INS Mahendragiri Inducted: भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात भर घालणारी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घडामोडी घडली आहे. प्रकल्प 17A अंतर्गत तयार करण्यात आलेली सहावी अत्याधुनिक युद्धनौका ‘आयएनएस महेंद्रगिरी’ (INS Mahendragiri) शनिवारी अधिकृतपणे नौदलाच्या पूर्व ताफ्यात (इस्टर्न फ्लीट) सामील करण्यात आली.
विशाखापट्टणम येथील नेव्हल डॉकयार्डमध्ये पार पडलेल्या एका भव्य आणि दिमाखदार सोहळ्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या युद्धनौकेचे जलोत्सारण आणि कमिशनिंग करण्यात आले.
या शक्तिशाली युद्धनौकेच्या समावेशामुळे हिंद महासागर क्षेत्रात भारताची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होणार आहे. ही संपूर्ण युद्धनौका भारतातच डिझाईन आणि विकसित करण्यात आली असून, संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या (आत्मनिर्भर भारत) दिशेने हे एक ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे.
इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार ही युद्धनौका
सध्याच्या बदलत्या जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या युद्धनौकेचे महत्त्व अधिक वाढले आहे. समुद्रावर नियंत्रण ठेवण्यासोबतच, हवेतील आणि पाण्याखालील शत्रूच्या हल्ल्यांचा अचूक वेध घेण्याची क्षमता या नौकेमध्ये आहे. एडनच्या आखातातील समुद्री चाच्यांचा बंदोबस्त असो किंवा दक्षिण चीन समुद्रातील गस्त, प्रत्येक मोहिमेत ही युद्धनौका बहुआयामी कामगिरी बजावू शकते.
या सोहळ्यादरम्यान बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, भारत हा या क्षेत्रातील एक विश्वासू भागीदार आणि सुरक्षा रक्षक आहे. मानवतावादी मदत कार्य, चाच्यांविरोधातील मोहिमा आणि संकटग्रस्त भागातून भारतीय व परदेशी नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात नौदलाने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
मुंबईत झाली निर्मिती; ६,६७० टन वजनाची अवाढव्य युद्धनौका
आयएनएस महेंद्रगिरी ही निलगिरी क्लासची शेवटची युद्धनौका आहे. नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोने याचे डिझाईन केले असून, मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने (MDL) याचे बांधकाम केले आहे. ही युद्धनौका तयार करताना प्रगत मॉड्युलर पद्धतीचा वापर करण्यात आला, ज्यामुळे जहाज बांधणीचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाचला आहे.
या युद्धनौकेची तांत्रिक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
- लांबी आणि वजन: या युद्धनौकेची लांबी 149 मीटर आणि रुंदी 17.8 मीटर असून, तिचे एकूण वजन सुमारे 6,670 टन आहे.
- वेग आणि इंजिन: यामध्ये डिझेल आणि गॅस टर्बाइनचे हायब्रीड (CODOG) इंजिन वापरण्यात आले आहे. ही नौका समुद्रात 28 ते 32 नॉट्सच्या वेगाने धावू शकते.
- कर्मचारी क्षमता: या युद्धनौकेवर 35 अधिकारी आणि 191 नौसैनिकांसह एकूण 226 जणांचा चमू तैनात असेल.
- भारतीय बनावट: या युद्धनौकेमध्ये 75 टक्क्यांपेक्षा जास्त साहित्य पूर्णपणे भारतीय बनावटीचे वापरण्यात आले आहे.
ब्राह्मोस आणि बराक-८ सारख्या घातक क्षेपणास्त्रांनी सज्ज
आयएनएस महेंद्रगिरीला नौदलाचा डिजिटल मानबिंदू मानले जात आहे, कारण यामध्ये अत्याधुनिक कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टीम (CMS-17A) बसवण्यात आली आहे. शत्रूचा माग काढण्यासाठी यात प्रगत रडार आणि सोनार यंत्रणा आहे.
हवाई सुरक्षेसाठी या नौकेवर 32 बराक-8 लांब पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे तैनात आहेत, जी 100 किमीच्या परिघात शत्रूची विमाने आणि ड्रोन नष्ट करू शकतात. समुद्रातील युद्धासाठी यामध्ये 8 ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे लावण्यात आली आहेत, जी जगातील सर्वात वेगवान क्षेपणास्त्रांपैकी एक आहेत. याशिवाय, शत्रूच्या रडारवर सहजासहजी न दिसण्यासाठी यात विशेष ‘स्टेल्थ’ डिझाईन आणि रडार शोषून घेणाऱ्या साहित्याचा वापर करण्यात आला आहे.
माझगाव डॉक शिपबिल्डर्स आणि एमएसएमईचा मोठा विजय
या युद्धनौकेच्या निर्मितीमध्ये देशातील 200 पेक्षा जास्त सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा (MSMEs) वाटा आहे. या जहाजासाठी लागणारे विशेष स्टील स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (SAIL) पुरवले आहे, तर सॉफ्टवेअर डीआरडीओने विकसित केले आहे.
नौदल प्रमुख ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी सांगितले की, माझगाव डॉकने या प्रकल्पात अनेक नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. जहाज लाँच केल्यापासून ते नौदलाच्या सेवेत दाखल होण्यापर्यंतचा कालावधी 63 महिन्यांवरून थेट 31 महिन्यांवर आणण्यात आला आहे. तसेच नेहमी लागणाऱ्या 5 ते 7 सी-ट्रायल्स ऐवजी अवघ्या एकाच समुद्री चाचणीमध्ये सर्व तांत्रिक निकष पूर्ण करण्यात आले आहेत. नौदलाची पुढील दिशा आता प्रोजेक्ट 17B कडे असेल, ज्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि लेझर वेपन्सचा वापर केला जाईल.











