Bharti Singh On Divorce Rumors : आपल्या अफाट विनोदबुद्धीने आणि अचूक ‘कॉमिक टायमिंग’ने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंह सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या वैवाहिक आयुष्यात वितुष्ट आल्याच्या आणि ते घटस्फोट घेणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. लग्नाच्या नऊ वर्षांनंतर हे जोडपे वेगळे होणार असल्याच्या चर्चांनी सोशल मीडियावर खळबळ माजवली होती. अखेर या सर्व अफवांना भारतीने आपल्या खास शैलीत पूर्णविराम दिला आहे.
व्लॉगच्या माध्यमातून केला खुलासा
भारती सिंह सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते आणि यूट्यूब व्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या आयुष्यातील घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते. नुकत्याच प्रदर्शित केलेल्या एका व्लॉगमध्ये तिने घटस्फोटाच्या चर्चांचा खरपूस समाचार घेतला. सुरुवातीला उपरोधिकपणे बोलताना ती म्हणाली, “आमच्या नात्यात वादाच्या ठिणग्या पडल्या आहेत, आता आम्ही एकत्र राहू शकत नाही, अशा बातम्या वाचायला मिळतात, तेव्हा खरंच आश्चर्य वाटते.” मात्र, त्यानंतर तिने अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगितले की, ती आणि हर्ष एकमेकांपासून वेगळे होण्याचा विचारही करू शकत नाहीत. अगदी मृत्यूनंतरही आमचे नाते तुटणार नाही, असे भावनिक उद्गारही तिने यावेळी काढले.
चुकीच्या बातम्या देणाऱ्यांना सुनावले खडे बोल
काही न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया पेजेस व्लॉगमधील वक्तव्यांचा विपर्यास करून चुकीच्या बातम्या पसरवत असल्याबद्दल भारतीने तीव्र नाराजी व्यक्त केली. ती म्हणाली, “आमच्या नात्यात दुरावा किंवा कडवटपणा आल्याच्या बातम्या पेरून लोक स्वतःचे मनोरंजन करत आहेत. व्लॉगमध्ये आम्ही गंमतीने बोललेल्या गोष्टी उचलून त्याचा चुकीचा अर्थ काढला जातो. अशा अफवा पसरवणारे लोक मला कपिल शर्मा किंवा माझ्यापेक्षाही मोठे कॉमेडियन वाटतात, कारण ते विनाकारण मनोरंजन करत आहेत.”
नऊ वर्षांचा सुखी संसार
भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांचा विवाह २०१७ मध्ये गोव्यातील एका भव्य सोहळ्यात पार पडला होता. या नऊ वर्षांच्या प्रवासात हे जोडपे मनोरंजन सृष्टीतील एक आदर्श जोडी म्हणून ओळखले जाते. त्यांना लक्ष्य (गोला) आणि यशवीर ही दोन मुले असून, त्यांचे संपूर्ण कुटुंब नेहमीच आनंदी वातावरणात वावरताना दिसते. हर्ष आणि भारती केवळ वैवाहिक जोडीदारच नाहीत, तर ते अनेक व्यावसायिक प्रकल्पांमध्येही एकत्र काम करतात.










