Akanksha chamola And Gaurav Khanna : ‘बिग बॉस १९’मधून चर्चेत आलेला अभिनेता गौरव खन्ना आणि त्याची पत्नी आकांक्षा चमोला यांच्या वैवाहिक आयुष्यातील दुराव्याची चर्चा सध्या मनोरंजन विश्वात रंगली आहे. लग्नाला जवळपास दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर हे दोघे परस्पर संमतीने वेगळे होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती समोर आली आहे. आकांक्षा चमोला हिने एका रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होताना आपल्या वैवाहिक नात्याविषयी आणि घटस्फोटाच्या निर्णयामागील कारणांविषयी प्रथमच सविस्तर भाष्य केले. तिने गेल्या एका वर्षापासून आपण गौरव खन्नापासून वेगळी राहत असल्याचेही स्पष्ट केले.
रिअॅलिटी शोमधील संवादादरम्यान आकांक्षाने सांगितले की, लग्नानंतर मातृत्वाविषयीच्या स्वतःच्या भावना समजून घेण्यासाठी तिने अनेकदा आत्मपरीक्षण केले. सुरुवातीला मातृत्वाची भावना अनुभवण्याची इच्छा तिच्या मनात होती आणि त्यासाठी तिने प्रयत्नही केले. मात्र, कालांतराने तिला जाणवले की आई होण्याची मानसिक तयारी किंवा नैसर्गिक ओढ तिच्यात निर्माण होत नाही. हा निर्णय तिने कोणत्याही क्षणिक भावनेतून घेतलेला नसून, स्वतःला समजून घेतल्यानंतरच तो स्वीकारल्याचे तिने सांगितले.
आकांक्षा म्हणाली, “लग्नानंतर मला वाटत होते की कधीतरी माझ्यात मातृत्वाची भावना निर्माण होईल. मी ती भावना अनुभवण्याचाही प्रयत्न केला. पण कालांतराने मला समजले की मी त्यासाठी तयार नाही. माझ्यात आई होण्याची इच्छा निर्माण झाली नाही. सुरुवातीला गौरवलाही याबाबत कोणतीही अडचण नव्हती. मात्र वेळेनुसार माणसांच्या अपेक्षा आणि प्राधान्यक्रम बदलतात. आता त्याला मूल हवे आहे, पण मी त्याची ही अपेक्षा पूर्ण करू शकत नाही.”
तिने पुढे सांगितले की, या विषयावर दोघांमध्ये अनेकदा सविस्तर चर्चा झाली होती आणि आपण आपल्या भावना गौरवपासून कधीही लपवल्या नव्हत्या. “मी त्याला सुरुवातीपासूनच स्पष्ट सांगितले होते की माझ्यात मातृत्वाची भावना नाही. त्यानंतरही आम्ही या विषयावर अनेक वेळा बोललो. मी त्याला स्पष्टपणे सांगितले की, जर तुला वाटत असेल की तुला वेगळा निर्णय घ्यायचा आहे, तर तू तो घेऊ शकतोस. बहुतांश लोक लग्न करतात ते कुटुंब उभारण्यासाठी, मुलांना जन्म देण्यासाठी आणि पुढची पिढी घडवण्यासाठी. त्यामुळे जर त्या अपेक्षा पूर्ण होत नसतील, तर नात्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो,” असेही तिने सांगितले.
आकांक्षाने यावेळी आणखी एक महत्त्वाचा खुलासा केला. तिने स्पष्ट शब्दांत सांगितले की तिला जैविक मूल नको आहेच, पण भविष्यात मूल दत्तक घेण्याचाही तिचा कोणताही विचार नाही. “मला माझ्या आयुष्यात मूल नको आहे. त्यामुळे मूल दत्तक घेण्याचाही माझा कोणताही विचार नाही,” असे तिने स्पष्ट केले. हा निर्णय तिच्या वैयक्तिक आयुष्याशी आणि जीवनाविषयीच्या दृष्टिकोनाशी संबंधित असल्याचेही तिने सूचित केले.
दरम्यान, आकांक्षाच्या या वक्तव्यानंतर सामाजिक माध्यमांवर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काहींनी तिच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले, तर काहींनी या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे. तथापि, या संपूर्ण प्रकरणावर गौरव खन्ना यांनी अद्याप कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता कायम आहे.
गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला यांनी २०१६ मध्ये विवाह केला होता. गेल्या दशकभरात या दोघांची जोडी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक मानली जात होती. गौरव खन्ना ‘बिग बॉस १९’मध्ये सहभागी असताना ‘फॅमिली वीक’दरम्यान आकांक्षा त्याला भेटण्यासाठी आली होती. त्यावेळी दोघांमधील जिव्हाळा आणि परस्पर समजूतदारपणाची चर्चा झाली होती. त्यामुळे आता त्यांच्या वैवाहिक नात्यात दुरावा निर्माण झाल्याची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.











