांच्या अधिकृत दौऱ्यावर जात आहेत:
- फ्रान्स भेट (१४ जून): येथे मोदी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्याशी धोरणात्मक भागीदारीवर चर्चा करतील. तसेच दोन्ही नेते ‘भारत इनोव्ह्हेट्स’ या स्टार्टअप कार्यक्रमाचे उद्घाटन करतील.
- स्लोव्हाकिया भेट: 1993 मध्ये स्लोव्हाकिया स्वतंत्र झाल्यानंतर तिथे भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान ठरणार आहेत. तिथे व्यापार आणि उत्पादनावर चर्चा होईल.
- टेक्नॉलॉजी समिट (१८ जून): G7 संपल्यानंतर मोदी पुन्हा पॅरिसला येऊन युरोपमधील सर्वात मोठ्या ‘विवाटेक’ या तंत्रज्ञान परिषदेला संबोधित करतील आणि भारतीय समुदायाशी संवाद साधतील.










