UPSC Recruitment 2026: केंद्र सरकारमध्ये मानाची आणि कायमस्वरूपी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. आयोगाने जाहिरात क्रमांक 08/2026 अंतर्गत देशातील विविध प्रमुख मंत्रालयांमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती मोहिमेद्वारे वैद्यकीय प्राध्यापक, कायदेतज्ज्ञ, कृषी शास्त्रज्ञ आणि विषशास्त्रज्ञ अशा एकूण 47 महत्त्वाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना 31 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे.
वैद्यकीय क्षेत्रासह प्रशासकीय आणि वैज्ञानिक पदांचा समावेश
या भरती प्रक्रियेत आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत सर्वाधिक जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. दिल्लीतील मोठ्या वैद्यकीय संस्थांमध्ये स्पेशालिस्ट ग्रेड ३ असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी एकूण 37 जागा भरल्या जातील.
या भरतीमधील विविध विभागांनुसार रिक्त जागांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे:
- वैद्यकीय क्षेत्र: निओनॅटोलॉजी (13 जागा), एंडोक्रिनोलॉजी (10 जागा), क्लिनिकल हेमॅटोलॉजी (9 जागा), न्यूक्लियर मेडिसिन (3 जागा), पल्मोनरी मेडिसिन (3 जागा), पेडियाट्रिक कार्डिओलॉजी (1 जागा) आणि सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजी स्पेशालिस्ट (1 जागा).
- कायदा आणि गुन्हे अन्वेषण विभाग: कायदा आणि न्याय मंत्रालयांतर्गत वैधानिक नियम आणि कायदे मसुदा तयार करण्यासाठी सुपरिंटेंडंट (लीगल) ची गरज आहे. याशिवाय, कॉर्पोरेट फसवणुकीच्या प्रकरणांचा तपास करणाऱ्या गंभीर फसवणूक अन्वेषण कार्यालयात (SFIO) प्रॉसिक्युटर आणि सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये टॉक्सिकॉलॉजी विभागासाठी ज्युनिअर सायंटिफिक ऑफिसरची जागा भरली जाणार आहे.
- कृषी आणि इतर विभाग: कृषी मंत्रालयांतर्गत असिस्टंट सॉईल केमिस्ट आणि राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण केंद्रासाठी कीटकशास्त्र तज्ज्ञांची नियुक्ती केली जाईल.
७ व्या वेतन आयोगानुसार आकर्षक पगार आणि वयोमर्यादा
या सर्व जागा केंद्र सरकारच्या अत्यंत प्रतिष्ठित वर्ग ‘अ’ (Group A) आणि वर्ग ‘ब’ (Group B) राजपत्रित (गॅझेटेड) श्रेणीतील आहेत.
निवड झालेल्या उमेदवारांना ७ व्या केंद्रीय वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) अतिशय उत्कृष्ट वेतनश्रेणी दिली जाणार आहे. असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी पे मॅट्रीक्स लेव्हल 11 नुसार पगार मिळेल. या पदावरील डॉक्टरांना खाजगी प्रॅक्टिस करण्यास सक्त मनाई असून त्यांना स्वतंत्र नॉन-प्रॅक्टिसिंग अलाउन्स दिला जाईल. सायंटिफिक रोलसाठी लेव्हल 10 आणि कायदेशीर पदांसाठी लेव्हल 8 आणि लेव्हल 7 नुसार वेतन मिळेल.
विविध पदांनुसार कमाल वयोमर्यादा 30, 35 आणि 40 वर्षे ठेवण्यात आली आहे. नियमांनुसार एससी, एसटी आणि ओबीसी उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत मिळेल, तर दिव्यांग उमेदवारांना वयात 10 वर्षांची मोठी सूट देण्यात आली आहे.
थेट वेबकॅमद्वारे फोटो आणि कागदपत्रांची पडताळणी; अशी आहे अर्ज प्रक्रिया
युपीएससीने संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाईन डिजिटल माध्यमाद्वारे सुलभ केली असून कोणत्याही कागदपत्रांची प्रत्यक्ष प्रत पाठवण्याची गरज नाही.
उमेदवारांना सर्वप्रथम ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करून युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन नंबर मिळवावा लागेल. सुरक्षिततेचा भाग म्हणून अर्ज भरताना वेबकॅमद्वारे उमेदवाराचा लाईव्ह फोटो कॅप्चर करणे बंधनकारक आहे. यासोबतच उमेदवारांना कोऱ्या पांढऱ्या कागदावर उभ्या रेषेत ३ वेळा केलेली स्वाक्षरी, वयाचा पुरावा म्हणून दहावीचे प्रमाणपत्र, पदवी आणि अनुभवाचे प्रमाणपत्र पीडीएफ स्वरूपात अपलोड करावे लागेल.
सर्वसाधारण, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील पुरुष उमेदवारांसाठी केवळ 25 रुपये इतके नाममात्र अर्ज शुल्क ठेवण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या सर्वसमावेशक धोरणानुसार सर्व महिला उमेदवार, एससी, एसटी आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्कातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. ३१ जुलै २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजल्यानंतर पोर्टलवर कोणताही बदल किंवा अर्ज मागे घेता येणार नाही, त्यामुळे माहिती अचूक भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











