BMC Fish Cutting Ban: मुंबईतील वाकोला (धोबीघाट) परिसरातील मासळी बाजारात सध्या मोठा तणाव पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) या बाजारात मासे कापण्यावर आणि ते स्वच्छ करून देण्यावर तातडीने बंदी घातली आहे. मासे कापल्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण होते आणि दुर्गंधी पसरते, असे कारण देत पालिकेने कोळी महिलांना केवळ ‘अख्खे मासे’ विकण्याची सक्ती केली आहे.
प्रशासनाचा ‘अजब’ फतवा आणि विक्रेत्यांचा विरोध
महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे मासे विक्रेत्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पालिकेने कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता हा नियम लादल्याचा आरोप विक्रेत्यांनी केला आहे. कोळी महिलांच्या मते, ग्राहक कापलेले आणि स्वच्छ केलेले मासे घेण्यास प्राधान्य देतात. जर मासे कापून दिले नाहीत, तर व्यवसायावर मोठा परिणाम होईल आणि आमची उपजीविका धोक्यात येईल.
मच्छीमार विक्रेत्यांचे सवाल:
- मटण किंवा चिकन कापताना घाण होत नाही का? मग केवळ माशांवरच बंदी का?
- पिढ्यानपिढ्या चालत आलेला व्यवसाय एका निर्णयामुळे कसा काय बंद होऊ शकतो?
राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया
या मुद्द्यावरून मुंबईतील राजकारणही तापले आहे.
- रितु तावडे (महापौर, मुंबई): “अशी कारवाई झाली असेल तर ती योग्य नाही, आम्ही या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून तोडगा काढू.”
- किशोरी पेडणेकर (विरोधी पक्ष नेत्या): “आम्ही काय खायचं आणि कसं खायचं हे कोण ठरवणार? या निर्णयामागे काहीच लॉजिक दिसत नाही.”
- अखिल चित्रे (नेते, ठाकरे गट): “कोळी हे मुंबईचे मूळ रहिवासी आहेत. त्यांच्या पोटावर गदा आणण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. जर माशांमुळे अस्वच्छता होते, तर मग चिकन घेताना जिवंत कोंबडी घरी घेऊन जायची का? हा कोळीवाड्यांच्या जमिनी बळकावण्याचा डाव आहे.”
व्यवसायावर होणार मोठा परिणाम
पावसाळ्याच्या तोंडावर आणि सणासुदीच्या काळात अशा प्रकारची बंदी आल्याने कोळी बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जर पालिकेने या निर्णयावर फेरविचार केला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कोळी समाजाने दिला आहे. मुंबईच्या खऱ्या मानकरी असलेल्या कोळी महिलांवर अशा प्रकारे सक्ती करणे अन्यायकारक असल्याची भावना सर्वत्र उमटत आहे.
हे देखील वाचा – West Bengal CM Race: बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय! आता मुख्यमंत्री कोण? ‘या’ नावांची जोरदार चर्चा











